एका सुपर फ्लॉप सिनेमाचा सुपर हिट रिमेक गुलजार यांनी बनवला.
बऱ्याचदा चित्रपटाचे कथानक जबरदस्त असते पण पटकथा, संवाद, दिग्दर्शन, संकलन, अभिनय या पैकी एकाची जरी भट्टी जमून आली नाही त्याचा परिणाम चित्रपटाच्या गुणवत्तेवर होतो आणि सिनेमा कमजोर पडतो आणि चित्रपटाला पाहिजे तेवढे यश मिळत नाही. असाच काहीसा प्रकार १९६८ साली आलेल्या एका सिनेमा बाबत झाला होता. कोणता होता हा सिनेमा? आणि या फ्लॉप सिनेमाचा रिमेक नंतर कुणी केला?
विल्यम शेक्सपियर : जागतिक रंगभूमीवर गेल्या ४०० वर्षांपासून गाजत असलेलं नाव. यांच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ या नाटकावरून साठच्या दशकाच्या अखेरीस एक हिंदी चित्रपट आला होता. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद गुलजार यांनी लिहिले होते. सिनेमाचे दिग्दर्शन देबू सेन यांनी केले होते. संगीत हेमंत कुमार याचे होते. चित्रपट होता ‘दो दुनी चार’.
या चित्रपटात दोन जुळ्या भावांच्या जोड्या होत्या. हे दोघे जुळे भाऊ तंतोतंत एकसारखे दिसत असतात. लहानपणीच यांची फाटाफूट होते पण नियती त्यांना पुन्हा एकदा समोर समोर आणते. आता हे तरुण झालेले असतात. त्यातून ज्या गमती जमती होतात ते या चित्रपटातील दाखवले होते. पण स्क्रीन प्ले आणि दिग्दर्शन संकलनातमध्ये गडबड झाली होती त्यामुळे हा चित्रपट फ्लॉप झाला. मुळात हा सिनेमा ‘भ्रांती बिलास’ या १९६३ साली आलेल्या बंगाली सिनेमाचा रिमेक होता. हा बंगाली सिनेमा १८६९ सालच्या ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या नाटकावर बेतला होता आणि हे बंगाली नाटक विल्यम शेक्सपियर यांच्या ‘कॉमेडी ऑफ एरर’ या नाटकाचे बंगाली रुपांतर होते.
या ‘दो दुनी चार’ या सिनेमात किशोर कुमार आणि असित सेन या दोघांचे डबल रोल होते. ‘हवाओ पे लिख दो…’ सारखं किशोरचे गाणे होते. पण हा चित्रपट फ्लॉप झाला. आज कोणाच्याही हा सिनेमा लक्षात देखील नाही. बिमल रॉय यांचे १९६६ साली निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हा सिनेमा रेंगाळला. हा सिनेमा बिमल रॉय यांना अर्पित केला होता. आज हा चित्रपट कोणाला आठवू म्हणलं तरी आठवत नाही.
पण गुलजार मात्र या कथेच्या स्ट्रॉंग पॉईंट बद्दल खूप विश्वास होता. पण गुलजार यांनी आत्मपरीक्षण केले आणि आपल्या हातून झालेल्या चुका त्यांनी आधी लिहून काढल्या आणि इतके स्ट्रॉंग कथा मूल्य असलेले हे नाटक नक्कीच त्याला जर चांगल्या पद्धतीने पडद्यावर आणता आले तरी यशस्वी होईल याचा त्यांना विश्वास वाटला. या कथानकाच्या ते प्रेमातच पडले होते. त्यामुळे त्यांनी तेच कथानक पुन्हा एकदा दमदारपणे लिहून तब्बल १६-१७ वर्षांनी हिट करून दाखवले. आधीच्या चित्रपटात झालेल्या चुका त्यांनी इकडे दुरुस्त केल्या होत्या. त्यामुळेच त्या चित्रपटाला प्रचंड यश मिळालं.
आज देखील हा सिनेमा कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. कोणता होता हा सिनेमा? हा सिनेमा होता ‘अंगूर’ (Angoor). १९८३ साली त्यांनी याच कथानकाला प्रेक्षकांपुढे आणले. ‘अंगूर’मध्ये संजीव कुमार आणि देवेन वर्मा यांचे डबल रोल होते. क्लासिक कॉमेडी म्हणून हा चित्रपट आजही ओळखला जातो. चित्रपट भन्नाट बनला. पण गुलजार यांना काहीशी भीती वाटत होती कारण पंधरा वर्षांपूर्वी याच कथानका वरील ‘दो दुनी चार‘ या चित्रपटाला प्रेक्षकांनी अव्हेरले होते. त्यामुळे ‘अंगूर’ या चित्रपटातील प्रत्येक फ्रेम ते डोळ्यात तेल घालून पाहत होते.
==========
हे देखील वाचा : आशुतोष राणा यांना त्यांची आयडेंटिटी निर्माण करून देणारा ‘दुश्मन’ चित्रपट कसा मिळाला?
==========
या चित्रपटातील देवन वर्मा हे पात्र दोन वेगळ्या भूमिका करत असले तरी त्यांच्या शब्दोच्चारातील फरक असायला पाहिजे असे त्यांनी ठरवले . एका ठिकाणी त्यांना थोडी डबिंग मध्ये गडबड वाटली. हे डबिंग करण्यासाठी त्यांनी देवन वर्माला परत बोलावले. त्यावेळी तो अमेरिकेत होता. गुलजार यांनी घेतलेल्या मेहनतीला फळ आले आणि ‘अंगूर’ (Angoor) हा चित्रपट ५ मार्च १९८२ रोजी प्रदर्शित झाला आणि धो धो चालला. देवेन वर्माला त्या वर्षीचे सर्वोत्कृष्ट कॉमेडीयनचे फिल्मफेअर अवार्ड मिळाले. एका फ्लॉप सिनेमाचा गुलजार यांनी रिमेक केला आणि सुपर हिट करून दाखवला!