‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
डोळ्यांतून बोलणारी अभिनेत्री… नूतन!
स्थळ: चांदिवली स्टुडिओ, अंधेरी (पूर्व)
निमित्त: इन्सानियत चित्रपटाचे शूटिंग
सेटवर अमिताभ बच्चन आणि नूतन यांच्यावर काही दृश्ये चित्रीत होत होती.
अमिताभचे मेकअपमन दीपक सावंत यांच्या मुलाखतीसाठी मी त्या सेटवर होतो. लंच ब्रेकमध्ये आपण बोलूया असे दीपकजी म्हणाले. तोपर्यंत, अमिताभ आणि नूतनवर काही दृश्ये चित्रीत झाली आणि दिग्दर्शकाने ब्रेक म्हणताच लाईटस् बंद होत सर्वसाधारण वातावरण निर्माण झाले. दीपकजींनी अगदी आवर्जून माझी नूतनजींशी ओळख करून दिली. त्या छोट्याश्या भेटीत मी त्यांना विचारले, अमिताभसोबत तुम्ही सुधेन्द्रू राॅय दिग्दर्शित ‘सौदागर’ (Saudagar) (१९७३) मध्ये भूमिका साकारल्यावर आता पुन्हा योग आला असता, तुमच्या मनात नेमके काय विचार आहेत? यावर नूतनजींनी उत्तर दिले, ‘सौदागर निर्मितीच्या काळात अमिताभ स्टार झाला नव्हता. ‘जंजीर’ रिलीज व्हायचा होता. पण सेटवर अगदी वेळेवर येणे, सिनियर कलाकारांचा आदर ठेवणे, दिग्दर्शकाकडून व्यवस्थित दृश्य समजावून घेणे हे गुण तेव्हाही होते आणि अगदी आजही त्याचे ते गुण कायम आहेत. आपल्या गुणवत्तेला व्यावसायिकतेची उत्तम जोड कशी द्यावी याचे तो उत्तम उदाहरण आहे.’
नूतनजी अतिशय उत्तम मराठीत बोलत होत्या हे मला विशेष वाटले. नूतनजींच्या वागण्यात आपण हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्री आहोत, असे कुठेही काहीही जाणवत नव्हते. नूतन यांच्या रुपेरी कारकिर्दीचा पट मांडताना त्यांनी साकारलेल्या अनेक प्रकारच्या भूमिका समोर येतात. नूतन अनेक रंगढंगाच्या गाण्यातूनही आपल्या अष्टपैलू अभिनयाचा आविष्कार साकारताना दिसतात, वो चांद खिला तारे हसे (अनाडी), काली घटा छाए मोरा जिआ तरसाये (सुजाता), तेरी राहो मे खडे हैं दिल थामके (छलिया), छोड दो आंचल जमाना क्या कहेगा (पेईंग गेस्ट), माना जनाब ने पुकारा नहीं (पेईंग गेस्ट), ओ निगाहे मस्ताना (पेईंग गेस्ट), सावन का महिना पवन करे शोर (मिलन), हम तुम युग युग से गीत मिलन के (मिलन), तू कहा ये बता (तेरे घर के सामने), एक दिन बनाऊंगा (तेरे घर के सामने), दिल का भंवर करे पुकार (तेरे घर के सामने), नील गगन पर उडते बादल (खानदान), तू ही मेरी मंजिल (खानदान), बचपन के दिन क्या दिन थे (सुजाता), मेरा गोरा अंग ले ले (बंदिनी), ओ जोगी जबसे तू आया मेरे व्दारे (बंदिनी), मै तो भूल चली (सरस्वतीचंद्र), चंदन सा बदन (सरस्वतीचंद्र), तेरा मेरा साथ रहे (सौदागर) अशा सर्वकालीन लोकप्रिय गाण्यातूनही नूतन यांचे अस्तित्व आणि अष्टपैलूत्व पटकन डोळ्यासमोर येतेच.
यातील काही गाणी एकट्या नूतनजींवर आहेत तर काही गाण्यात त्यांच्यासोबत त्या चित्रपटातील नायक (राज कपूर, देव आनंद, सुनील दत्त वगैरे) आहेत. या गाण्यात कधी प्रेम भावना, कधी खट्याळपण तर कधी उदासिनता अशा अनेक प्रकारच्या भावना दिसून येतात. या सगळ्यात त्या आपल्या डोळ्यांनी बरेच काही बोलतायत हे दिसून येते. नूतन यांचं रुपडं तसं अगदी साधं. (आजच्या ग्लोबल युगातील अभिनेत्रींच्या तुलनेत तर अगदीच सर्वसाधारण), पण रुप नव्हे, अभिनय महत्वाचा, ते वेगळ्या प्रकारचे सौंदर्य आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे नूतन. आपल्या दर्जेदार अभिनयाने त्यांनी सौंदर्याची एक वेगळी ओळख आणि व्याख्या निर्माण केली.
हे देखील वाचा: समर्थ आणि मुखर्जी घराण्याचा वारसा तितक्याच समर्थपणे सांभाळणारी गुणी अभिनेत्री म्हणजे काजोल.
भारतीय चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील नूतनजींचे (Nutan) (जन्म ४ जून १९३६) महत्वाचे स्थान आहे. स्टार फोटोग्राफर गौतम राजाध्यक्ष तर कायमच नूतन यांना जगातल्या सर्वात सुंदर स्त्रियांपैकी एक समजत असे. कमालीचा फोटोजेनिक चेहरा, सडसडीत अंगकाठी आणि उंच बांधा. हे त्यांचे व्यक्तिमत्व. नाना पाटेकरही कायमच आपल्या आवडत्या अभिनेत्रींमध्ये नूतन यांचेच नाव घेतो. नूतनच्या महत्वाच्या चित्रपटांची नावे सांगायची तर, सीमा, पेइंग गेस्ट, बंदिनी, सुजाता, अनाडी, सोने की चिडिया, सूरत और सिरत, दिल ही तो है, दिलने फिर याद किया, दुल्हन एक रात की, लाटसाब, यादगार, अनुराग, सौदागर, मै तुलसी तेरे आंगन की इत्यादी वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची नावे घेता येतील. एकदा मात्र नूतनजी वादात सापडल्या होत्या, कारण काय तर, एस. डी. नारंग दिग्दर्शित ‘दिल्ली का ठग’ (१९५८) या चित्रपटात त्यांनी परिधान केलेला स्विमिंग कॉश्च्युम. साठ बासष्ट वर्षापूर्वी चित्रपटाच्या पारंपरिक नायिकेने असा ड्रेस परिधान करणे म्हणजे खूपच मोठा कल्चरल शाॅक होता.
आपण दिलीपकुमारची नायिका असावे असे अनेक अभिनेत्रींप्रमाणेच नूतनचेही स्वप्न होते आणि रमेश सैगल दिग्दर्शित ‘शिकवा’ (१९५४) या चित्रपटात तशी संधीही मिळाली. पण काही रिळांच्या शूटिंगनंतर हा चित्रपट बंद पडला आणि नूतन हळहळल्या (कालांतराने अशाच मध्येच बंद पडलेल्या चित्रपटांवर ‘फोकस’ टाकलेल्या ‘फिल्म ही फिल्म’ या चित्रपटात ‘शिकवा’ची दृश्ये पाह्यला मिळतात) पुढे सुभाष घई दिग्दर्शित ‘कर्मा’ आणि बी. गोपाल दिग्दर्शित ‘कानून अपना अपना’ या चित्रपटात हे दोन महान कलाकार चरित्र भूमिकेत एकत्र आले. नूतनसाठी ही संधी सुखावह होती. तर नायिकापदाची वाटचाल उताराला असताना नूतनने भूमिका साकारलेल्या चित्रपटात अरविंदकुमार सिन्हा दिग्दर्शित ‘ग्रहण’ (१९७२) विशेष म्हणायला हवा. या चित्रपटात सुभाष घई नूतनचा नायक होता. (सुभाष घई आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अभिनेता म्हणून धडपडत होता)
ऐंशीच्या दशकात नूतनने मोठ्या प्रमाणावर चरित्र भूमिका साकारल्या. त्यातील काही विशेष उल्लेखनीय चित्रपटांमध्ये सुभाष घई दिग्दर्शित ‘मेरी जंग’ आणि महेश भट्ट दिग्दर्शित ‘नाम’ या चित्रपटांचा उल्लेख हवाच. ‘नाम’ हा चित्रपट म्हणजे यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’चा रिमेक म्हणता येईल. ‘दीवार’चे लेखन सलिम जावेद यांचे आहे तर ‘नाम’ एकट्या सलिम खान यांचा आहे. या दोन्ही चित्रपटांच्या थीममध्ये बरेच साम्य आहे. दोन भिन्न प्रवृत्तीचे भाऊ आणि करारी आई. ‘नाम’मध्ये नूतनने आई साकारलीय. तर प्रभाकर नायक दिग्दर्शित ‘दाम करी काम’ (१९७१) ची कथा पटकथा संवाद लेखक राम केळकर यांनी, याच चित्रपटावरुन हिंदी चित्रपट लिहिला. सोहनलाल कंवर दिग्दर्शित ‘पैसा पैसा पैसा’ (१९८५). या रिमेकमध्ये मूळ चित्रपटात सुमती गुप्ते यांनी साकारलेली भूमिका हिंदीत नूतनने केली.
नूतन यांचा आवाज चांगला होता आणि स्वत:ची गाणी स्वत: गायला हवीत असे त्यांना मनापासून वाटायचे. त्याच्या आईने निर्माण केलेल्या “छबिली” या चित्रपटात त्यांची ही इच्छा पूर्ण झाली. त्यातील दोन गाणी बरीच लोकप्रिय झाली. नूतन महाराष्ट्रीय, शोभना समर्थ आणि कुमारसेन समर्थ यांची मोठी मुलगी (तनुजा नूतनची धाकटी बहिण) त्यामुळे त्यांनी मराठी चित्रपटात भूमिका साकारणे अगदी स्वाभाविक होतेच. (नूतनची आई शोभना समर्थ या चाळीसच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्री होत्या.)
किशोर मिस्कीन निर्मित आणि दिग्दर्शित ‘पारध’ (१९७७) या मराठी चित्रपटात नूतनने हवेलीच्या मालकिणीची मध्यवर्ती भूमिका साकारली. या चित्रपटात सचिन आणि सारिका हे नायक नायिका होते. हा चित्रपट एकाच वेळेस मराठी व हिंदी अशा दोन्ही भाषेत निर्माण झाला. नूतन १९५१ साली ‘मिस इंडिया’ या किताबाच्या मानकरी होत्या. १९७४ मध्ये केंद्र शासनाने त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार प्रदान केला. नूतनजींचे लग्न रजनीश बहेल यांच्याशी ११ ऑक्टोबर १९५९ रोजी झाले. त्यांचा मुलगा मोहनीश बहेल याने ‘तेरी बाहो मे’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. कालांतराने त्यांची मुलगी प्रनूतनही याच क्षेत्रात आली. मोहनीश बहेलने आपल्या आईच्या स्मरणार्थ आपल्या मुलीचे नाव प्रनूतन ठेवले. त्यामुळे नूतन आजच्या ग्लोबल युगातील रसिकांनाही माहित झाल्या.
नूतन यांचे २१ फेब्रुवारी १९९१ रोजी निधन झाले. नूतन म्हणताच,त्यांच्या अनाडी या चित्रपटामधील वो चांद खिला तारे हंसे या गाण्यातील तसेच ‘मिलन’ या चित्रपटातील सावन का महिना गाण्यातील त्यांचं रुपडं पटकन डोळ्यासमोरयेतं आणि त्या डोळ्यांनी खूप काही बोलायच्या हे आठवतं.