‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘गिन्नी वेड्स सन्नी’
रोमँटिक कॉमेडी हा प्रकार हिंदी सिनेसृष्टीसाठी नवीन नाही पण हा प्रकार जेव्हा ओटीटी प्लँटफॉर्मवर अनोख्या पध्दतीने मांडला जातो तेव्हा काहीतरी वेगळं अनुभवल्याचा प्रत्यय येतो.’लव्ह पर स्क्वेअर फूट’ आणि ‘चमन बहार’ ही अलीकडची काही उत्तम उदाहरणं. पण ‘गिन्नी वेड्स सन्नी’ हा नावीण्याचा एकही टक्का पुरवत नसल्याने वर्षानुवर्ष पहात आलेलीच एक घीसीपीटी कथा पाहिल्याप्रमाणे जाणवतं.
लग्नासाठी आतूर असलेल्या सनीला (विक्रांत मेस्सी) गिन्नीवर (यामी गौतम) प्रेम जडते. पण गिन्नी तिच्या आधीच्या एका नात्यात गुंतलेली आहे आणि लग्नाबद्दल तिच्या मनात गोंधळ सुरू आहे. अशा परिस्थितीत गिन्नीची आईच सन्नीला गिन्नीचे मन जिंकण्यात मदत करते.आणि शेवटी आजवर शेकडो प्रेमकथांमध्ये घडून गेलेला पारंपरिक क्लायमँक्स पुन्हा घडतो आणि सिनेमा संपतो.
नावीन्यपूर्णतेचा लवलेशही नसणारा हा सिनेमा कथेच्या हाताळणीबाबतही खूप कमकुवत आहे. सुमार दर्जाची प्रसंग निर्मिती, तितकेच सुमार संवाद आणि एका प्रेमकथेमध्ये विनोदनिर्मितीसाठीचा केविलवाणा प्रयत्न यामुळे कुठल्याच बाबतीत सिनेमा पकड बनवत नाही. प्रेमकथेसाठी आवश्यक असलेल्या ठोकताळ्यांचा वापर करत सिनेमा कसाबसा शेवटापर्यंत पोहचवला जातो ज्यातून काहीही विशेष साध्य होत नाही.
दिग्दर्शक पुनीत खन्ना आपल्या दिग्दर्शनामुळे कुठेही आपला वेगळा ठसा उमटवत नाही. उलट अनेक गंभीर प्रसंगांमध्ये विनाकारण ह्यूमर निर्माण करण्याच्या नादात सिनेमा प्रेमकथेपासून दूर जातो आणि सशक्त विनोदीनिर्मितीही करू शकत नाही.त्यातल्या त्यात सिनेमाचे संगीत चांगले आहे आणि गाणी बघायला आणि ऐकायलाही छान वाटतात.
हे वाचलेत का ? ऑक्टोबरमध्ये निशब्दम…
विक्रांत मेस्सी हा उत्तम कलाकार त्याच्या लिखाणात कमकुवत असलेल्या भूमीकेलाही न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. यामी गौतम देखील आपल्या भूमिकेत शोभते. विक्रांत आणि यामीची ही नवी जोडी एकत्र चांगली दिसते पण त्यांच्या कमकुवत पात्र रचनेमुळे त्यांची मेहनत फळाला येताना दिसत नाही. सुहैल नायर, आयेशा रझा मिश्रा आणि राजीव गुप्ता हे सहकलाकार सिनेमाचा अर्ध्याहून अधिक भार उचलतात आणि आपल्या नैसर्गिक अदाकारीने सिनेमा थोडाफार सुसह्य बनवतात.
राजकुमार राव प्रमाणे विक्रांत मेस्सी सारखा सक्षम कलाकार देखील व्यावसायिक सिनेमात आपले अभिनयगुण दाखवू शकतो आणि त्यासाठी हा सिनेमा व्यासपीठ उपलब्ध करून देतो एवढीच एक समाधानकारक बाब या सिनेमाच्या माध्यमातून अधोरेखित होते.
- डॉ.स्वप्नील देशमुख