राजा हिंदुस्थानी: चित्रीकरणादरम्यान आमिरने संपवली व्होडक्याची अख्खी बाटली कारण…
हा तो चित्रपट होता ज्या चित्रपटाने आमिरला सलग वर्ष हुलकावणी देत आलेलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळवून दिलं…हा तोच चित्रपट होता ज्या चित्रपटाने करिश्माला एक अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. हा तोच चित्रपट होता ज्या चित्रपटातील आमिर -करिश्माचा ‘किस सिन’ गाजला होता … हा चित्रपट होता राजा हिंदुस्थानी (Raja Hindustani).
१९९६ साली आलेला राज हिंदुस्थानी हा एक रोमँटिक चित्रपट होता. हा चित्रपट १९६५ सालच्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटावरून प्रेरित होता. राजा हिंदुस्थानी विशेष लक्षात राहिला तो यामधील “परदेसी परदेसी…” या गाण्यासाठी. त्याकाळी हे गाणं सुपर डुपर हिट झालं होतं आणि गाण्यासोबत चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर कमाल केली. हा चित्रपट १९९६ सालचा ब्लॉकबस्टर हिट तर ठरलाच शिवाय नव्वदच्या दशकातील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला.
‘राजा हिंदुस्थानी’ म्हणजे श्रीमंत कुटुंबातील आरती आणि गरीब कुटुंबातील टॅक्सी चालक राजाची प्रेमकहाणी. आरती पालनखेत नावाच्या एका छोट्या निसर्गरम्य गावात सुट्टी घालवण्यासाठी जायचं ठरवते. विमानतळावरून पालनखेतला जाण्यासाठी ती टॅक्सी ठरवते. ही टॅक्सी असते राजा हिंदुस्थानीची’. गावातील मुक्कामादरम्यान आरती राजाच्या प्रेमात पडते. श्रीमंत कुटुंबातली शिकली सवरलेली मुलगी अल्पशिक्षित टॅक्सी ड्रॉयव्हरच्या प्रेमात पडल्यावर जे व्हायचं तेच होतं. आरतीच्या कुटुंबाकडून या नात्याला विरोध होतो. पण तरीही आरती राजाशी लग्न करते.
लग्नानंतर आरतीचे वडील तिच्याशी सर्व संबंध तोडून टाकतात. या गोष्टीमुळे आरतीची सावत्र आई व सावत्र भाऊ सुखावतात. कारण सर्व मालमत्ता आता त्यांची होणार असते. परंतु काही दिवसांतच आरतीचे वडील आपला राग विसरून तिला माफ करतात. ते पालनखेतला जातात आणि तिथे आपल्या मुलीला आणि जावयाला राहण्यासाठी नवीन घर देतात. परंतु स्वाभिमानी राजा त्या घरात राहण्यास नकार देतो. अखेर राजा आणि आरतीमध्ये गैरसमज होतात. पुढे समज – गैरसमज, कट -कारस्थान, मेलोड्रामा या सर्व गोष्टी होऊन शेवट गोड होतो.
या चित्रपटात आमिर खान, करिष्मा कपूर, सुरेश ओबेरॉय, अर्चना पुरणसिंग, फरीदा जलाल, मोहनीश बहल, नवनीत निशान आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. चित्रपटाची कहाणी फारशी आकर्षक नव्हती, पण उत्तम लोकेशन्स, दिग्दर्शन आणि गाणी यामुळे चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता या चित्रपटाच्या मेकींगच्या किस्स्यांबद्दल थोडंसं (Lessor known facts about Raja Hindustani)-
१. आमिरने दिला होता नकार
चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकल्यावर आमिर खानने नकार दिला होता. पण दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांना या चित्रपटात नायक म्हणून आमिर खानच हवा होता. त्यामुळे त्यांनी आमिरला भरपूर समजावलं व चित्रपटासाठी तयार केलं. आमिरचा हा निर्णय योग्य ठरला कारण या चित्रपटाने त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला.
२. करिष्मा नव्हती पहिली पसंती
दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांची नायिकेच्या भूमिकेसाठी पहिली पसंती होती ती जुही चावला. कारण त्यावेळी आमिर -जुही ही जोडी प्रचंड लोकप्रिय होती. परंतु त्यावेळी आमिर – जुहीमध्ये मतभेद झालेले असल्यामुळे दोघंही एकमेकांशी बोलत नव्हते. त्यामुळे जुहीने हा चित्रपट नाकारला.
३. ऐश्वर्यालाही होती ऑफर
जुहीने नकार दिल्यावर धर्मेश यांनी ऐश्वर्या रायला नायिकेची भूमिका ऑफर केली. तिला ही भूमिका आवडलीही होती. परंतु त्यावेळी तिला तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचं होतं. त्यामुळे तिनेही नकार दिला. (Lessor known facts about Raja Hindustani)
४. पूजा भट्टच्या नावाचाही झाला होता विचार
नायिका म्हणून धर्मेशनी पूजा भट्टच्या नावाचाही विचार केला होता. परंतु आमिर खानला चित्रपटातील नायिकेच्या भूमिकेसाठी पूजा ‘मिसफिट’ वाटल्यामुळे त्याने धर्मेशना दुसरी नायिका निवडायला सांगितलं.
५. “कितना प्यारा तुझे.. हे गाणं घेतलं होतं ‘किन्हा सोना..’ या गाण्यावरून
“कितना प्यारा तुझे…” हे गाणं ‘मॅजिक टच’ या अल्बममधील “किन्हा सोना…” या गाण्यावरून घेण्यात आलं आहे. “किन्हा सोना…” हे गाणं उस्ताद नुसरत फतेह अली खान यांनी गायलं होतं.
६. चित्रीकरणादरम्यान संपवली व्होडक्याची अख्खी बाटली
चित्रपटात आमिर दारू पिऊन येतो असं दृश्य आहे. हे दृश्य परफेक्ट जमून येण्यासाठी आमिर खानने चक्क व्होडक्याची अख्खी बाटली प्यायली होती. (Lessor known facts about Raja Hindustani)
==============
हे ही वाचा: या लोकप्रिय मराठी मालिकांचं कथानक नाही ‘ओरिजिनल’; आहेत अन्य भाषांतील मालिकांचे रिमेक
मालिकांच्या स्पर्धेत ’स्टार प्रवाह’ अव्वल का आहे?
७. बालकलाकारची भूमिका
चित्रपटात आमिर सोबत असणाऱ्या ‘रजनीकांत’ या लहान मुलाची व्यक्तिरेखा कुणाल खेमूने साकारली होती.
राजा हिंदुस्थानी चित्रपट बघायचा असल्यास तो अमेझॉन प्राईम, Jio सिनेमा तसंच युट्युबवरही उपलब्ध आहे. या चित्रपटाला IMDB वर ६ रेटिंग देण्यात आलं आहे.