ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मालिकांनी केलं सीमोल्लंघन !
कधी कथेत घडणाऱ्या नाट्यमय घडामोडी किंवा कथा संपतेय असं वाटत असतानाही लांबत जाणारे एपिसोड, कधी किचन पॉलिटिक्सचा डोस तर कधी सहनशीलतेचा अंत पाहणारी सोशिकता अशा अनेक बाबतीत दैनंदिन मालिका सीमा ओलांडत असतात. सध्याही बहुतांशी मालिकांनी आपली सीमा ओलांडली आहे, पण ती मालिकेच्या कथेतील ट्विस्टबाबत नव्हे तर थेट मालिकांचा सेटवरील संसारच हम तो चले परदेस म्हणत प्रवासाला लागला आहे. आम्ही करतोय प्रवास… कारण तुमचा मनोरंजनाचा प्रवास थांबू नये म्हणून अशी कॅप्शन देत कलाकारांनी त्यांचे सोशल मीडियावरील स्टेटस अपडेट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात लॉकडाउन लागल्याने मालिकांनी गोवा, सिल्व्हासा, दमण, बेळगाव, गुजरात या अन्य राज्यातील शहरांमध्ये मुक्काम ठोकला आहे. मालिकांच्या या सीमोल्लंघनामुळे प्रेक्षकांचा लॉकडाउन कंटाळवाणा होणार नसल्याने प्रेक्षकही खूश आहेत.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा कहर वाढला आणि प्रसार रोखण्यासाठी देशभर लॉकडाउन करण्यात आले. त्यावेळी अचानक मालिकांच्या शूटिंगला ब्रेक लागल्यामुळे बँकमध्ये असलेले एपिसोड संपल्यानंतर चॅनेलने मालिकांच्या जुन्या एपिसोडवर प्रेक्षकांच्या मनोरंजनाची तहान भागवली. पुढचे चार महिने शूटिंग बंद होती. तोपर्यंत कलाकार तर घरीच बसले पण सेटवर काम करणाऱ्या तंत्रज्ञांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. कोरोनाचा या फटक्याचे परिणाम आठ ते नऊ महिने मनोरंजनक्षेत्रातील कलाकार व प्रत्येकालाच भोगावे लागले. जुलैमध्ये शूटिंग पुन्हा सुरू झाले. काही मालिका नव्याने दाखल झाल्या, काही बंद झाल्या तर काही मालिकांचा प्रवास सुरूच राहिला. आता पुन्हा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या महाराष्ट्रात असल्याने गेल्या आठ दिवसांपासून महाराष्ट्रात संचारबंदी होती. या काळातच शूटिंग बंद झाली पण निर्माते आणि चॅनेल यांच्या डोक्यातील चक्र सुरू झाले. महाराष्ट्रात लॉकडाउन असल्याने शूटिंग करता येणार नाही हे खरे असले तरी ज्या राज्यात लॉकडाउन नाही तेथे सेट हलवला तर मालिका खंडित होणार नाहीत हा विचार करून आता सर्वच मालिकांची टीम अन्य राज्यात डेरेदाखल झाली आहे. कलाकारांनीही यासाठी काळजी घेत सहकार्य केले आहे.
सध्या सोशलमीडिया पेजवर कलाकारांनी त्यांच्या या आगळ्यावेगळ्या प्रवासाच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. यामध्ये पाहिले न मी तुला या मालिकेच्या सर्व टीमने विमानप्रवास करत गोवा गाठला आहे. या मालिकेतील अभिनेता शशांकने ही माहिती इन्स्टावरून शेअर केली आहे. आम्ही काळजी घेतोय हे सांगायला तो विसरला नाही कारण गेल्या वर्षी त्याला कोरोनाची लागण झाली होती. आता या मालिकेचा नायक अनिकेत म्हणजेच आशय कुलकर्णी याला कोरोनाची बाधा झाली असल्याने सध्या तरी तो पुण्यातील घरी आहे. पुढचे काही दिवस आशय या मालिकेत दिसणार नसून तो बरा झाला की गोव्यात शूटिंगसाठी दाखल होईल.
सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेची टीम गोव्याला दाखल झाली आहे. या मालिकेतील माईच्या भूमिकेतील वर्षा उसगावकर यांना यानिमित्ताने त्यांच्या गोवा या जन्मभूमीत जायची संधी मिळाल्याने त्यांना हे सुख जास्तच मानवणार आहे. रंग माझा वेगळा, अग्गंबाई सूनबाई या मालिकांच्या टीमचा पुढचा एपिसोड प्रवास गोव्याच्या किनारीच असणार आहे. माझा होशील ना मालिकेतील ब्रम्हे फॅमिलीने नुकतीच ऑनस्क्रिन सिमला टूर केली आणि आता लॉकडाउनमध्ये शूटिंग सुरू ठेवण्यासाठी हा चमू सिल्व्हासामध्ये राहणार आहे. तर मुलगी झाली हो, सहकुटुंब सहपरिवार, सांग तू आहेस का यांचाही मुक्काम सिल्व्हासा मध्ये असेल. सध्या ऐन भरात असलेल्या देवमाणूसची टीम कर्नाटकच्या मार्गाला लागली असून बेळगावमध्ये आता डॉक्टर देवीसिंगच्या कारवाया शूट होणार आहेत.
हे देखील वाचा : मालिकांमध्ये रंगतोय सीझन्सचा खेळ…
गेल्या वर्षी लॉकडाउन काळात प्रेक्षकांना हसण्याचा पुरेपूर डोस देत जुने एपिसोड काय कमाल करू शकतात हे दाखवणाऱ्या चला हवा येऊ द्या या शोने यावर्षी जुन्याला फाटा देत आधीच जयपूरला सेट लावला आहे. त्यामुळे आता जयपूरमध्ये होणाऱ्या शूटिंगमधून हास्याचे फवारे उडत राहतील. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे शूटिंग कोकणातील आकेरी या गावातील खऱ्याखुऱ्या वाड्यात सुरू होते, सध्या तरी ही टीम कुठेही गेलेली नसून त्यांच्याकडे एपिसोड बँक आहे. येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत आता ओम आणि स्वीटूच्या नात्याला बहर आल्याने ही मालिका थांबवणे शक्य नव्हते. म्हणूनच खानविलकर आणि साळवी ही ऑनस्क्रिन फॅमिली आणि त्यांच्यातील अमिरी गरीबीचा संघर्ष दमणमध्ये रंगणार आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेच्या पुढच्या एपिसोडचा गंध दरवळत रहावा यासाठी या टीमने शूटिंगसाठी अहमदाबादची निवड केली आहे.
आता शहरच बदललं असल्यामुळे मालिकेत रोज ओळखीची असलेली नायक नायिकांची घरंही बदलणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता या गोष्टीची सवय करून घ्यावी लागेल. सरूआजीचा वाडा, शिर्केपाटलांचा बंगला, लंकारी फायनान्सचं ऑफीस, ब्रम्हेंचं वसंतस्मृती, अरूंधतीच्या आप्पांचा समृद्धी बंगला, शुभमचं स्वीटमार्ट हे सगळं मालिकेत असेल पण त्यांचं रूपडं बदललेलं असेल. पण या नव्या बदलासाठी कलाकार आणि त्यांचे चाहते उत्सुक आहेत.