हि गुलाबी हवा …
काही गाणी अशी असतात की जी चित्रपटातील एखाद्या प्रसंगावर लिहिली जातात. गीतकाराला तसं गीत सुचणं देखील महत्वाचं असतं. तुम्हाला २००६ साली आलेला ‘गोलमाल’ हा मराठी चित्रपट आठवत असेल. त्यातलं गीतकार गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं ‘ही गुलाबी हवा’ हे गीत तुफान लोकप्रिय झालं. या गाण्याचा एक मस्त किस्सा आहे. ‘गोलमाल’ चित्रपटाचा दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर याने गुरु ठाकूरला फोन केला आणि चित्रपटासाठी गाणी लिहायला सांगितले. पण गुरु त्यावेळी कोणत्यातरी मालिकेच्या लिखाणात खूप व्यस्त होता. पुन्हा काही दिवसांनी ज्ञानेशचा फोन आला आणि तो गुरूला म्हणाला,”हे बघ ,नॅशनल पार्कला शूटिंगच्या तारखा घेतल्या आहेत. चित्रपटाच्या नायिकेचं इंट्रोडक्शन चे गाणे आहे. तुला लिहायचं आहे.चित्रपटाला संगीत अवधूत गुप्ते यांचे होते. गुरूने अवधूतला फोन करून विचारले की त्याला चालीवर शब्द लिहायचे आहेत की आधी गीत लिहून मग अवधूत चाल देणार आहे? अवधूत म्हणाला, “गुरु, तू आधी लिही. मग मी चाल देईन. “शूटिंगच्या तारखा जवळ येत होत्या. पण गुरु मालिकेच्या लिखाणात व्यस्त होता. आपल्याला गाणे सुचेल का,या विचारात तो होता. शेवटी गुरूने थोडा वेळ शांतपणे पंडित रविशंकर यांचे सतार वादन ऐकायचे ठरवले. डोळे मिटून शांतपणे गुरु पंडित रविशंकर यांच सतारवादन ऐकू लागला. कधीकधी वाद्यसंगीतही आपल्याला खूप काही सुचवून जातं आणि असंच काहीसं गुरूच्या बाबतीत घडलं. सतारीवर ‘मारवा ‘ ऐकताना गुरूला ओळ सुचली, “हाय,श्वासातही ऐकू ये मारवा’ मग पुढे सुचलेली ओळ, “ही गुलाबी हवा, वेड लावी जीवा ‘ ही होती. बघता बघता पुढे सुचत गेलं. सतारवादन ऐकतानाच सुचलं, “तार छेडी कुणी रोमरोमांतुनी, गीत झंकारले आज माझ्या मनी.” अशा रीतीने गुरूच्या लेखणीतून ‘ही गुलाबी हवा’ हे गीत पूर्ण झालं. त्याने ते अवधूत गुप्तेला ऐकवले आणि चाल सुद्धा पटकन तयार झाली. पंडित रविशंकर यांच्या सतारीच्या सुरातील जादू एका नवीन गीताला जन्म देणारी ठरली. हे गीत वैशाली सामंत हिने गायले आहे. अमृता खानविलकर या अभिनेत्रीवर हे गीत चित्रित झाले आहे. नॅशनल पार्क मध्ये या गीताचे चित्रण झाले. आज हे गीत पाहताना तुम्हाला हा किस्सा नक्की आठवेल.