लता मंगेशकर यांचे हे गाणे मुबारक बेगम यांना कसे मिळाले?
भारतीय चित्रपट संगीताच्या सुवर्ण काळातील काही गाण्यांचे किस्से ऐकल्यानंतर आपण थक्क होतो, कारण काही कलाकारांचे त्या काळातील वर्तन आपल्याला आश्चर्यचकित करून टाकते.अशा वेळी त्या कलाकारांच्या बाबत आपल्या मनात जपलेल्या इमेजला धक्का पोचतो. अलीकडे बऱ्याच कलाकारांची पुस्तक येऊ लागली आहेत. त्यातनं या अनेक गोष्टींवर नव्याने प्रकाश पडतो. एक गाणे जे लता मंगेशकर यांच्या स्वरात रेकॉर्ड होणार होते ते झाले नाही आणि ते गाणे गायिका मुबारक बेगम यांच्या स्वरात रेकॉर्ड झाले!
मुबारक बेगम (mubarak begum) यांच्यासाठी हे गाणे म्हणजे ‘सिग्नेचर सॉंग’ ठरले. त्यांची ओळखच या गाण्यामुळे निर्माण झाली. हे नेमकं घडलं कसं याबाबत त्या काळातल्या नियतकालिके मॅगझिन्स काढून पाहिली तर वेगळीच माहिती आपल्या हाताशी लागते. तेव्हा तिथे असं म्हटलं जात होतं की लता मंगेशकर दुसऱ्या एका निर्मात्याच्या रेकॉर्डिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे हे गाणं त्या गाऊ शकल्या नाहीत. पण नक्की खरं काय घडलं होतं? काय होता तो तो किस्सा? कोणतं होतं ते गाणं? काय नेमका प्रकार झाला होता?
हे गाणं होतं केदार शर्मा यांच्या ‘हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तन्हाइयों में हमारी याद आयेगी’. या गाण्याच्या रेकॉर्डिंग वेळेचा हा सर्व प्रकार आहे. हे गाणे लता मंगेशकर गाणार होत्या. या गाण्याच्या रिहर्सल देखील झाल्या होत्या. चित्रपटाचे संगीतकार स्नेहल भाटकर यांनी अतिशय सुंदर चाली मध्ये हे गाणं बांधलं होतं. गाण्याच्या रिहर्सल झाल्या, रेकॉर्डिंगचे डेट ठरली, लता मंगेशकर रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये आल्या.
पण… पण त्याच वेळी अशी एक गोष्ट घडली की ज्यामुळे रेकॉर्डिंग होऊ शकलं नाही. रेकॉर्डिंगच्या काही वेळ आधी लता मंगेशकर यांच्या गाडीचा ड्रायव्हर निर्माता दिग्दर्शक केदार शर्मा यांच्या केबिनमध्ये आला आणि म्हणाला, ”गाण्याची रेकॉर्डिंग त्याच वेळेला होईल जेव्हा तुम्ही मला १४० रुपये द्याल!” केदार शर्मा त्याची मागणी ऐकून गोंधळून गेले. ते म्हणाले, ”असं काही ठरलं नव्हतं. हे कोणते पैसे तुम्ही मला मागत आहात?” तेव्हा ड्रायव्हर म्हणाला, ”सर्वच निर्माते मला पैसे देतात.” तेव्हा केदार शर्मा म्हणाले, ”सर्व निर्माते काय करतात हे मला सांगू नका. लता मंगेशकर यांच्यासोबत माझा जो व्यवहार झालेला आहे त्यात कुठेही या १४० रुपयाचा उल्लेख नाही. त्यामुळे मी हे पैसे तुम्हाला देऊ शकत नाही.” त्यावर ड्रायव्हर हसत हसत खांदे उडवत म्हणाला, ”बघा मग तुमचे तुम्ही!” केदार शर्मा यांना ड्रायव्हरच्या ताकदीचा अंदाज त्या वेळेला आला जेव्हा लता मंगेशकर काहीतरी कारण सांगून रेकॉर्डिंग स्टुडिओतून बाहेर पडल्या आणि परत आल्याच नाहीत. त्या दिवशीच्या रेकॉर्डिंग स्टुडिओचे भाडं, सर्व वादकांचे पेमेंट यामुळे केदार शर्मा यांचे खूप मोठे नुकसान झाले.
पुन्हा काही दिवसानंतर रेकॉर्डिंगची तारीख ठरली. पुन्हा परत तोच प्रकार झाला. आता तर लता मंगेशकर रेकॉर्डिंगला देखील आल्या नाहीत. ड्रायव्हर फक्त त्याचे १४० रुपये मागायला आला. संगीतकार स्नेहल भाटकर केदार शर्मा यांना म्हणाले “तुम्ही माझ्या पेमेंट मधून १४० रुपये कापून घ्या परंतु आज रेकॉर्डिंग संपवून टाकू.” त्यावर केदार शर्मा म्हणाले,” प्रश्न १४० रुपयाचा नाही. तत्वाचा आहे. असं कुठलं काहीच ठरलेलं नव्हतं.” पैसे मिळत नाहीत हे पाहून ड्रायव्हर निघून गेला. तेव्हा केदार शर्मा यांनी सरळ लता मंगेशकर यांना फोन करून सांगितले, ”मागच्यावेळी रेकॉर्डिंग कॅन्सल झाले त्यामुळे मोठे नुकसान झाले. आज देखील रेकॉर्डिंग होऊ शकत नाही. त्याचे देखील मोठे नुकसान होत आहे. आता ज्या वेळेला माझ्याकडे पैसे येतील त्यावेळेला मी तुम्हाला फोन करून सांगेल आणि त्याच वेळेला आपण रेकॉर्डिंग करू.”
========
हे देखील वाचा : यांचं गाणं ऐकून लता मंगेशकर झाल्या भावुक…
========
केदार शर्मा यांनी तात्काळ गायिका मुबारक बेगम(mubarak begum) यांना फोन करून रेकॉर्डिंगला बोलावले आणि त्यांच्यासोबत रिहर्सल करून हे गाणे रेकॉर्ड झाले . मुबारक बेगम यांनी गायलेलं ‘कभी तन्हाईयो मे हमारी याद आयेगी’ हे खरोखर आयकॉनिक सॉंग. आज मुबारक बेगम यांची आठवण केवळ या गाण्यासाठी काढली जाते. जे गाणं त्यांना अशा परिस्थितीत मिळाला होते! गाणे गाणे पे लिखा है गाने वाले का नाम!
लता मंगेशकर यांनी या बाबतचा कधीच खुलासा केला नाही की नेमका काय प्रकार झाला. काही वर्षानंतर केदार शर्मा यांनी एक पुस्तक लिहिलं या पुस्तकाचे शीर्षक होते ‘द वन अँड लोन्ली केदार शर्मा’ या पुस्तकात त्यांनी या प्रकारावर विस्ताराने लिहिले आहे. अर्थात पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देखील मंगेशकर कुटुंबीयांकडून याबाबत कुठलाही खुलासा झाला नाही त्यामुळे केदार शर्मा यांनी लिहिलेले सत्य आहे असे समजून चालायला हरकत नाही काही. असो मुबारक बेगम (mubarak begum) यांना मात्र एक चांगले गाणे यानिमित्ताने मिळाले हे नक्की!
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी