‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘खोताची वाडी’ अख्खं पिक्चर काय, वेबसिरिज बनेल
पब्लिकला खुर्चीला खिळवून ठेवेल (हातातील मोबाईलचा, व्हाॅटसअपचा विसर पडेल) असं पिक्चरमध्ये काय हवं असते?
चांगली थीम आणि त्याची जबरा टर्न आणि ट्विस्ट असणारी अशी मांडणी. खुर्चीला खिळवून ठेवेल असा मसाला.
आमच्या गिरगावातील खोताची वाडीत ते केवढं तरी खच्चून भरलयं. आमची ही वाडी शंभरपेक्षा जास्त वर्ष जुनी आहे. म्हणजेच तिला इतिहास आहे, इंग्रजकालीन मुंबईच्या खाणाखुणा त्यात आहेत. तरी आजही टवटवीत आहे. गोव्याची आठवण येईल अशी वाडीची रचना आहे, त्यात ख्रिश्चनांची टुमदार घरे, क्लब व जिजस आहे. मराठी माणसांच्या दहा बाय दहाच्या खोल्या, चाळी, गल्लीबोळं, उच्च मध्यमवर्गीयांची घरे हे देखील आहे. अनेक वर्ष येथे मराठी माणूस व ख्रिश्चन एकत्र गुण्यागोविंदाने राहिले. कालांतराने त्यात एकेक करत भय्या, गुजराती, मारवाडी, जैन आले तरी मूळ खोताची वाडीचे महत्त्व, आकर्षण, व्यक्तिमत्व, ग्लॅमर आजही कायम आहे आणि यापुढेही कायम राहील. अगदी विदेशातही खोताची वाडीची कीर्ति पोहचल्याने तेथूनही हा ऐतिहासिक ठेवा पाहायला अथवा अभ्यासायला कोणी येतच असते. अधूनमधून एखादी सेलिब्रिटीज आमच्या या वाडीत फोटो सेशन करते. (Khotachi wadi)
असं बरंच काही असलेल्या या खोताची वाडीवर (Khotachi wadi) एखादा चित्रपट, मालिका, वेबसिरिज निर्माण करावी असे अजूनही एकाद्या पटकथा व संवाद लेखक, निर्माता व दिग्दर्शक यांनी कसं नाही वाटतं. का नाही दिसलं? पिरियड फिल्म तर नक्कीच पडद्यावर येऊ शकते. साठ अथवा सत्तरच्या दशकातील खोताची वाडीचे आयुष्य काही वेगळेच होते. गती सावकाश होती. संध्याकाळी सात वाजता म्युनिसिपालटीचे दिवे लावायला एकजण येई तसाच तो भल्या सकाळी तेच दिवे बंद करायला येई. पहाटेपासूनच रस्त्यावर झोपणारे उठायला सुरुवात होई, सकाळ होत असतानाच घरोघरी पेपर येई, घरी येणारे एक वृत्तपत्र माहिती, मनोरंजन व प्रबोधन करे. काय ताकद आणि विश्वासार्हता होती हो. मग साडेआठ नऊ वाजल्यापासून वसई असं ओरडणारा वसईची भाजीवाला, मग मीठवाला, त्यानंतर चाकू सुरीला धार लावणारा, मग बोहारीण वगैरेंचे येणे सुरु होई. नोकरदारांचे घराबाहेर पडणे, शाळा काॅलेजसाठी घराबाहेर पडणे याला एक वेगळीच लय असे. ‘सातच्या आत घरात’ मुलांनी घरात यावे अशी कौटुंबिक प्रथा होती. रात्री नऊनंतर हळूहळू चिडीचूप.
कोणी रात्रीचा नऊचा सिनेमा पाहून बारा वाजता घरी आले तर तेवढाच हलकासा आवाज. सकाळी साडेचार वाजता पाणी येणार म्हणून घरातला छोटा दिवा लावून पाणी भरण्याची लगबग सुरु. नळ एक तसेच टाॅयलेटही मोजकीच. चाळीत त्यासाठी रांग लावून जमेल तितकं पाणी भरा. सात वाजता पाणी जाणार म्हणून मध्यमवर्गीय असो वा ख्रिश्चन सगळेच पाणी भरुन ठेवणार. खोताची वाडी म्हणजे प्रार्थना समाज, अमृत वाडी, निकदवरी लेन आणि गिरगाव यांना जोडणारी वस्ती आणि म्हणूनच इकडून तिकडे ये जा करणारे बरेच. नवखा माणूस वाडीत हमखास चुकणार. कधी दोन चारदा आलेलाही चुकणार. म्हणूनच या वाडीला चक्रव्यूह म्हणतात. रात्री बारानंतर वाडीत मान नसणारा माणूस (मानकाम्या म्हणत) फिरतो अशी दीर्घकालीन अफवा आणि भीती. खडपे यांच्या अनंताश्रममध्ये मासे खाण्यासाठी प्रसंगी वेटींग लिस्टमध्ये उभे राहण्याचीही तयारी. एका ओळीत उत्तर द्या अशा मुलाखतीत आवडते हाॅटेल म्हणून उर्मिला मातोंडकर याच हाॅटेलचे नाव घ्यायची. अनेक मराठी चित्रपट व नाट्य कलाकार झालेच पण रणधीर कपूरही याचेच नाव घेई.
खोताची वाडीत (Khotachi wadi) अनेक साहित्यिक, नाटककार, लेखक, दिग्दर्शक, पत्रकार, कलाकार, तंत्रज्ञ, मेकअपमन, खेळाडू, डाॅक्टर, प्रकाशक, इंजिनिअर घडले. अनेक चित्रपटांचे शूटिंगही अनेक वर्ष होतेय. मी अगदी लहानपणी आमच्या या वाडीत राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटाचे खंडेराव ब्लाॅक येथे पाहिलेले शूटिंग मी आयुष्यात पाहिलेले पहिले चित्रीकरण होय. केवढा थ्रील झालो होतो हो. आमच्या या वाडीत निळू फुले, अशोक सराफ, वर्षा उसगावकर, प्रशांत दामले, शेखर कपूर, इरफान खान अशा अनेकांनी शूटिंग केलेय. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटातही खोताची वाडी आहे. गल्ली चित्रपट व गल्ली क्रिकेट यांची तर आमच्या वाडीत मोठीच परंपरा आहे.(Khotachi wadi)
========
हे देखील वाचा : या विविधतेच ‘राज’ काय?
========
वाडीच्या समोरच मॅजेस्टिक थिएटर होते. मूकपटाच्या काळापासून ते होते. पहिला हिंदी बोलपट अर्देशीर इराणी दिग्दर्शित ‘आलम आरा’ (१९३१) आणि पहिला मराठी बोलपट व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘अयोध्येचा राजा’ (१९३२) येथेच रिलीज झाले. या थिएटरकडे आमच्या वाडीचाच एक भाग म्हणून आम्ही अभिमानाने पाहायचो. हा ट्रेलर ठरावा असे भरपूर व भन्नाट मटेरियल खोताची वाडीत आहे. लेखक, दिग्दर्शक व कॅमेरामन अतिशय हौसेने या वाडीवर पिरियड फिल्म करेल आणि ती वेगळीच ठरेल. (हिट ठरेल की नाही हे पाहिल्यावर लक्षात येईल. हा अलिखित नियम प्रत्येक पिक्चरला असतो. तो फार कोणी सिरीयसली घेत नाही ते सोडा.) ‘खोताची वाडी’ (Khotachi wadi) हे जगभरात जेथे जेथे मराठी माणूस पोहचायला ते माहित आहे. त्यामुळे वेगळे प्रमोशन ते नकोच. कोणी तरी ही संधी नक्कीच घेईल हा विश्वास आहे.