जो जिता वही सिकंदर: कास्टिंगमध्ये होणारे सततचे बदल ठरले होते निर्मात्यासाठी डोकेदुखी
सन १९९२ त्रिकोणी प्रेमकथा आणि हाणामारीचे चित्रपट तेव्हा गर्दी खेचत होते. अजय देवगण, अक्षय कुमार, सुनील शेट्टी असे कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेले नायक तेव्हा नुकतेच उदयास आले होते. त्रिकोणी प्रेमकथांना तेव्हा रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. अशा परिस्थितीत सायकल रेसवर आधारित एक चित्रपट बनवण्याचा विचार करणं आणि तो अतिशय कमी बजेटमध्ये बनवणं हेच मुळी धाडसाचं काम होतं. पण हे धाडस केलं दिग्दर्शक मन्सूर खान व निर्माते नासिर खान यांनी आणि चित्रपट होता ‘जो जिता वही सिकंदर’.
‘जो जिता वही सिकंदर’ या चित्रपटात आमीर खान, आयेशा जुल्का, दीपक तिजोरी, पूजा बेदी, कुलभूषण खरबंदा आणि लाईफबॉय फेम मामिक यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपटाचं कथानक तर उत्तम होतंच, पण त्याहीपेक्षा उत्तम होतं ते दिग्दर्शन. एका चांगल्या कथेला उत्तम दिग्दर्शनाची जोड मिळाली आणि कलाकारांच्या सरस अभिनयाने त्यावर कळस चढवला, जोडीला श्रवणीय गाणी. एवढं सगळं असताना चित्रपट सुपरहिट झाला नसता तर नवल होतं.
आवडतं रोमँटिक गाणं कुठलं तर भारतामधील जवळपास ७५% लोकांचं एकच उत्तर असेल, ते म्हणजे ‘पहला नशा, पहला खुमार’. कित्येकजण हे गाणं ऐकून जुन्या आठवणीत रमत असतील. आमिर – आयेशा ही रोमँटिक जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. पण का माहिती नाही ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही.
चित्रपटाची कहाणी तसं बघायला गेलं, तर अजिबातच फिल्मी नाहीये. उलट अगदी आपल्या समोर घडतंय असं वाटावं इतकं साधं कथानक आहे. नैनितालमधली दोन कॉलेजेस झेवियर्स आणि रजपूत. झेवियर्समध्ये श्रीमंत कुटुंबातील मुलं शिकत असत, तर रजपूत कॉलेज सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलांसाठी. या दोन कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांमधील आर्थिक तफावत, राहणीमान, सतत होणारे वाद-विवाद, झेविअर्स मधल्या मुलीबद्दल असणारं आकर्षण या साऱ्या गोष्टी दिग्दर्शकाने अत्यंत सहजपणे दाखवल्या आहेत.
‘जो जिता वही सिकंदर’ एक मास्टरपीस होता याबद्दल काही शंकाच नाही. आजही हा चित्रपट अनेकजण आवडीने पाहतात. पण या चित्रपटाबद्दल अशा काही गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहिती नसतील. (Lesser-known Facts about Jo Jeeta Wohi Sikandar)
कास्टिंग
अनेकांचं असं मत आहे की, चित्रपटाचे कास्टिंग अगदी परफेक्ट जमून आलं होतं. परंतु प्रत्यक्षात मात्र चित्रपटाचं कास्टिंग हा मुद्दा निर्माता व दिग्दर्शकासाठी डोकेदुखी ठरला होता. कारण काही भूमिकांसाठी निवडलेले कलाकार बदलून त्याजागी दुसऱ्याच कलाकारांची वर्णी लागली. कास्टिंगमध्ये झालेल्या सततच्या बदलामुळे चित्रपटाचं चित्रीकरण रखडलं होतं. (Lesser-known Facts about Jo Jeeta Wohi Sikandar)
आयेशा जुल्काच्या जागी दिसणार होती गिरीजा
चित्रपटामध्ये नायिकेची मुख्य भूमिका दाक्षिणात्य अभिनेत्री गिरीजा शेट्टर साकारणार होती. परंतु जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यावर तिने अचानकपणे हा चित्रपट सोडला आणि तिच्याजागी आयेशाला घेण्यात आलं. गिरीजा आधी मुख्य जुही चावलाला ऑफर करण्यात आली होती. परंतु तारखांच्या समस्येमुळे तिने नकार दिला. त्यांनतर ही भूमिका नग्मा साकारणार होती. परंतु तिनेही नकार दिला.
‘अरे यारो मेरे प्यारो’ हे गाणं गिरीजासोबत चित्रीत करण्यात आलं होतं
चित्रपटातील ‘अरे यारो मेरे प्यारो’ हे गाणं गिरीजासोबत चित्रीत करण्यात आलं होतं. संपूर्ण गाण्याचं चित्रीकरण पुन्हा करण्यापेक्षा त्यामधील काही भाग आयेशासोबत पुन्हा चित्रीत करून गाण्याला जोडण्यात आला. त्यामुळे या गाण्यात प्रेक्षक गिरीजाला पाहू शकतात. (Lesser-known Facts about Jo Jeeta Wohi Sikandar)
अक्षयकुमार साकारणार होता दीपक तिजोरीची भूमिका
दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी आधी अक्षयकुमारच्या नावाचा विचार करण्यात आला होता. परंतु निर्मात्यांना त्याची फुटबॉल खेळण्याची पद्धत न आवडल्याने ही भूमिका मिलिंद सोमणला देण्यात आली. काही दिवसांनी मॉडेलिंगच्या भरपूर ऑफर आल्यामुळे मिलिंद सोमण याने हा चित्रपट सोडला आणि शेवटी ही भूमिका दीपक तिजोरीला मिळाली आणि त्याने या संधीचं अक्षरशः सोनं केलं. (Lesser-known Facts about Jo Jeeta Wohi Sikandar)
रतनच्या भूमिकेमध्ये दिसणार होता आदित्य पांचोली
रतनची भूमिका आधी आदित्य पांचोली साकारणार होता मात्र काही कारणांनी ही भूमिका मामिकला याला देण्यात आली आणि त्याने ही निवड सार्थ ठरवली.
इम्रान खान याचे पदार्पण
आमिरचा पुतण्या इम्रान याने ‘जाने तू… या जाने ना’ या चित्रपटातून पदार्पण केले असले तरी याआधी तो जो जीता वही सिकंदरमध्ये रुपेरी पडद्यावर झळकला होता. चित्रपटातील एका छोट्याशा दृश्यात त्याने लहानपणीच्या आमिर खानची भूमिका साकारली होती. (Lesser-known Facts about Jo Jeeta Wohi Sikandar)
======
हे देखील वाचा – एका न झालेल्या विधवेची प्रेमकहाणी – माझा पती करोडपती
======
फराह खानने कोरिओग्राफ केलेलं पहिलं गाणं
‘पहला नशा…’ हे गाणे फराह खानच्या अगदी जवळ आहे कारण हे गाणं फराह खानने कोरिओग्राफ केलेलं पहिलं गाणं आहे. कारण या गाण्याची कोरिओग्राफर काही कारणांनी सरोज खान शूटिंगदरम्यान येऊ शकली नाही तेव्हा हे गाणं फराह खानने कोरिओग्राफ केलं. या गाण्यानंतर फराहला कोरिओग्राफर म्हणून ओळख मिळाली.