‘कल्की’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची पहिल्याच आठवड्यात १५३ कोटींची कमाई
मागील बऱ्याच दिवसांपासून प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्या कल्की या सिनेमाची कमालीची उत्सुकता होती. सिनेमाबद्दल बाहेर येणारी लहान-मोठी गोष्टी ही उत्सुकता अधिकच वाढवत होती. अशातच जेव्हा सिनेमाचा ट्रेलर आला आणि त्यानंतर जो धमाका झाला त्याचे वर्णन करणे निव्वळ अशक्यच. अतिशय भव्य, दिव्य अशा या सिनेमाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची मने जिंकली.
अध्यात्म आणि विज्ञान यांना एकत्र आणत दिग्दर्शक नाग अश्विन यांनी ट्रेलर पासूनच प्रेक्षकांची मने जिंकली. महाभारत आणि कृष्णाशी संबंधित एक कथा या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमाच्या ट्रेलरनंतर प्रेक्षकांची सिनेमाबद्दलचे कुतूहल खूपच वाढले होते. त्यामुळे प्रत्येक जणं या सिनेमाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होता. ट्रेलर पाहिल्यानंतर अनेक जाणकारांनी या सिनेमाच्या कमाईबद्दल अनेक भाकितं वर्तवली होती.
‘कल्की 2898 एडी’ या सिनेमाने मात्र प्रदर्शनानंतर पहिल्याच दिवशी जगभरत १०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली आणि सिनेमाची दणक्यात सुरुवात झाली. आतापर्यंत या सिनेमाने ७०० कोटींपेक्षा अधिकची कमाई केली असून, त्यात सतत भर पडत आहे.
‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाने पहिल्याच दिवशी अर्थात २७ जूनला संपूर्ण जगभरात 191.5 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला. त्यानंतर ३० जूनपर्यंत या चार दिवसांत सिनेमाने तब्बल 555 कोटींची भक्कम कमाई केली होती. एका माहितीनुसार, ‘कल्की 2898 एडी’ चित्रपटाने केवळ भारतात बॉक्स ऑफिसवर पहिल्याच आठवड्यात 393.4 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी देशभरात 95 कोटींची बक्कळ कमाई केली होती. सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर सातव्या दिवशी म्हणजेच ३ जुलैला बुधवारी देशभरात सर्व भाषांमध्ये ‘कल्की 2898 एडी’ सिनेमाने 23 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.
‘कल्की 2898 एडी’ हा सिनेमा मुळ तेलगू भाषेत असला तरी तो हिंदी, तामिळ, मल्याळम, कन्नड आणि इंग्लिश भाषांमध्ये डब करण्यात आला आहे. या सिनेमाच्या हिंदी व्हर्जनबद्दल बोलायचे झाले तर ‘कल्की’ने 7 दिवसांत 153.15 कोटींची कमाई केली आहे. आता ‘फायटर’, ‘शैतान’ आणि ‘क्रू’ नंतर या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा ‘कल्की 2898 एडी’ हा चौथा हिंदी चित्रपट ठरला आहे.
दरम्यान चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन अश्वत्थामा या भूमिकेत दिसत आहे. या भूमिकेसाठी त्यांनी खूपच मेहनत घेतली त्यांचा लूक आणि मेकअप सध्या चर्चेचा विषय बनला आहे. अशातच त्यांच्या लूकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो मेकअप आर्टिस्ट प्रीतीशील सिंहने शेअर केले असून यात ती अमिताभ यांना अश्वत्थामाच्या रूपात तयार करताना दिसत आहे.
चित्रपटाच्या एका इव्हेंटमध्ये अमिताभ यांनी त्याच्या मेक-अपच्या संपूर्ण प्रोसिजरबद्दल सांगितले. ते म्हणाले, “पहिल्या चाचणी दरम्यान, माझ्यावर प्रोस्थेटिक्सचा मेकअप करण्यात आला. मी मनात म्हणालो – देवा, पुन्हा एकदा एक कृत्रिम चित्रपट. याआधी मी दोन चित्रपटांमध्ये हा मेकअप केला आहे. हा मेकअप आणि ही प्रोसिजर खूपच त्रासदायक असते. मेकअप पूर्ण व्हायला 3 तास आणि उतरवायला एक तास लागतो.”
=======
तत्पूर्वी नाग अश्विनच्या दिग्दर्शित ‘कल्की 2898 AD’ सिनेमा जवळपास 600 कोटी रुपयांमध्ये तयार करण्यात आला आहे. या सिनेमात विजय देवरकोंडा, एसएस राजामौली, राम गोपाल वर्मा, दुल्कर सलमान, ब्रह्मानंदम आणि मृणाल ठाकूर यांसारखे कलाकारही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसत आहेत.
‘कल्की 2898 AD’ सिनेमाची एकूण आतापर्यंतची कमाई
गुरुवार – 22.50 कोटी
शुक्रवार – 23.25 कोटी
शनिवार – 26.25 कोटी
रविवार – 40.15 कोटी
सोमवार – 16.50 कोटी
मंगळवार – 13 कोटी
बुधवार – 11.50 कोटी
यावर्षी सर्वाधिक कमाई करणारे हिंदी चित्रपट
फायटर- 337.20 कोटी रुपये
शैतान- 211.06 कोटी
क्रू- 157.08 कोटी
कल्की- 153.15 कोटी
तेरी बातों में ऐसा उलझा जिया – 133.64 कोटी
या वर्षी जगभरात सर्वाधिक कमाई करणारे भारतीय चित्रपट
कल्की – 700 कोटी
हनुमान- 350 कोटी
फायटर- 337.2 कोटी
मंजुम्मेल बॉईज- 242.3 कोटी
शैतान- 211.06 कोटी