
गीतकार शैलेंद्र आर के टीम मध्ये कसे आले?
गीतकार शैलेंद्र (Shailendra) आर के फिल्मच्या टीमचे सन्माननीय सदस्य होते. या टीम मध्ये संगीतकार शंकर- जयकिशन, गीतकार हसरत जयपुरी, गायिका लता मंगेशकर, गायक मुकेश हे अन्य सदस्य होते. भारतीय चित्रपट संगीताच्या गोल्डन इरा मधील १९५० ते १९७० हा कालखंड या टीमने प्रचंड गाजवला. गीतकार शैलेंद्र (Shailendra) यांचा या टीम मध्ये कसे आले याचा एक इंटरेस्टिंग किस्सा राज कपूर यांच्या बायोग्राफी मध्ये वाचायला मिळतो. गीतकार शैलेंद्र (Shailendra) हे आधुनिक विचाराचे ‘तरक्की पसंद’ कवी होते. त्यांच्या कवितांमधून साम्यवादी विचारांचा उल्लेख असायचा.इप्टा या संस्थेचे ते सदस्य होते.
इप्टा च्या अनेक कार्यक्रमांमधून ते काव्यवाचन करत असत. त्याकाळी ते रेल्वे मध्ये वेल्डर चे काम करत असत. एका कवी संमेलनामध्ये राजकपूर यांनी शैलेंद्र यांना ‘जलता है पंजाब’ ही कविता वाचताना ऐकलं आणि ते शैलेंद्र चे अक्षरशः फॅन झाले. त्यांना ही कविता प्रचंड आवडली. त्यावेळी राजकपूर आपल्या पहिल्या ‘आग’ या चित्रपटाच्या निर्मितीत व्यस्त होते. कार्यक्रमानंतर राजकपूर शैलेंद्र(Shailendra) यांना आवर्जून भेटले आणि त्यांनी आपल्या ‘आग’ या चित्रपटासाठी शैलेंद्र (Shailendra) यांनी गाणी लिहावीत अशी विनंती त्यांना केली. त्यावर शैलेंद्र(Shailendra) म्हणाले,” मी कवी आहे मी गीतकार नाही आणि माझे काव्य मी कधीही विकणार नाही!” राजकपूर यांना कवीचा स्वाभिमान आवडला.

काही दिवसांनी राज कपूर यांनी पुन्हा एकदा शैलेंद्र (Shailendra) यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावले आणि गाणी लिहिण्याची ऑफर दिली. परंतु त्यावेळी देखील शैलेंद्र यांनी,” मी गाणी लिहिणार नाही आणि माझे काव्य विकणार नाही.” असे राज कपूर यांना सांगितले. त्यावर राज कपूर म्हणाले,” ते ठीक आहे. पण हे पाकीट मी तुमच्या नावाने येथे करून ठेवले आहे. त्यावर तुमचे नाव ठेवलेले आहे. यात मी काही पैसे ठेवलेले आहेत. आपले काव्य मला खूप आवडते.एक प्रेमाची भेट म्हणून मी हे पाकीट आपल्या नावाने करून ठेवले आहे. त्याचा आपण स्वीकार करावा. आज नाही पण तुम्हाला जेव्हा कधी गरज वाटली तेव्हा तुम्ही माझ्या ऑफिसमधून हे पाकीट घेऊन जाऊ शकता. मी या ऑफिसमध्ये नसलोतरी हे पाकीट इथेच राहणार आहे आणि हे तुमचेच आहे. तुम्हाला ज्या क्षणी वाटेल; त्या क्षणी तुम्ही इथे या आणि पाकीट घेऊन जा.” शैलेंद्र(Shailendra) यांनी ते पाकीट काही घेतले नाही आणि ते ऑफिस मधून बाहेर पडले.
पुढे काही महिने उलटले रेल्वेच्या तुटपुंज्या पगारामध्ये संसार चालणे शक्यच नव्हते. पुढे काही दिवसांनी शैलेंद्र (Shailendra) यांना पुत्र प्राप्ती झाली आणि हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी त्यांना पैसे कमी पडले. आता काय करायचे? त्यावेळी त्यांना राज कपूर ने तयार केलेला पाकिटाची आठवण झाली. ते लगेच राजकपूर यांच्या ऑफिसमध्ये पोहोचले. राजकपूर तेव्हा ऑफिसमध्ये नव्हते. परंतु ते पाकीट ऑफिसमध्ये होते. ऑफिसमधील कर्मचाऱ्यांनी ते पाकिट शैलेंद्र (Shailendra) यांना दिले. शैलेंद्र यांना त्या पैशाची खूप मदत झाली. जेव्हा दुसऱ्या दिवशी राजकपूर यांना आपल्या ऑफिसमध्ये येऊन शैलेंद्र ते पाकीट घेऊन गेले आहेत हे कळालं तेव्हा देखील राज कपूर यांनी त्यांना अजिबात संपर्क केला नाही!
हे देखील वाचा : किस्सा शम्मी कपूरच्या पहिल्या वहिल्या कारचा!
काही दिवसांनी शैलेंद्र(Shailendra) स्वतः राज कपूर यांच्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या काही कविता राजकपूर यांना दिल्या. राजकपूर म्हणाले,” याची की आवश्यकता नाही. तुम्ही जी कविता ऐकवली होती ती मला आवडली त्यामुळे मी ते पैसे तुम्हाला दिले होते.” त्यावर शैलेंद्र म्हणाले,” पण मी आता तुमच्या चित्रपटासाठी गाणी लिहायला तयार आहे. अशा पद्धतीने शैलेंद्र (Shailendra) यांनी राज कपूरच्या सिनेमासाठी गीतकार म्हणून काम करायला तयारी दर्शवली. राजकपूर तेव्हा ‘बरसात’ या चित्रपटाची निर्मिती करत होते. यातली दोन गाणी शैलेंद्र (Shailendra) यांनी लिहिली होती. ‘पतली कमर है तिरछी नजर है…’ आणि दुसरं गाणं जे अफाट गाजलं ते होतं ‘बरसात मे हमसे मिले तुम बरसात में…’ या चित्रपटात शैलेंद्र यांची गाणी खूप गाजली. आणि तिथून पुढे आर के टीमचा ते एक अविभाज्य घटक बनले!