जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी …
मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रतिभावान व सर्जनशील दिग्दर्शक म्हणून जब्बार पटेल यांची ओळख आहे. सिंहासन, सामना, जैत रे जैत, मुक्ता,एक होता विदूषक असे मराठीतील संस्मरणीय चित्रपट पटेल यांनी दिग्दर्शित केले आहेत. मूळचे रंगकर्मी असल्याने त्यांच्या विषयाच्या मांडणीत सूत्रबध्दता असते, त्यातील आशय रसिकांना थेट भिडणारा असतो. १९७८ साली त्यांचा एक अप्रतिम चित्रपट आला होता ’जैत रे जैत’ (Jait Re Jait) या चित्रपटाने मराठी सिनेमाचा फॉरमॅटच बदलला.गो नी दांडेकरांच्या या कथेवर सिनेमा करायचा मंगेशकर कुटुंबीयांच्या फार दिवसापासून मनात होतं. त्यांनी ही कादंबरी मुद्दाम पटेलांकडे पाठवून वाचायला दिली. जब्बारसाहेबांनी कादंबरी वाचली. त्यांना ती आवडलीही कारण त्या कथेत चित्रपटाच्या दृष्टीने प्रचंड असं रॉ मटेरीयल होतं. पण डॉक्टरांना ही कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर आणायची नव्हती.
ते मुळचे नाटकवाले, त्यामुळे ‘जैत रे जैत’ (Jait Re Jait) ही चित्रपटरुपात आणताना कथानकाचा मुळ फॉर्म बदलायचा असं त्यांनी ठरवलं. त्या आधी डॉक्टरांनी घाशीराम कोतवाल, तीन पैशाचा तमाशा यासारखी संगीतिका म्हणता येतील अशी नाटके केलेली होती. तो अनुभव लक्षात घेवुन, कदाचित त्यामुळेच ‘जैत रे जैत’ या चित्रपटाला पाश्चात्य देशातील संगीतिकेचा फॉर्म देण्याचे डॉक्टरांनी ठरवले होते. ‘जैत रे जैत’ (Jait Re Jait) ची कथा आदिवासी ठाकर समाजात घडते. पाश्चात्य संगीतिकांमध्ये ज्याप्रमाणे सूत्रधार असतो त्या धर्तीवर या चित्रपटात ठाकर समाजातल्याच दोघांना सूत्रधार म्हणून ठेवावं असा विचार झाला.(यात चंद्रकांत काळे आणि श्रीराम रानडे यांनी सूत्रधाराची भूमिका केली होती) मंगेशकर कुटुंबियांनाही ही कल्पना आवडली आणि सर्वानुमते पटकथेवर काम करायला सुरुवात झाली.या संगितिकेतील गाणी निसर्ग कवी ना धो महानोरांनी लिहावी असे पत्र त्यांना प्रभु कुंज वरून पाठविण्यात आले.
तोवर महानोरांनी सिनेमासाठी गाणी कधी लिहिली नव्हती. त्यांनी चक्क आपण सिनेमासाठी गाणी लिहित नाही म्हणून नकार कळविला! पण शेवटी सर्वांच्या हट्टापुढे त्यांचे काही चालले नाही. १९ मार्च १९७७ ला गुढी पाडव्याच्या दिवशी चित्रपटाच्या शुभारंभाच्या दिवशी ते गाणे लिहायला बसले. पहिलं गाणं होतं ’जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी’ अजिंठा,पळसखेड्यातील निसर्गात रमलेल्या कवीराजांची लेखणी अखंडपणे स्त्रवू लागली.एक अजरामर चित्रकाव्य जन्माला येत होत.डोंगर काठाडी ठाकरवाडी, नभ उतरु आलं, आम्ही ठाकर ठाकर, वाडीवरल्या वाटा , मी रात टाकली मी कात टाकली , लिंगुबाचा डोंगर , असं एखादं पाखरू वेल्हाळ’ अशी वेड लावणारी गाणी हृदयनाथजींनी या चित्रपटासाठी ना.धों. महानोरांकडून लिहून घेतली होती. असं म्हणतात की या चित्रपटासाठी ना.धों. नी एकुण एकोणीस गाणी लिहीली होती. त्यापैकी बारा गाणी हृदयनाथजींनी चित्रपटात वापरली. लतादीदी, आशाबाई, उषाताई, रवींद्र साठे यांच्यासारख्या दिग्गजांनी ही गाणी अशा काही पद्धतीने गायली आहेत की, आज इतक्या वर्षांनंतरही त्यांची गोडी कायम आहे.
=======
हे देखील वाचा : पन्नास वर्षापूर्वीचा प्रोतिमा बेदीचा ‘बोल्ड’ धमाका!
=======
या सर्व गाण्यात कोरसचा अतिशय सुंदर उपयोग करून घेतला आहे. (हिरव्या रानात हिरव्या रानात चावळ चावळ चालती भर ज्वानीतली नार अंग मोडीत चालती…) इतका अप्रतिम कोरस परत कधी ऐकायला मिळाला नाही. या चित्रपटात आणखी एक प्रयोग केला होता. सॉंग लेट्सचा. म्हणजे अगदी एक ते दीड मिनिटांची छोटी छोटी गाणी . २५ एप्रिल १९७७ ला चित्रपटाचे शूट सुरु झाले आणि १४ जुलै १९७७ ला संपले. पनवेल जवळच्या कर्नाळा परिसरात याचे बरेचसे शूट झाले. स्मिता पाटील, डॉ मोहन आगाशे, निळू फुले, सुलभा देशपांडे या कलावंतांचा अभिनय अप्रतिम होता. आदिवासींच्या जीवनावरील सिनेमा असल्याने यातील कोणतेही पात्र ग्लॅमरस नाही.यातील गीत संगीताने रसिक भरून पावले. १९७८ सालच्या राज्य आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने बाजी मारली.जब्बार आणि स्मिताला पुरस्कार मिळाले.आज इतक्या वर्षानंतरही त्यातील ढोल रसिकांच्या कानात गुंजारव करतो!