आनंद बक्षी राज खोसला यांचे आवडते गीतकार कसे बनले?
काही कलाकारांचे अद्वितीय कार्य कायम लक्षात राहते. गीतकार आनंद बक्षी (Anand Bakshi) यांनी देखील एक काम असेच केले होते जे दिग्दर्शक राज खोसला यांना इतके आवडले की राज खोसलांचे ते आवडते गीतकार तर बनले आणि त्यांच्या पुढच्या अधिक तर चित्रपटांची गाणी नंतर आनंद बक्षी यांनीच लिहिले. असे कुठले नोबल वर्क आनंद बक्षी यांनी केले होते? कोणता होता तो चित्रपट? खूप भावस्पर्शी असा हा किस्सा आहे.
१९६६ साली दिग्दर्शक राज खोसला ‘अनिता’ या चित्रपटाची निर्मिती/दिग्दर्शन करीत होते. या चित्रपटात मनोज कुमार- साधना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. वह कौन थी? ,मेरा साया आणि अनिता ही राज खोसला यांची रहस्यमय चित्रतई होती. या तीनही चित्रपटांची गाणी राजा मेहेंदी अली खान यांनी लिहिली होती. ‘अनिता’ या चित्रपटाची चार गाणी त्यांनी लिहिली पण त्यानंतर त्यांना टीबीचा त्रास सुरू झाला आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दोन गाणी लिहायची राहिली होती.
या काळात गीतकार आनंद बक्षी (Anand Bakshi) स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपडत होते. ते दिग्दर्शक राज खोसला यांना जाऊन भेटले आणि म्हणाले की,” राजा मेहँदी अली खान यांनी आपल्या चित्रपटाची गाणी लिहिली आहेतच पण जी दोन गाणी राहिली आहेत ती मी लिहायचा प्रयत्न करू का?” राज खोसला यांनी चित्रपटातील दोन गाण्यांपैकी एक गाणे आनंद बक्षी यांना लिहायला दिले आणि दुसरे गाणे अर्जुन लखनवी यांना लिहायला दिले.
आनंद बक्षी यांनी या चित्रपटासाठी एक गाणे लिहिले. आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या गीताचे बोल होते ‘है नजर का इशारा‘ हे गाणे लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी गायले होते. आधीच्या दोन्ही सिनेमाचे संगीतकार मदनमोहन या वेळी नव्हते. ‘अनिता ‘ चे संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिले होते. चित्रपट पूर्ण झाला प्रदर्शित झाला. मागच्या दोन चित्रपटा इतके या चित्रपटाला यश मिळाले नाही; पण राज खोसला या चित्रपटावर खूष होते.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर राज खोसला एक दिवस आनंद बक्षी (Anand Bakshi) यांच्या घरी एक चेक घेऊन गेले आणि त्यांना तो दिला. आनंद बक्षी यांनी विचारले,” हा चेक कसला?” त्यावेळेला ते म्हणाले,” माझ्या चित्रपटासाठी तुम्ही एक जे गाणे लिहिले होते. त्याचे हे मानधन आहे.” त्यावर आनंद बक्षी म्हणाले ,” हे गाणे मी माझे आवडते गीतकार राजा मेहंदी अली खान यांना श्रद्धांजली म्हणून लिहिले. त्यांच्याकडून हे गाणे आपल्याकडे येणार होते पण मृत्यू झाल्यामुळे ते लिहू शकले नाही. त्यांचे अर्धवट काम मी पूर्ण केले बस एवढेच. हे गाणे मी पैशासाठी लिहिले नाही. त्यामुळे या चेकचा मी स्वीकार करू शकत नाही. तुम्ही राग मानू नका पण तुम्हाला चेक द्यायचाच असेल तर तुम्ही राजा मेहंदी अली खान यांच्या कुटुंबीयांना द्या. ते त्याचे खरे हकदार आहेत. मी तर माझ्या आवडत्या गीतकाराला एक ट्रिब्यूट म्हणून हे गाणे लिहिले होते. कृपया गैरसमज करून घेऊ नका. माझ्या भावना समजावून घ्या.” (Anand Bakshi)
=============
हे देखील वाचा : नुसरत फतेह अली यांना पाहून आनंद बक्षी यांचे डोळे का पाणावले?
=============
राज खोसला यांच्या डोळ्यात देखील पाणी आले. एक नवोदित गीतकार ज्याला खर तर कामाची आणि पैशाची गरज आहे; आपल्या आवडत्या गीतकारावर किती पराकोटीचे प्रेम करू शकतो हे त्यांच्या लक्षात आलं. तिथून पुढे राज खोसला यांचे आनंद बक्षी (Anand Bakshi) हे आवडते गीतकार बनले आणि बहुतेक सर्व चित्रपटांची गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती. दो रास्ते, मेरा गाव मेरा देश, दोस्ताना, कच्चे धागे, मै तुलसी तेरे आंगन की, प्रेम कहानी या सर्व चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिली होती.