दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
हम दिल दे चुके सनम: चित्रपटात इटलीच्या नावाखाली दाखवले होते हे दोन देश
अजय देवगण, ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांचा ‘लव्ह ट्रँगल’ असलेला १९९९ सालचा म्युझिकल हिट चित्रपट म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’ (Hum Dil De Chuke Sanam). भव्य दिव्य सेट्स, शास्त्रीय संगीत आणि एक खिळवून ठेवणारी प्रेमकहाणी. यामुळे हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला. या चित्रपटानेच ऐश्वर्याला प्रगल्भ अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली.
पंडित दरबार (विक्रम गोखले) एक मोठे नामांकित शास्त्रीय गायक. समीर (सलमान खान) खास इटलीहून त्यांच्याकडे गाणं शिकण्यासाठी येतो. गाण्याच्या शिक्षण घेत असताना समीर आणि पंडितजींची मुलगी नंदिनी (ऐश्वर्या राय) एकमेकांच्या प्रेमात पडतात. परंतु हे जेव्हा पंडितजींना समजतं तेव्हा पंडितजी समीरला निघून जायला सांगतात. याच दरम्यान नंदिनीला वनराजचं (अजय देवगण) स्थळ येतं आणि नंदिनीचं लग्न वनराजशी ठरतं.
वनराज नंदिनीवर मनापासून प्रेम करत असतो. पण लग्नानंतर जेव्हा वनराजला समीर आणि नंदिनीच्या प्रेमकहाणीबद्दल कळतं. तेव्हा वनराज नंदिनीला समीरकडे घेऊन जायचं ठरवतो. तो काळ सोशल मीडिया आणि मोबाईल/ स्मार्टफोनचा नव्हता. त्यामुळे इटलीला निघून गेलेल्या समीरला शोधणार कसं, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. पण तरीही वनराज नंदिनीला घेऊन इटलीला जातो. पुढे समीर या दोघांना भेटतो का? विवाहित नंदिनीचा तो स्वीकार करतो का? वनराजचं पुढे काय होतं? या सर्व प्रश्नांची उत्तरं थेट चित्रपटाच्या शेवटी मिळतात.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित या चित्रपटाला संगीत दिलं होतं इस्माईल दरबार यांनी. हा चित्रपट त्यावर्षीचा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. चित्रपटाला एकूण ८ फिल्मफेअर पुरस्कार मिळाले होते. यामध्ये ऐश्वर्या रायला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. आता या चित्रपटाच्या मेकींग दरम्यानच्या काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल माहिती घेऊया (Lesser known facts about Hum Dil De Chuke Sanam)
राजा हिंदुस्थानी चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान झाली ऐश्वर्याची निवड
राजा हिंदुस्तानी चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान ऐश्वर्या रायने संजय लीला भन्साळींना भेटून त्यांच्या ‘खामोशी -द म्युझिकल’ चित्रपटाचं कौतुक केलं. संजय लीला भन्साळी त्यावेळी या चित्रपटाच्या कथेवर काम करत होते. जेव्हा ऐश्वर्याची भेट झाली तेव्हा तिला पाहताक्षणी ते मनात म्हणाले, “Yes, She is my Nandini.. (ये तो है मेरी नंदिनी).
बंगाली कादंबरीवर आधारित
या चित्रपटात गुजरातची पार्श्वभूमी दाखवण्यात आली असली तरी चित्रपटाची संकल्पना मैत्रेयी देवी यांच्या ‘ना हन्यते’ या बंगाली कादंबरीवर आधारित होती.
चित्रपटात दाखवला आहे भन्साळी यांच्या आयुष्यातील प्रसंग
चित्रपटात समीर नेहमी आकाशाकडे बघून त्याच्या वडिलांशी बोलत असतो. प्रत्यक्षात ही सवय भन्साळी यांची असून ते देखील आपल्या दिवंगत वडिलांशी असंच बोलत असत. त्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक अशी दृश्य चित्रपटामध्ये घेतली.
रील लाइफसोबत रिअल लाईफ प्रेमकहाणी
चित्रपटामधील नंदिनी आणि समीरच्या प्रेमकहाणीसोबतच खऱ्या आयुष्यात सलमान खान आणि ऐश्वर्या यांची प्रेमकहाणी सुरु झाली होती.
सलमानला मान्य नव्हता शेवट
चित्रपटाचा शेवट सलमान खानला आवडला नव्हता. त्यामुळे तो बदलण्यासाठी त्याने संजय लीला भन्साळी यांना खूप विनंती केली. पण भन्साळी आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
इटली नाही तर, बुडापेस्ट आणि हंगेरी
चित्रपटात नंदिनी आणि वनराज समीरला शोधण्यासाठी इटलीला जातात असं दाखवण्यात आलं आहे. परंतु या दरम्यानचं सर्व चित्रीकरण इटलीला नाही तर, बुडापेस्ट आणि हंगेरी इथे झालं आहे. तर, अशा पद्धतीनं प्रेक्षकांना इटलीच्या नावावर बुडापेस्ट आणि हंगेरी दाखवण्यात आलं. (Lesser known facts about Hum Dil De Chuke Sanam)
==========
हे ही वाचा: हे आहेत भारतामधील विवादित टॉप १० चित्रपट ज्यांच्यावर सेन्सॉरने बंदी घातली…
दाक्षिणात्य आणि मराठी चित्रपटांचा बोलबाला…. बॉलीवूडला मात्र ठेंगा
मनीषा कोईराला होती पहिली पसंती
===========
जेव्हा संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटावर काम सुरु केलं तेव्हा त्यांनी नंदिनीच्या भूमिकेसाठी मनीषा कोईरालाच्या नावाचा विचार केला होता. परंतु दोघांमध्ये काहीतरी गैरसमज निर्माण झाले आणि त्यानंतर भन्साळींनी तिच्यासोबत पुन्हा काम न करण्याचा निर्णय घेतला. मनीषा नंतर करीनाच्या नावाचाही विचार भन्साळींनी केला होता. परंतु भूमिकेसाठी प्रगल्भ नायिका आवश्यक होती आणि करीन लहान असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर अल्लडपणा दिसत होता. त्यामुळे त्यांनी हा बेतही रद्द केला. अखेर राजा हिंदुस्थानी चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान त्यांनी ऐश्वर्याला बघताक्षणी तिची निवड पक्की केली.
हा चित्रपट बघायचा असेल, तर Voot, अमेझॉन प्राईम, jio सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मसह युट्युबरही उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटाला ७.४ रेटिंग देण्यात आलं आहे.