ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट शर्माजी नमकीन!
ऋषी कपूर हे एव्हरग्रीन अभिनेते होते. 1973 मध्ये बॉलिवूडला ऋषी कपूर नावाचा चॉकलेट हिरो मिळाला. कपूर घराण्याच्या या कलाकारानं बॉलिवूडमध्ये आपलं भक्कम स्थान निर्माण केलं. मेरा नाम जोकर या चित्रपटातून बाल कलाकार म्हणून ऋषी कपूर बॉलिवूडमध्ये आले आणि आता शर्माजी नमकीन (Sharmaji Namkeen) सारख्या दर्जेदार चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी बॉलिवूडमधून एग्झिट घेतली.
अभिनयाच्या माध्यमातून ऋषी कपूर कायम आपल्या चाहत्यांच्या मनात रहाणार आहेत. नुकताच ऋषी कपूर यांचा ‘शर्माजी नमकीन (Sharmaji Namkeen)’ हा चित्रपट ओटीटी माध्यमावर रिलीज झाला आहे. अत्यंत सहजसुंदर अभिनय आणि आपल्या आसपास घडतेय असं कथानक, यासाठी हा चित्रपट नक्की पहावा असाच आहे.
शर्माजी नमकीन या चित्रपटाचे शुटींग चालू असतांनाच ऋषी कपूर यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना कर्करोगावरील उपचार करण्यासाठी अमेरिकेला जावे लागले. तिथून आल्यावर 2020 मध्ये ऋषी कपूर यांचे निधन झाले. त्यादरम्यान कोरोनाचा उद्रेक झाला होता. ऋषी कपूरच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का होता.
या सर्वांत ‘शर्माजी नमकीन (Sharmaji Namkeen)’ हा चित्रपटही अर्धाअधिक पूर्ण झाला होता. मात्र ऋषी कपूर यांचे काही सीन बाकी राहिले होते. अशावेळी काय करायचे हा प्रश्न दिग्दर्शकासमोर उभा राहिला, तेव्हा ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतला. ऋषी कपूर यांनी शूट केलेला भाग तसाच ठेऊन उर्वरीत भागात त्यांच्या भूमिकेत परेश रावल यांना घेऊन हा चित्रपट पूर्ण करण्यात आला. त्यामुळे ऋषी कपूर यांच्या चाहत्यांसाठी आपल्या आवडत्या अभिनेत्याला पहाण्याची आणि त्यांचा दर्जेदार अभिनय पहाण्याची ही अनोखी संधी आहे.
‘शर्माजी नमकीन’ हा एक मजेदार कौटुबिंक कथेवर आधारीत चित्रपट आहे. उतारवयात आलेला एकाकीपणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळताना होणारी तारांबळ, मोठी झालेली मुलं, त्यांच्या आणि पालकांच्या विचारातील दुरावा या सर्वांवर बोट ठेवणारा हा चित्रपट आहे.
बीजी शर्मा हे दिल्लीच्या सुभाषनगर मध्ये आपल्या दोन मुलांसह रहात असतात. त्यांच्या पत्नीचे आजारपणात निधन झालेले असते. त्यांचा मोठा मुलगा संदिप शर्मा उर्फ रिंकू एका खाजगी कंपनीमध्ये कामाला असतो आणि तिथेच त्याचे एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण चालू असते व दोघंही लग्नाच्या तयारीत असतात.
शर्माजींचा लहान मुलगा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला असतो. पत्नी गेल्यावर घरातील सर्व जबाबदारी शर्माजींवर येते. ते उत्तम स्वयंपाक करतात. नवीन पदार्थ करण्याचा त्यांना छंद असतो. नोकरीतून निवृत्त झाल्यावर मात्र आपला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा रहातो. त्यांचा मित्रपरिवार मोठा असला, तरीही रिकाम्यावेळी काय करायचे हा प्रश्न उभा असतोच.
====
हे देखील वाचा: The Kashmir Files Review – काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
====
अशावेळी त्यांचे मित्र त्यांना चाट कॉर्नर सुरु करण्याचा सल्ला देतात. पण शर्माजींची मुलं हा प्रस्ताव फेटाळून लावतात. मात्र शर्माजी मित्रांच्या सांगण्यानुसार एका किटी पार्टीमध्ये जेवण बनवायला जातात. आणि हिट होतात. त्यांच्या हाताची चव सर्वांना आवडते. शर्माजी मुलांपासून लपवून आपला केटरिंगचा बिझनेस सुरु करतात.
दरम्यान त्यांच्या मोठ्या मुलाला फ्लॅट खरेदीमध्ये फसविले जाते. या सर्वात शर्मांजींच्या बिझनेसची माहितीही मुलांना मिळते. या सर्व घोळाचा निस्तारा शर्माजी कसा करतात हे चित्रपटातच पाहणे रंजक ठरणार आहे.
दिग्दर्शक हितेश भाटीया यांनी शर्माजी चित्रपटात केलेली कसरत बघण्यासारखी आहे. शर्माजींच्या भूमिकेत कधी ऋषी कपूर तर कधी परेश रावल आपल्याला दिसतात. मात्र त्यांनी चित्रपटाचा साचा बिघडत नाही.
ऋषी कपूर यांनी जेवढ्या सहजपणे दिल्लीनिवासी शर्मांजींची भूमिका साकारली आहे, ती सहजता मात्र नक्की बघायला हवी अशीच आहे. विशेषतः ऋषी कपूर आणि जुही चावला यांचे एकत्र सीन खूप बोलके आहेत. याशिवाय सतीश कौशिक, आयशा रजा शीबा चड्ढा, सुहैल नय्यर, ईशा तलवार, परमीत सेठी यांच्या भूमिकाही चांगल्या झाल्या आहेत.