प्रपंच: विभक्त कुटुंबातील मुलांच्या मनात एकत्र कुटुंबाची ओढ निर्माण करणारी मालिका
झी मराठी (आधी अल्फा टीव्ही) वाहिनी सुरु झाली आणि या वाहिनीने मराठी मनोरंजन क्षेत्रात एक वेगळाच इतिहास घडवला. सुरुवातीच्या काळात कितीतरी उत्तोमोत्तम मालिका या वाहिनीने प्रसारित केल्या. या वाहिनीची लोकप्रियता इतकी वाढली होती की, महाराष्ट्रातील मोठा प्रेक्षकवर्ग हिंदी वाहिन्या आणि दूरदर्शन सोडून झी मराठीकडे गेला. या वाहिनीच्या माध्यमातून मराठी कलाकरांना खूप चांगली संधी मिळाली आणि मराठी इंडस्ट्रीला अनेक गुणी कलाकारही मिळाले. (Prapanch Serial)
सुरुवातीच्या काळात झी मराठीवर प्रदर्शित झालेल्या उत्तम मालिकांमध्ये एक नाव आवर्जून घ्यायला हवं ते म्हणजे ‘प्रपंच’ या मालिकेचं. त्या काळात ‘विभक्त कुटुंब’ ही संकल्पना समाजात चांगलीच रुजली होती. एकत्र कुटुंब या संकल्पनेचं भविष्य काय, असा प्रश्न उभा राहिला होता. त्याच काळात एका एकत्र कुटुंबाची कहाणी या मालिकेमध्ये मांडण्यात आली.
या मालिकेमध्ये जरी एकत्र कुटुंबाची कहाणी दाखविण्यात आली असली तरी त्यामध्ये कोणताही मेलोड्रामा नव्हता. भव्य दिव्य महाल नाही, तर साधं जुनं घर होतं. कोणतंही श्रीमंत कुटुंब नाही, तर एक साधं, सरळ मध्यमवर्गीय कुटुंब दाखवण्यात आलं होतं.
मुंबईमधील समुद्र किनाऱ्याजवळील ‘आश्रय’ नावाचं जुनं घर आणि या घरात राहणारं देशमुख कुटुंब. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे, भावविश्व वेगळं पण तरीही सर्वजण एका धाग्याने एकत्र जोडलेले असतात. तो धागा असतो प्रेमाचा, आपुलकीचा आणि संस्कारांचा! (Prapanch Serial)
कुटुंबामधील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती अण्णा (सुधीर जोशी) हे माजी स्वातंत्र्यसैनिक असतात. त्याची पत्नी माई (प्रेमा साखरदांडे) म्हणजे कुटुंबवत्सल, प्रेमळ स्त्री, सुनांना आपल्या मुलींसारखं मानणारी. अण्णा आणि माई त्यांच्या दोन विवाहित मुलांच्या कुटुंबासह या घरात सुखा समाधानाने नांदत असतात.
कुटुंब म्हटल्यावर थोड्याफार कुरबुरी असणारच. पण तरीही या कुटुंबातली माणसं एकमेकांवर नितांत प्रेम करतात. कोणी कोणाचे कान भरत नाही की, कोणाचा दुस्वास करत नाही; कोणाला हरवायला कुठली चाल खेळत नाही की, कोणा विरुद्ध कट कारस्थानं आखली जात नाहीत. सर्वसामान्य माणसं जसं आयुष्य जगत असतात, देशमुख कुटुंबातील व्यक्तींचं आयुष्यही तसंच सर्वसामान्य आयुष्य दाखवण्यात आलं आहे. (Prapanch Serial)
कुटुंबामध्ये प्रत्येकजण नैतिक मूल्यांचा आदर ठेवून वागत असतो. कुटुंबातील प्रत्येकालाच अण्णा आणि माईंचा प्रेमळ, आदरयुक्त धाक असतो. अत्यंत संस्कारी तरीही स्वतंत्र विचार जपणारी अण्णांची नातवंडं ही त्या काळातील तरुण पिढीचं प्रतिबिंब होती.
मालिकेत एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचं आयुष्य दाखविण्यात आलं आहे. तीन पिढ्यांच्या विचारसरणीमधली तफावत दाखवताना कोणत्याही पिढीला झुकतं माप देण्यात आलं नाही, ही मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू. यामुळेच प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींना ही मालिका आपलीशी वाटत होती. मालिका बघणाऱ्या प्रत्येक एकत्र कुटुंबाला ही आपल्याच घरातलीच कथा वाटत होती, तर विभक्त कुटुंबांमधील मुलांमध्ये एकत्र कुटुंबाबद्दल ओढ, आकर्षण निर्माण झालं होतं. मालिकेचं शीर्षक गीतही कमालीचं लोकप्रिय झालं होतं. (Prapanch Serial)
समुद्राप्रमाणे संथ, शांत, गूढ, धीर गंभीर, तर कधी अचानक उसळणारी माणसाची मानसिक अवस्था आणि त्याचे कळत – नकळत कुटुंबावर होणारे परिणाम मालिकेमध्ये अतिशय सुंदररित्या चित्रित करण्यात आले होते. यामध्ये घटस्फोटाचा निर्णय घेणारी लतिका, प्रशांतचा वेगळं राहण्याचा निर्णय, बिनधास्त टॉम बॉय स्वतंत्र विचारांची अलका, कमी शिक्षणामुळे आलेली उदासी आणि भविष्याची चिंता लपवणारा आनंद आणि या साऱ्या प्रसंगांचा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर, त्याच्या विचारांवर होणारा परिणाम अतिशय प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे.
कुटुंबातल्या दोन मुलांमधली शैक्षणिक तफावत, कुटुंबातील धाकट्या मुलीचं लवकर लग्न होऊन अवघ्या काही महिन्यातच तिचं परत येणं, तिचा घटस्फोटाचा निर्णय, १२ वीला ९०% पेक्षा जास्त मार्क्स मिळूनही आर्ट्सला ॲडमिशन घेणं, हे सर्व प्रसंग आजही कित्येक घरांमध्ये घडत असतील. त्यामुळे आजच्या काळात जरी ही मालिका पुनःप्रक्षेपीत झाली तरीही ती काळाला सुसंगत वाटेल.
======
हे देखील वाचा – आभाळमाया – मराठी मालिकांच्या इतिहासातील एक सोनेरी पान
======
या मालिकेमध्ये सुधीर जोशी व प्रेमा साखरदंडे यांच्यासह संजय मोने, सुहास जोशी, बाळ कर्वे, अमिता खोपकर, रसिका जोशी, भरत जाधव, सुनील बर्वे, भार्गवी चिरमुले, शर्वरी पाटणकर, सोनाली पंडित आणि आनंद इंगळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. (Prapanch Serial)
या मालिकेचं लेखन, दिग्दर्शन केलं होतं प्रतिमा कुलकर्णी यांनी. ही मालिका १९९९ पासून २००२ सालापर्यंत सलग ३ वर्ष चालू होती. मालिका संपून २० वर्ष झाल्यावर आज २०२२ सालातही या मालिकेची लोकप्रियता कायम आहे. यातच या मालिकेचं यश आहे.