इंडियन शकिरा नेहा कक्करची सक्सेस स्टोरी आपल्याकरिता पण प्रेरणादायी आहे
ओ नेहा रे…..
ऐसा वर दो कांगडेवाली जागरण तेरा करता रहू….
ढोल, मंजिरो के संग नाच नाच के गाता रहू…
सोनू कक्कर आणि नेहा कक्कर या भगिनी जेव्हा या गाण्यांसह देवीचे जागरण करायच्या तेव्हा उपस्थित भक्तगणामध्ये वेगळा उत्साह संचारायचा… हो, बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसतांना केवळ आपल्या गाण्याच्या जीवावर स्वतःच स्थान निर्माण करणारी नेहा कक्कर लहानपणापासून देवीचे जागरण करायची… त्यातूनच तिने गाण्याचे धडे घेतले. भारताची लेडी शकीरा म्हणून ओळख मिळवलेल्या नेहाचे जीवन म्हणजे संघर्षातून उदयाकडे असेच आहे.
नेहाचा जन्म उत्तराखंडमधील ऋषिकेश मध्ये झाला. नेहाचे वडील खाजगी कंपनीमध्ये कामाला… तर आई गृहीणी… नेहाला सोनू नावाची मोठी बहिण आणि टोनी नावाचा भाऊ आहे. सोनू ही नेहाची मोठी बहिण चांगली गायची. या कक्कर कुटुंबाची परिस्थिती साधारण होती. वडीलांचे उत्पन्न फार नव्हतं. त्यामुळे वडील सोनूला देवीच्या जागरणामध्ये गाण्यासाठी न्यायचे. सोनू जागरणामधून पैसे कमवायची त्यातून या कुटुंबाला हातभार लावत होती. या गोष्टीवरुन कक्कर कुटुंबियांना अनेकजणांचे टोमणे खावे लागले. पण याकडे लक्ष न देता मोठ्या बहिणीबरोबर नेहाही जागरणाला जाऊ लागली. या बहिणीनेच नेहाला गाणं शिकवलं. तेव्हा नेहाचं वय अवघं चार वर्षाचं होतं… पुढे हे कक्कर कुटुंब दिल्लीमध्ये स्थलांतरीत झालं. दिल्लीच्या न्यू होली पब्लिक स्कुलमध्ये नेहा जाऊ लागली. पण शाळेत असतांनाच इंडीयन आयडॉलच्या ऑडीशनमध्ये तिची निवड झाली आणि शाळा सोडून नेहा मुंबईला दाखल झाली ती कायमचीच….
नेहा आणि तिच्या कुटुंबांने परिस्थितीबरोबर कायम संघर्ष केला आहे. सोनू या नेहाच्या बहिणीच्या कॉलेजसमोर नेहाचे वडील समोसे विकायचे. त्यामुळे तिला कॉलेजमध्ये त्रास होऊ लागला. त्यामुळे या मानी बहिणींनी आपल्या सर्व मित्र-मैत्रीणींबरोबर संबंध तोडून टाकले होते. असे परिस्थितीकडून येणारे चकटे नेहाने सहन केले, त्यातून निराश न होता तिची वृत्ती लढवय्यी झाली. त्यामुळेच इंडीयन आयडॉलमधून बाहेर पडली तेव्हा ती निराश झाली… पण थोड्यावेळासाठी… नंतर पुन्हा तिने गायिका होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. लवकरच मीत ब्रदर्सनं कंपोज केलेल्या नेहा, दि रॉक स्टार या गाण्यांमधून, अल्बमधून नेहाने बॉलिवूडमध्ये आपली एन्ट्री मारली. मोहक चेह-याची नेहा गाण्याबरोबर परफार्मन्सही करु लागली. नृत्य आणि मॉडेलिंगमध्येही नेहा सरस ठरली. त्यात नेहाची गाण्याची स्टाईल तरुण पिढीला अधिक अपिल झाली…. नेहानं हजारभर लाईव्ह शो केले आहेत. सोशल मिडीयाची नेहा अॅक्टीव्ह मेंबर आहे. त्यामुळे तिला सेल्फी क्वीन, भारताची शकीरा अशा नावानंही ओळखलं जातं….
नेहाचे बरेली के बाजार मे हे रिमिक्स, सेकंड हेंड जवानी, धतिंग नाच, सुन्नी सुन्ना सडकों पे, लंडन ठुमका, एक दोन तीन चार, आओ राजा, हमने पी रखी है, माहि वै, मिले हो तुम हमको यासारख्या गाण्यांनी नेहा कायम चर्चेत राहीली. सा रे गा मा पा लिटील चॅम्प्स सीझन 6 मध्ये नेहा जजच्या भूमिकेत होती… या लहान मुलांबरोबर नेहानं आपल्या लहानपणीचे अनेक अनुभव शेअर केले…
एकेकाळी रात्रभर जागरण करुन नेहाला शंभर रुपये मिळायचे आता तिच नेहा एका गाण्यासाठी दीड लाख रुपये घेते. आता नेहा चा स्वतःचा मुंबईमधील वर्सोवामध्ये बंगला आहे. त्या बंगल्याची किंमत सहा करोड रुपयांपर्यंत आहे. नेहाकडे Audi Q7 कार आहे. या गाडीची किंमत 70 लाखाच्यावर आहे. नेहानं आपल्या मेहनतीच्या बळावर हे सर्व मिळवलं… परिस्थितीबरोबर लढत रहा… कधीही हार मानू नका… एक दिवस तुमचं स्वप्न खरं होईल, नेहा सारेगमापाच्या स्पर्धकांना हा संदेश नेहमी द्यायची… याच संदेशामुळे नेहाचेही आयुष्य बदलले…. नेहाच्या यशाचे श्रेय तिच्या स्वभावात आहे. ती अपयशाकडेही यश म्हणूनच बघते… तिचा हा स्वभाव आपल्या सर्वांसाठी नक्कीच अनुकरणीय आहे.