ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
शंभर दिवसांच्या आंदोलनानंतर जयप्रभा स्टुडिओचं भवितव्य काय?
कोल्हापुरात गेल्या १०० दिवसांपासून जयप्रभा बचाओ आंदोलन चालू आहे. कोल्हापुरातला हा स्टुडिओ चित्रिकरणासाठी कायमस्वरुपी खुला करावा ही या आंदोलकांची मुख्य मागणी आहे. या आंदोलनात अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि कोल्हापुरातले कलाप्रेमींचा सहभाग आहे. अत्यंत चिकाटीने कोल्हापूरकरांनी हे आंदोलन लावून धरलं आहे. (Jayaprabha Studio Controversy)
या आंदोलनाची सुरूवात झाली ती साखळी उपोषणाने. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण करून आपल्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ही ‘जयप्रभा बचाओ समिती’ करते आहे. अनेक कलाकारांनीही या शांततेनं चालू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. इतका काळ लोटूनही या कलाप्रेमींना कोणताही दिलासा वा आश्वासन मिळालेलं नाही.
कोल्हापूरला ‘कलापूर’ हे बिरूद मिळालं कारण या शहरात अनेक कलाप्रकार रुजले. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो शिल्पकला, चित्रकला, संगीत, नृत्य, नाट्यकला या कलांचा. म्हणूनच कोल्हापूरला कलेचं माहेरघर म्हटलं गेलं. याशिवाय, बाबूराव पेंटर, भालजी पेंढारकर, रवींद्र मेस्त्री आदी मंडळीही कोल्हापुरात असल्यामुळे १९४० ते १९६० या कालावधीत कोल्हापूर हे चित्रपटाचं माहेरघर म्हणून ओळखलं जाऊ लागलं.
अनेकांना माहीत नसेल, पण जयप्रभा स्टुडिओची स्थापना राजाराम महाराजांनी केली. आधी या स्टुडिओचं नाव जयप्रभा नव्हतं. हा काळ असा होता जेव्हा मराठी चित्रपटाचं माहेरघर म्हणून कोल्हापूरची ओळख होती. त्यावेळी बाबूराव पेंटरांनी मूकपटाच्या जमान्यात कोल्हापुरात चित्रपट निर्मिती केली होती. पुढे प्रभात कंपनीचे काही सिनेमेही कोल्हापुरात बनले. पण त्यानंतर प्रभात कंपनी पुण्याला गेली. मग कोल्हापुरात पुन्हा चित्रिकरण करता यावं.. म्हणून राजाराम महाराजांनी कोल्हापूर सिनेटोनची तर त्यांच्या भगिनी आक्कासाहेब महाराजांनी शालीनी सिनेटोनची निर्मिती केली. परिणामी पुन्हा चित्रपटसृष्टी कोल्हापुरात आली. (Jayaprabha Studio Controversy)
कोल्हापूर सिनेटोनमध्ये भालजी पेंढारकर यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. कालांतराने कोल्हापूर सिनेटोन हा भालजी पेंढारकरांना विकण्यात आला. हा स्डुडिओ विकताना अट एकच होती की, इथे केवळ चित्रपटाचं चित्रिकरण होईल. ही जागा केवळ याच कलेला दिली जाईल असं यात नमूद करण्यात आलं होतं.
हा स्टुडिओ घेतल्यानंतर भालजींंनी या स्टुडिओचं नामकरण जयप्रभा असं केलं. या स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटांचं चित्रिकरण झालं. पुढे गांधी हत्या झाल्यानंतरच्या झळा या स्टुडिओलाही सोसाव्या लागल्या. हा स्टुडिओही जाळण्यात आला. भालजींचं आतोनात नुकसान झालं. या काळात त्यांची आर्थिक स्थितीही बेताची होती. आर्थिक चणचण भासत होती. ही चणचण भागवण्यासाठी भालजींनी हा स्टुडिओ, स्टुडिओचा परिसर आणि पन्हाळ्याचा बंगला विकायचं ठरवलं. गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांना ही बाब कळल्यानंतर त्यांनी ही सगळी प्रॉपर्टी घेण्याचं ठरवलं. भालजींनीही ते मान्य करत ती जागा, बंगला या गोष्टी लता मंगेशकर यांना विकल्या.
आता लता मंगेशकर यांनी स्टुडिओ घेतल्यानंतर सुरुवातीच्या काळात तो स्टडिओ चालवण्याचा प्रयत्न केला. पण नंतर गाण्यातल्या व्यग्रतेमुळे त्यांना जयप्रभाच्या विकासात लक्ष घालणं शक्य झालं नाही. जयप्रभा स्टुडिओची एकूण परिसर आहे १३ एकरांचा. मंगेशकरांनी दरम्यानच्या काळात ही जमीन एनए करून घेतली आणि त्यातली ९ एकर जागा जवळपास २० वर्षापूर्वी बिल्डरला विकली. सध्या ज्या जागेवर मूळ स्टुडिओ उभा आहे ती तीन-चार एकरची जागा उरली होती. पण दोन वर्षापूर्वी या जागेचीही विक्री झाल्याचं वृत्त काही माध्यमांमध्ये आलं आणि एकच खळबळ उडाली. (Jayaprabha Studio Controversy)
गेल्या दोन वर्षापासून लॉकडाऊन असल्यामुळे या प्रकाराला उघड आव्हान दिलं गेलं नव्हतं, पण लॉकडाऊन सुटलं आणि कोल्हापुरातल्या कलाप्रेमींनी जयप्रभा वाचावा यासाठी आंदोलन सुरू केलं आहे. कोल्हापूर महापालिकेने किंवा राज्य सरकारने ही जामीन ताब्यात घ्यावी आणि हा स्टुडिओ चित्रिकरणासाठी खुला करावा अशी मागणी आंदोलक करत आहेत.
या आंदोलनात अखिल भारतीय चित्रपट महामंडळही सहभागी आहे. पण गेले तीन महिने उलटून गेले तरीही ठोस हाती काहीच लागलेलं नाही. म्हणूनच आता हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा विचार ‘जयप्रभा बचाओ कृती समिती’ करते आहे. या प्रकरणी राज्य सरकारने तातडीने लक्ष न घातल्यास आत्मदहन करण्याचा विचारही बोलून दाखवण्यात आला आहे. (Jayaprabha Studio Controversy)
खरंतर भालजींकडून हा स्टुडिओ विकत घेतल्यावर तो स्टुडिओ ही लता मंगेशकर यांची खासगी मालमत्ता ठरते. त्यानुसार आता मंगेशकर कुटुंबीय या मालमत्तेचं काहीही करू शकतात. पण राजाराम महाराजांनी जेव्हा हा स्टुडिओ भालजींना विकला होता तेव्हा या जागेवर केवळ चित्रिकरणच होईल असं सांगण्यात आलं होतं. भालजींनीही हा शब्द पाळला. शिवाय आता इतक्या वर्षांनी तर त्याचं जतन होणं क्रमप्राप्त आहे.
सध्या जयप्रभा उभ्या आसलेल्या जागेची झालेली विक्री, जयप्रभा बचाओ कृती समितीच्या असलेल्या मागण्या, दोन वर्षापूर्वी झालेली उर्वरित जागेची विक्री..आदी गोष्टी पाहता सगळ्यात आधी या जागेवर आता करायचं काय हा महत्वाचा मुद्दा आहे.
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्याचं स्मारक कोल्हापुरात असावं तेही जयप्रभाच्या जागेमध्ये असं अनेकांना वाटतं. पण ते होईल असं वाटत नाही. कारण, लता मंगेशकर हयात असतानाच याच व्यवहारावरून त्यांना कोल्हापूरकरांच्या रोषाला अप्रत्यक्षरित्या सामोरं जावं लागलं होतं. (Jayaprabha Studio Controversy)
======
हे देखील वाचा – सावधान! सेलिब्रिटींचे ‘रीललाईफ’ कंटाळवाणे होते आहे…
======
परिणामी, जयप्रभा स्टुडिओ आबाधित रहवा हे अगदीच बरोबर आहे. पण या जागेत नेमकं काय करायचं याचं नियोजनही करणं तितकंच गरजेचं आहे. शिवाय, सध्या जे आंदोलन चालू आहे त्या कृती समितीला भेटून त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे हेही समजून घ्यायला हवं.
दोन्ही बाजू विचारात घेऊन एक मध्यममार्ग काढण्याची मोठी कामगिरी राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाला करावी लागणार आहे. आता १०० दिवस उलटूनही या कृती समितीला कुणीही बोलतं केलेलं दिसत नाहीय. या आंदोलनाला कोणतंही हिंसक वळण लागण्याआधी त्यावर किमान चर्चा झाली, तर ते दोन्ही बाजूंसाठी हिताचं ठरेल.