जे गाणे गायला किशोरजी भीत होते तेच गाणं गाऊन केलं हिट
शक्ती सामंत यांच्या आराधना या चित्रपटानंतर राजेश खन्ना आणि किशोर कुमार या दोघांचे भाग्य उजळले. पुढची पाच वर्ष या दोघांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. यानंतर किशोर कुमारची चलती कायमस्वरूपी चालू राहीली. राजेश खन्नासाठी किशोर कुमार हे कॉम्बिनेशन प्रेक्षकांना प्रचंड आवडले. असे असतानाही काही गाण्यांमध्ये राजेश खन्नासाठी रफी, मुकेश, मन्नाडे यांचा देखील स्वर वापरला गेला. आज अशाच एका सुपरहिट गाण्याची गोष्ट. (Kishorkumar)
तुम्हाला माहिती आहे का ? ‘दुश्मन’ (१९७१) चित्रपटात राजेश खन्नावर चित्रित केले गेलेले हे गाणे गायला सुरुवातीला किशोर कुमारने चक्क नकार दिला होता. काय होता किस्सा? कोणते होते ते गाणे ? १९६९ साली राजेश खन्नाचा ‘आराधना’ प्रदर्शित झाला आणि सिनेमाची सगळी गणितंच बदलून गेली. तिथून पुढे सलग १६ सिनेमे राजेश खन्नाने सिल्वर जुबली करून दाखवले. हा विक्रम आज देखील अबाधित आहे. याच काळात १९७१ साली राजेश खन्नाचा एक चित्रपट आला होता. दुलाल गुहा दिग्दर्शित ‘दुश्मन’. (Kishorkumar)
या चित्रपटात राजेश खन्नाची नायिका मुमताज होती. या चित्रपटात मीनाकुमारीचा देखील एक अप्रतिम असा रोल होता. या चित्रपटातील सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायलेली होती. यात एक कव्वाली होती. थेट कव्वाली नसली तरी ते गीत कव्वाली स्टाईलने गाऊन घेतली गेले. गाण्याचे बोल होते ‘वादा तेरा वादा…’ जेव्हा हे गाणे कव्वालीचे रूपात डमी रेकॉर्ड करून लक्ष्मीकांत यांनी किशोर कुमार यांच्याकडे पाठवले तेव्हा किशोर कुमार यांनी फोन करून लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सांगितले,” अरे हे गाणे तर कव्वाली आहे. कव्वाली हा माझा प्रांत नाही. हे गाणे मी गाऊ शकणार नाही. तुम्ही हे गाणे मोहम्मद रफी यांच्याकडून गाऊन घ्या. रफी साब ये गाने को चार चांद लगायेंगे!” त्या काळात सर्व कलाकारांमध्ये एक निरोगी स्पर्धा होती. त्यामुळे एकमेकांचे पाय ओढण्यापेक्षा एकमेकांना सपोर्ट करणं अधिक होत होतं. त्यातलाच हा एक प्रकार होता.
तरी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना हे गाणे राजेश खन्नासाठी आहे म्हणून किशोर कुमारने गावे असे वाटत होत. रेकॉर्डिंग रूम मध्ये पेच प्रसंग निर्माण झाला. शेवटी अभिनेता राजेश खन्नाला हा प्रकार कळवण्यात आला. हा किस्सा विविध भारतीवरील एका कार्यक्रमात अमित कुमार यांनी सांगितला होता. अमित कुमार पुढे सांगतात,” तेव्हा मी लहान होतो आणि वडील किशोर कुमार यांच्यासोबत रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये गेलो होतो. राजेश खन्ना तेव्हा सुपरस्टार होते. ते हिरव्या रंगाच्या मर्सिडीज मधून रेकॉर्डिंग स्टुडिओत आले. मी पहिल्यांदाच राजेश खन्ना यांना पाहत होतो. राजेश खन्ना ने किशोर कुमार यांना विचारले ,” बाबूमोशाय क्या मेरा गाना आप नही गाओगे??” राजेश खन्नाच्या वाक्याने किशोर कुमार थोडे गंभीर झाले. आणि म्हणाले,” ऐसी बात नही है. लेकिन कव्वाली मुझसे बेहतर मोहम्मद रफी गा सकते है. इसलिये आप ये गाना उन्हीसे गवा लीजिए.” त्यावर संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणाले,” हे गाणे कव्वाली स्वरूपात जरी असले तरी मुकाबला कव्वाली नाही. त्यामुळे तुम्हीच हे गाणे चांगले जाऊ शकाल!” दिग्दर्शक दुलाल गुहा यांनी देखील किशोर कुमार यांना हे गाणे तुम्हीच गावे अशी पुन्हा विनंती केली. (Kishorkumar)
राजेश खन्ना, लक्ष्मीकांत प्यारेलाल, दुलाल गुहा या सर्वांच्या विनंतीला मान देऊन किशोर कुमार गायला तयार झाले. आणि गाण्यापूर्वी त्यांनी सांगितले,” मै गाने कि कोशिश करता हूं. लेकिन अगर अच्छा गाना नही हुआ तो आपको रफी साबसे गवाना पडेगा.” त्यावर सर्वांचे एकमत झाले आणि किशोर कुमार यांनी गायला सुरुवात केली. किशोर कुमार ने अतिशय अप्रतिम रीतीने ते गाणे गायले. आणि अशा पद्धतीने जे गाणे किशोर कुमारला जायचे नव्हते ते त्यांच्याकडून गाऊन घेतले गेले. असाच काहीसा प्रकार पण उलटा त्याच वर्षी आलेल्या ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाच्या वेळी देखील झाला होता. (Kishorkumar)
=========
हे देखील वाचा : राजेंद्रकुमार यांना मेहबूब यांचा मृत्यू आयुष्यभर लक्षात राहिला
=========
चिनाप्पा देवर दिग्दर्शित ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटातील सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायलेली होती पण यातील एक गाणे जेव्हा किशोर कुमार यांच्याकडे आले त्यावेळेला त्यांनी नम्रपणे नकार देत हे गाणे तुम्ही मोहम्मद रफी यांच्याकडून करून घ्या असे सांगितले. कारण या गाण्यांमध्ये भरपूर मोठ्या ताना होत्या जे त्यांना गाणे शक्य नव्हते. रफीने देखील आनंदाने त्या चित्रपटातील ते एकमेव गाणे गायले. या गाण्याचे बोल होते ‘नफरत की दुनिया को छोड कर प्यार की दुनिया मे खुश रहना मेरे यार…’ ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटातील हे सर्वाधिक लोकप्रिय गाणे ठरले. अशा पद्धतीने किशोर कुमार यांनी नकार दिलेले एक गाणे रफी ने गायले आणि सुपरहिट ठरले आणि दुसरे गाणे जे किशोर कुमार यांना वाटत होते रफी ने गावे ते त्यांनी स्वतः गायले आणि ते देखील सुपर हिट ठरले !