ताल: चित्रपटात घईंनी वापरलं होतं ‘या’ चित्रपटाचं स्क्रिप्ट व गाणं
सन १९९९! हे वर्ष ऐश्वर्या रायसाठी खास ठरलं कारण ‘हम दिल दे चुके सनम’ आणि त्यानंतर महिन्याभरात प्रदर्शित झालेला ‘ताल (Taal)’ हा चित्रपट सुपरहिट ठरला. ‘हम दिल…’ मधली नंदिनी आणि ‘ताल’ मधली मानसी या दोन्ही व्यक्तिरेखा वेगवगेळ्या होत्या. केवळ झाडांमागे पळत नायकासोबत बागडण्यापुरत्या या भूमिका सीमित नव्हत्या, तर नायिका म्हणून या व्यक्तिरेखांचं स्वतंत्र असं अस्तित्व होतं. या चित्रपटांमुळे ऐश्वर्याला प्रेक्षक खऱ्या अर्थाने ‘अभिनेत्री’ म्हणून ओळखायला लागले. त्याआधी त्यांच्यासाठी ती फक्त ‘मिस वर्ल्ड’ होती.
चित्रपटाचं कथानक म्हणजे बॉलिवूडचा ऑल टाइम फेव्हरेट ‘लव्ह ट्रँगल’ आहे. मानव मेहता एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा. आपले वडील जगमोहन मेहता यांच्यासह तो ‘चंबा’ या गावात सुट्टीसाठी जातो. या सुट्टीदरम्यान त्यांची गावातील तारा बाबू आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख होते. तारा बाबू गायक असतात. जगमोहन आणि तारा बाबू यांच्यामध्येही मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होतात.
मानव तारा बाबूंची मुलगी मानसीच्या प्रेमात पडतो. मानसीलाही मानव आवडू लागतो. पण जगमोहन मेहता मात्र या नात्याला विरोध करतात कारण… तेच नेहमीचंच… तारा बाबूंचं कुटुंब त्यांच्या तोलामोलाचं नसतं. पण मानव, ‘वडिलांचं मन वळवून त्यांना लग्नाला तयार करेन’, असं वचन मानसीला देतो. पुढे तीच नेहमीची कहाणी. मानवचं कुटुंब तारा बाबुंचा अपमान करतं आणि या गोष्टीपासून अनभिज्ञ असणाऱ्या मानवच्या मनात मानसी आणि तिच्या कुटुंबाबद्दल गैरसमज निर्माण केले जातात.
मानव – मानसी एकमेकांपासून दुरावतात. याच दरम्यान मानसी प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक विक्रांत कपूरच्या संपर्कात येते. विक्रांत तारा बाबूंच्या गाण्यांचा फॅन असतो. मानसी विक्रांतच्या कंपनीसोबत व्यावसायिक करार करते. याद्वारे भारतभर ती नृत्याचे कार्यक्रम करते. तिचे कार्यक्रम सुपरहिट होतात. मानसी स्टार बनते. विक्रांतला प्रचंड फायदा होतो. पण नकळत मानसीच्या प्रेमात पडतो. आणि ‘यहा कहानी में ट्विस्ट आ जाता है…’ कारण नेमकं याच वेळी मानवाला मानसीच्या कुटुंबाचा अपमान झाल्याचं सत्य समजतं. पुढे तीच टिपिकल स्टोरी समज- गैरसमज, प्रेम, विरह, दुरावा या साऱ्यानंतर अखेर नायक नायिका एकत्र येतात आणि चित्रपट संपतो.
सुभाष घई दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय खन्ना (मानव), ऐश्वर्या राय (मानसी), अनिल कपूर (विक्रांत), आलोकनाथ (तारा बाबू) आणि अमरीश पुरी (जगमोहन मेहता) मुख्य भूमिकेत आहेत. कथानक नवीन नसलं तरी घईंनी ते अत्यंत प्रभावीपणे मांडलं आहे. शिवाय सोबतीला कर्णमधुर गाणी आणि नयनरम्य लोकेशन्स यामुळे चित्रपट सुपरहिट ठरला. आता थोडं ताल चित्रपटाच्या मेकिंगदरम्यानच्या किस्स्यांबद्दल-
मुख्य कलाकारांच्या नावांची सुरुवात ‘A’ अक्षरापासून
चित्रपटामधील मुख्य कलाकारांची नावं ‘A’ अक्षरापासून सुरु होणारी आहेत. उदा. अक्षय खन्ना, ऐश्वर्या राय, अनिल कपूर, आलोकनाथ, अमरीश पुरी. इ. तसंच चित्रपटाचे गीतकार होते आनंद बक्षी आणि संगीतकार होते ए.आर. रहमान. अर्थात हा निव्वळ योगायोग असल्याचं घई यांनी स्प्ष्ट केलं. कारण या चित्रपटातील मुख्य कलाकार चित्रपटासाठीची पहिली पसंती नव्हते.
घईंच्या मनातली स्टारकास्ट वेगळीच होती
या चित्रपटासाठी स्क्रिप्टवर काम करत असताना घईंची पहिली पसंती होती ती सलमान खान- महिमा चौधरी- आमिर या त्रिकुटाला. पण काही कारणांनी हे त्रिकुट जमून येणार नाही, असं लक्षात आल्यावर त्यांनी आपला विचार बदलला.
अनिल कपूर होता तिसरी पसंती
विक्रांत मेहता म्हणजेच अनिल कुमारची भूमिका आधी गोविंदा व नंतर आमीर खानला ऑफर करण्यात आली होती. परंतु दोघांनीही नकार दिल्यामुळे ही भूमिका अनिल कपूरला मिळाली.
शाहिद कपूर दिसला आहे बॅकग्राउंड डान्सरच्या भूमिकेत
शाहिद कपूरने ‘कही आग लगे…’ या गाण्यात बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं आहे. शाहिद तेव्हा शैमक दावरकडे नृत्य शिकत होता आणि या गाण्यामध्ये बॅकग्राउंड डान्सर म्हणून त्यांच्या नृत्य अकादमीमधील विद्यार्थ्यांनी काम केलं आहे.
अक्षय खन्ना होती शेवटची पसंती
अक्षय खन्नाच्या भूमिकेसाठी फरदीन खानच्या नावाचा विचार करण्यात आला होता. परंतु फरदीन तेव्हा त्याच्या होम प्रॉडक्शनच्या ‘प्रेम अगन’च्या चित्रीकरणामध्ये व्यस्त असल्यामुळे त्याने नकार दिला आणि मानव मेहताची भूमिका अक्षय खन्नाला मिळाली.
ऐश्वर्या नव्हती पहिली पसंती
मानसीच्या भूमिकेसाठी घईंची पहिली पसंती होती महिमा चौधरीला. पण महिमानं घईंसोबतचा करार मोडल्यामुळे त्यांनी तिचं नाव यामधून वगळलं. यानंतर मनीषा कोईराला व करिष्माच्या नावाचा विचार करण्यात आला होता. परंतु नंतर काही कारणांनी घईंनी तो विचार बदलला व ऐश्वर्याची निवड केली.
चित्रपटात आहेत प्रदर्शित न झालेल्या ‘शिखर’ चित्रपटातील काही भाग
सुभाष घईंनी १९९५ साली शाहरुख खान, जॅकी श्रॉफ, मनीषा कोईराला या स्टारकास्टसह ‘शिखर’ हा चित्रपट बनवायला घेतला होता. विशेष म्हणजे ‘शिखर’साठीही ए आर रहमान संगीत देणार होते. परंतु ‘त्रिमूर्ती’च्या अपयशानंतर घईंनी हा चित्रपट बनवण्याचा विचार सोडून दिला आणि त्याऐवजी ‘परदेस’ बनवण्याचा निर्णय घेतला. ‘शिखर’ चित्रपटाच्या स्क्रिप्टमधले काही भाग तालमध्ये वापरण्यात आले आहेत. तसंच ‘करिया ना…’ हे गाणंदेखील शिखर चित्रपटासाठी रेकॉर्ड करण्यात आलं होतं.
================
हे ही वाचा: सत्यघटनेवर आधारित ‘हे’ मराठी चित्रपट तुम्ही पहिले आहेत का?
जेव्हा एका चुकीमुळे रवीनाला खंडणीसाठी येऊ लागले फोन..
===============
‘ताल’ हा चित्रपट यूएसए मधील बॉक्स ऑफिस चार्टमध्ये टॉप २० चित्रपटामध्ये समाविष्ट झालेला पहिला हिंदी चित्रपट होता. हा चित्रपट बघायचा असल्यास झी5 या ओटीटीवर तसंच यु ट्यूबवरही उपलब्ध आहे. IMDB वर या चित्रपटाला ६.६ रेटिंग देण्यात आलं आहे.