
Harshada Khanvilkar यांनी गणपतीला दिलं ‘शाहरुख’ हे नाव; कारण ही आहे खास !
मराठी टेलिव्हिजनमध्ये जिचा आवाज, अस्तित्व आणि अभिनय एक वेगळी छाप सोडतो, ती अभिनेत्री म्हणजे हर्षदा खानविलकर. एकीकडे ‘दामिनी’मधील ती आक्रस्ताळी आक्कासाहेब, तर दुसरीकडे ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील मायाळू आई लक्ष्मी. हर्षदाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच मोहोर उमटवली आहे. परंतु, अलीकडे तिची एक मुलाखत प्रचंड गाजत आहे. कारण ह्या मुलाखतीत तिने उघडपणे सांगितले आहे की तिचं गणपती बाप्पाशी नातं केवळ भक्तीचं नाही, तर प्रेमाचं आहे आणि त्यात कोणतीही देवभोळेपणाची भीती नाही, तर एक अनोखं सख्य आहे.(Harshada Khanvilkar)

ती सांगते, “गणपती बाप्पाशी माझं अफेअर चालू आहे… कित्येक वर्षांपासून! तो माझ्यासाठी केवळ पूजनीय नाही, तो माझा मित्र आहे, सखा आहे. मी जेव्हा मूर्तीपूजा समजायला लागले, तेव्हापासून हे नातं खूप आपुलकीचं बनलं. बरेच लोक देवाची पूजा करताना भीती बाळगतात, पण माझं गणपतीशी नातं त्याच्या पलीकडचं आहे. तो माझी काळजी घेतो, माझ्या मनात डोकावतो, आणि वेळेवर पाठिंबा देतो.” हर्षदाच्या ड्रेसिंग टेबलवर गणपती बाप्पा, स्वामी समर्थ आणि भगवद्गीता हे त्रिकूट हमखास असतं. “माझ्या आईवडिलांनी लहानपणापासून एकच संस्कार दिला आहे तो म्हणजे, कर्म करत राहा, फळाची चिंता करू नकोस. भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर याचाच संदेश आहे. त्यामुळे ते पुस्तक माझ्यासोबत नेहमी असतं. एका जुन्या मालिकेतील सहकलाकारांनी मला ती गीतेची प्रत भेट दिली होती ती आजही माझ्यासाठी खूप खास आहे.”

हर्षदाने गणपतीच्या मूर्तींना आपली नावंसुद्धा ठेवलेली आहेत. ती सांगते, “माझ्याकडे श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांची एक छोटी मूर्ती आहे. मी त्याला ‘शाहरुख’ नाव दिलं आहे कारण माझं सर्वात जास्त प्रेम शाहरुख खानवर आहे. आणि माझ्या गणपतीमध्येही तशीच एक झलक आहे. माझा सिद्धीविनायक मात्र परफेक्शनिस्ट आहे तो आमिर खानसारखा! प्रत्येक मूर्तीमध्ये मला वेगळी भावना जाणवते आणि त्यामुळे मी त्यांना आपल्या पद्धतीने संबोधते.” हे सर्व ऐकून आपण थक्क होतो, पण हर्षदाचा देवावरील विश्वास हा फार खोल आहे. अभिनेत्रीने सांगितले की, एकदा विकास पाटीलच्या मुलाला काही त्रास झाला होता. तेव्हा ती त्याच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेली. त्यावेळी विकासच्या ओळखीच्या एका व्यक्तीने सांगितलं “आक्कासाहेबांना मठात घेऊन या.” आणि त्या दिवसापासून स्वामी समर्थ त्यांच्या आयुष्यात आले.(Harshada Khanvilkar)
===========================
===========================
ती पुढे अस ही म्हणते की, “ते माझ्याकडे चालत आले की मी त्यांच्याकडे गेले, हे मला आजवर समजलेलं नाही. पण ते आज आहेत, हेच खूप आहे,”हर्षदा खानविलकरची श्रद्धा ही गोड, खरी आणि व्यक्त होणारी आहे. तिचं देवाशी नातं हे एकतर्फी नाही, तर संवादात्मक आहे. श्रद्धा म्हणजे भीती नव्हे, तर प्रेम आणि आत्मविश्वासाचा प्रकाश असतो, हे ती आपल्या उदाहरणातून दाखवते.