टेम्पो ते मर्सिडीज व्हाया नाटक
सुप्रसिद्ध नाट्यचित्रपट अभिनेते मोहन जोशी यांच्याबाबतीत घडलं तसं.
१९८३च्या आसपास मोहन जोशी यांनी उमदा कलाकार म्हणून पुण्यात नाव कमवायला सुरुवात केली होती. त्यांची नाटकं गाजत होती. त्याचवेळी “किर्लोस्कर” कंपनीतील नोकरी सांभाळण्याची कसरतही त्यांना करावी लागत होती. नुकतंच लग्न झाल्याने नोकरी सोडणं शक्य नव्हतं आणि नाटकावरच्या प्रेमापायी नाटकाचे प्रयोग करणंही जोरात सुरू होतं.
अशा कसोटीच्या काळात त्याच्या नाटकाचा कोकण दौरा सुरू झाला. सलग २८ प्रयोग होणार होते. नाटकासाठी इतकी रजा मिळणं शक्य नव्हतं. मोहन जोशींनी आजी वारल्याची थाप मारुन तिच्या तेराव्यानंतर कामावर रुजू होऊ असा अर्ज दिला.
२८ दिवसांचा नाटकाचा दौरा म्हणजे सगळी पळापळ होती. प्रयोग, जागरणं, प्रवास या गडबडीत आपण आधीच अर्ज पाठवलाय हे विसरुन मोहन जोशी यांनी परत रजेचा अर्ज पाठवला. नाटकाचा दौरा संपवून ते परत कामावर रुजू झाले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलावणं धाडलं. त्यांच्या कार्यालयात शिरताच मोहन जोशींना प्रश्न विचारला गेला.
“तुम्हाला नक्की आज्या किती”?
परिस्थितीचा अंदाज घेत मोहन जोशी यांनी उत्त्तर दिलं.”सर्वांना असतात तशा माझ्याही दोन आज्या आहेत. आईची आई.वडिलांची आई.”
साहेबांनी तीक्ष्ण नजरेने विचारलं. “नक्की का? कारण आजी वारल्याचे तीन अर्ज आहेत तुमचे”. मोहन जोशींनी आजीची बहीण म्हणजे आजीच वगैरे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण साहेबांनी ठामपणे सांगितलं, “तुम्ही खोटं बोलत आहात तुम्हालाही माहितेय. कंपनी तुमच्यासाठी इतकं करते. तुम्ही जर कंपनीसाठी काही करु शकत नसाल तर नोकरी सोडणंच इष्ट होईल.”
…आणि मग त्याच कार्यालयातील मदततत्पर साळवी साहेबांनी पूर्ण सहकार्याची खात्री दिल्यावर मोहन जोशी यांनी नोकरी सोडून ट्रॅव्हलिंगच्या व्यवसायात उडी घेतली. त्यासाठी त्यांनी टेम्पो खरेदी केला. किर्लोस्कर कंपनीच्याच सामानाची वाहतूक करण्याचं ते काम होतं.पण नोकरीचं बंधन नसल्याने नाटक करणंही शक्य होतं. एक दिवसाआड पुणे बेळगाव प्रवास करत जोशी यांनी नाट्यप्रयोगसुद्धा सांभाळले.
त्यामुळेच थॅन्क यु मिस्टर ग्लाड, तरुण तुर्क म्हातारे अर्क, कुर्यात सदा टिंगलम, श्री तशी सौ, नातीगोती, मी रेवती देशपांडे, सुखान्त, बुढ्ढा होगा तेरा बाप अशा जवळपास ५० नाटकांतून मोहन जोशी यांचा सदाबहार अभिनय नाट्यरसिकांना पहाता आला.
नाटककला जोपासण्यासाठी तो नाट्यप्रेमाचा कीडाच अंगी असावा लागतो. तो असला की, मग वाटेल ते कष्ट घेण्याची तयारी कलाकार दाखवतोच आणि प्रसंगी त्याचं फळही मिळतं. नोकरी सोडून जोशी यांनी ज्या ठिकाणाहून टेम्पो घेतला त्याच कंपनीतून मर्सिडीज विकत घेण्याचे भाग्यही त्यांनी अनुभवले.
हा टेम्पो ते मर्सिडीज प्रवास साक्ष देतो सच्च्या कलाकाराच्या मेहनतीची! जिद्दीची आणि कलेवरच्या प्रेमाचीही..