नात्यांची हळवी व नैतिक गोष्ट सांगणारे चित्रपट – हमराज आणि आदमी और इन्सान
हमराज (१९६७)
निर्देशक – बी.आर.चोप्रा
संगीतकार – रवी
गीतकार – साहिर लुधियानवी
कलाकार – सुनिल दत्त राज कुमार, बळराज साहनी, मुमताज जीवन मनमोहन कृष्ण,अचला सचदेव
नवीन कलाकार- बेबी सारिका,उर्मिला भट, विम्मी
‘हमराज’ म्हणजे एकमेकांची गुपीते जाणणारे! आयुष्यात आपण विश्वासाने लोकांना आपली गुपीते सांगतो, काही वेळा दुसऱ्यांच्या सुखासाठी सुरक्षिततेसाठी विश्वासाने ती गुपिते पोटातच दडवून ठेवतो. पण काही वेळा पोटात दडवून ठेवलेली गुपीतेही शिवलेल्या ओठांतून बाहेर येतात.
मुळात हमराज ही पती व पत्नी मधील विश्वास आणि संशयाची कथा आहे. वैवाहिक सुख, समृद्धी आणि घराचे घरपण टिकविण्यासाठी पती – पत्नीमध्ये समंजसपणा व एकमेकांविषयी विश्वास असणे आवश्यक आहे. त्यांना एक दुसऱ्याची खाजगी गुपीते, लफडीही माहिती असतात. पण समजा, पती – पत्नीतील विश्वासाला आणि समंजसपणालाच तडा गेला तर? काय घडते तेच चोप्रांनी हमराजमध्ये दाखवले आहे.
आदमी और इन्सान (१९६९)
निर्देशक – बी. आर. चोप्रा
संगीतकार – रवी
गीतकार – साहिर लुधियानवी
कलाकार – सायरा बानो, धर्मेंद्र, फिरोज खान, मुमताज, जॉनी वॉकर
पुरुष (आदमी) आणि माणूस (इन्सान) ही एकाच व्यक्तीची दोन रूपे! एकेकाळचे दोन घनिष्ठ मित्र पण त्यांची जीवनातील तत्त्वे त्यांना एकमेकांपासून कशी तोडतात? याची ही कहाणी आहे.उद्योगपती जे.के. (फिरोजखान) आपल्या गरीब मित्राला मनीषला (धमेन्द्र) शिकवतो, उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवतो, उच्चपदस्थ नोकरी मिळवून देतो. मनीषला जे. के. च्या उपकारांची जाण असते. त्यासाठी काहीही बलिदान करण्यास तो तयार असतो. आपल्या लाडक्या प्रेयसीवरील हक्क मोडण्याचाही विचार करतो, परंतु शेवटपर्यत आपली प्रामाणिकपणे जपलेली तत्त्वे सोडण्यास तयार नसतो. दोन मित्रांमध्ये दुरावा निर्माण होऊन एक वेगळेच नाट्य घडते.