अशोक कुमारच चोवीस तासाच्या आत झालेलं झटपट लग्न!
अलीकडच्या काही वर्षात चित्र तारा तारकांचे विवाह सोहळे हे प्रचंड मोठे इव्हेंट असतात. हल्ली त्यांच्या पाठीमागे मोठा मीडिया असते, त्यांचे फॅन फॉलोवर्स असतात. या लग्नाचा मोठा गाजावाजा झालेला असतो. पण पूर्वीच्या काळी असं होत नव्हतं. मुळात चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांना कोणी मुलीच देखील देत नसत! लग्न देखील अतिशय साध्या पद्धतीने होत असत. अशाच एका लग्नाचे भन्नाट कथा आहे. हे लग्न होतं अभिनेता अशोक कुमार (Ashok Kumar) यांचे. अवघ्या २४ तासात ‘झट मंगणी पट बॅह’ अशा टाईपचे हे लग्न होतं. आज ही लग्नाची कहाणी ऐकायला मजा येते, गंमत वाटते.
अभिनेता अशोक कुमार (Ashok Kumar) याने आई-वडिलांच्या इच्छेविरुद्ध सिनेमात काम करायला सुरुवात केली होती. बॉम्बे टॉकीजच्या सिनेमाचा तो आघाडीचा नायक होता परंतु त्याच्या याच सिनेमा काम करीत असल्याने त्यांचे पहिले लग्न मोडले होते! कारण त्यांना सिनेमातील लोक आवारा असतात असा समज समाजात होता आणि याच कारणाने त्यांनी वाढू पक्षाने लग्नाला नकार दिला. त्यामुळे अशोक कुमारच्या आई-वडिलांना त्याच्या लग्नाविषयी मोठी काळजी वाटत होती. १९३८ साली ज्यावेळी अशोक कुमार (Ashok Kumar) बॉम्बे टॉकीजच्या ‘वचन’ या सिनेमाचे चित्रीकरण करत होते; त्यावेळी त्यांना अचानक टेलिग्राम मिळाला. ‘ताबडतोब खांडव्याला निघून या.” काहीतरी अशुभ घडले असावे असे समजून अशोक कुमारने तातडीने मिळेल त्या गाडीने खांडवाला जायचा निर्णय घेतला. खांडव्याला पोहोचल्यानंतर तिथे स्टेशनवरच अशोक कुमार यांना त्यांचे वडील भेटले. ते म्हणाले, आपल्याला ताबडतोब कलकत्त्याला जायचे आहे. त्यांनी लगेच आपले सामान दुसऱ्या कलकत्त्याच्या गाडीत चढवले आणि त्यांचा प्रवास सुरू झाला. अशोक कुमारला काही कळतच नव्हते काय चालले आहे. आणि वडिलांच्या तापट स्वभावामुळे त्यांना काही विचारायची सोय नव्हती.
हळूहळू वडील देखील नॉर्मल झाले. जबलपूर आल्यानंतर ते अशोक कुमार यांना म्हणाले,” जा मागच्या डब्यात तुझी काकू आणि इतर मंडळी आहेत. त्याना भेटून ये. ” अशोक कुमार यांना आश्चर्य वाटले ते ताबडतोब मागच्या डब्यात काकूला भेटायला गेले. त्यावेळेला त्यांच्या लक्षात आले या डब्यामध्ये त्यांचे सर्व नातेवाईक उपस्थित होते. काहीच कळत नाही काय चालले आहे. त्याने काकूला विचारले “आपण नेमके सगळेजण कुठे जात आहोत?” त्यावरती काकू डोळा मिचकावत म्हणाली ,” जास्त भोळा बनू नकोस. तुला नक्की सर्व माहिती आहे!” त्यावर अशोक कुमार चिडून म्हणाले ,” काय माहिती आहे?” त्यावर काकू म्हणाली ,” परवा शुक्रवारी तुझे लग्न आहे आणि या लग्नासाठी आपण सर्वजण कलकत्त्याला जात आहोत.” आता चकित होण्याची पाळी अशोक कुमार यांची होती!
तो पुन्हा वडिलांच्या डब्यामध्ये आला आणि त्यांना विचारू लागला वडिलांनी त्याला शांत केले. कलकत्त्याला आई भेटली. आपल्या मुलाला तिथे आलेले पाहून माऊलीला खूप बरे वाटले. ती म्हणाली “आलास बेटा ?” त्यावर अशोक कुमार चिडून म्हणाले ,” टेलिग्राम तुम्हीच केला होता न येऊन जातो कुठे ? “ त्यावर अशोक कुमारची आई म्हणाली,” नाराज होऊ नकोस. तुला जर मुलगी पसंत पडली तरच तिच्याशी लग्न कर.”. यावर अशोक कुमार चिडून म्हणाले ,”आता त्याचा काय उपयोग? लग्न तर तुम्ही ठरवून टाकले आहे. परवा लग्न आहे. मी मुलगी पाहणार नाही. तुम्ही ज्या मुलीशी म्हणाल तिच्याशी लग्न करून टाकेल.”
=======
हे देखील वाचा : स्वतंत्र भारताच्या पहिल्या गवर्नर जनरल समोर लहानग्या वहिदा ने दिला पहिला परफॉर्मन्स!
=======
तरीही आईच्या आग्रहाने अशोक कुमार (Ashok Kumar) आपल्या मामासोबत ती मुलगी पाहायला गेले. अशोक कुमार हे पहिल्यापासून लाजाळू होती. त्यामुळे एक दोनदा ओझरते त्यांनी त्या मुलीला पाहून घेतले. त्यावर मामा म्हणाले,” नीट पाहून घे. या मुलीला तू या आधी ही भेटला आहेस.” त्यावर अशोक कुमार (Ashok Kumar) आश्चर्य व्यक्त करत म्हणाले ,”मी कधी भेटलो या मुलीला?” त्यावर मामा म्हणाले ,”फार पूर्वी तू तुझ्या आजोळी भागलपूरला जेव्हा आला होतास. त्यावेळेला मी तुला कॅप्टन बॅनर्जी यांच्याकडे घेवून गेलो होतो. त्यावेळेला त्यांच्याकडे तीन-चार वर्षाची जी मुलगी होती ती हीच!” त्यावर अशोक कुमारने कपाळाला हात मारून घेतला! आणि सगळे जण खूप हसायला लागले. वातावरणातील तणाव निवळला गेला. मग गुरुजींना बोलवण्यात आले. गुरुजींनी अशोक कुमारच्या आईला विचारले,” तुमच्या मुलाचा जन्मदिवस कोणता आहे?” त्यावर तिने सांगितले,” शुक्रवार.” त्यावर गुरुजी म्हणाले,” जर जन्मदिवस शुक्रवार असेल तर लग्न शुक्रवारी कसे करता येईल? अजिबात करता येणार नाही.” गुरुजी म्हणाले ,” यानंतरचा मुहूर्त तब्बल दोन महिन्यानंतर आहे.” अशोक कुमार म्हणाले ,”दोन महिने मला येथे थांबणे शक्य नाही. मुंबईत माझ्या चित्रपटाचे शूटिंग चालू आहे.” अशोक कुमार यांचे आई वडील म्हणाले की,” गुरुजी तुम्ही यातून काहीतरी उपाय सांगा. दोन महिने थांबणे शक्य नाही.” त्यावर गुरुजी म्हणाले ,”जर तसं असेल तर उद्याचा गुरुवारचा मुहूर्त चांगला आहे. उद्या लग्न लावून टाकू.” त्यावर अशोक कुमार ची आई म्हणाली,” हे कसे शक्य आहे. माझी मुलगी आणि जावई कसे पोहोचतील? तसेच मुलीचे वडील देखील येथे कसे पोहोचतील ?”त्यावर गुरुजी म्हणाले,” ते तुमचं तुम्ही बघा. लग्नासाठी उद्याचाच दिवसच योग्य आहे. नाहीतर दोन महिने थांबावे लागेल.” सर्वांनी शेवटी हा नाही करत निर्णय घेतला की, जितके लोक असतील त्यांच्या साक्षीने आपण लग्न करून टाकू. अशा प्रकारे अशोक कुमार यांचे अगदी झटपट २४ तासाच्या आत लग्न ठरले. आणि गुरुवार १४ एप्रिल १९३८ या दिवशी अशोक कुमार यांचे शोभा देवी हिच्याशी लग्न झाले!