‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
नशीबवान अनिल धवनच्या ‘हनिमून’ ला ५१ वर्ष पूर्ण
मला आठवतय, शाळेच्या दिवसात एका मराठी वृत्तपत्रात त्या काळातील एक सिनेपत्रकार कायमच अनिल ‘ढ’वन (Anil Dhawan) असे लिहित असे. नि गंमत वाटे. तो काळ हाताने खिळे लावण्याचा असल्याने मला कायमच वाटे की चुकून अनिल धवनऐवजी अनिल ‘ढ’वन छापून येत असेल. (मुद्राराक्षसाचा विनोद असे ‘अमृत’ मासिकात सदरही असे. एका विनोदाला एक रुपया मानधन मिळे, तेही भारी वाटे) अशातच काही वर्षांतच काॅलेजमधील माझा एक मित्र, तेरी थिएटर मे ना रखेंगे कदम आज के बाद असे अतिशय उत्साहात गाणे गुणगुणायचा. असे का रे? तेरी गली मे ना रखेंगे कदम आज के बाद म्हण ना, इमोशनल गाणे आहे असे आम्ही ‘फिल्म दीवाने’ मित्र त्याला म्हणत तेव्हा तो आम्हाला म्हणे, दिलीपकुमार, राज कपूर, देव आनंद, शम्मी कपूर, राजकुमार, शशी कपूर, मनोजकुमार, सुनील दत्त, धर्मेंद्र, संजीवकुमार, राजेश खन्ना, जितेंद्र, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना यांचे जुने नवे हवे तेवढे पिक्चर थिएटरमध्ये जाऊन एन्जाॅय करायची आवड, सवय व सवड असताना जाॅय मुखर्जी, विश्वजीत, नवीन निश्चल, अनिल धवन, महेन्द्र संधु, बलदेव खोसा (तो नंतर राजकारणात यशस्वी ठरला, मानले) यांचे हीरोगिरीवाले चित्रपट कशाला पाहायचे ? भलेही टाॅपच्या अभिनेत्री त्यांच्या रुपेरी नायिका झाल्या असतील, त्यांच्या वाटेला छान गाणी आली असतील म्हणून काय या ‘नशीबवान’ हीरोंचे पिक्चर आपण पाहायचे ? प्रश्न एकदम थेट असे आणि आमच्याकडेच उत्तर नसल्याने त्याला बोलण्याची बक्कळ मुभा असे आणि काॅलेजच्या कॅन्टीनचे बिल आम्हा इतरांना विभागून द्यावे लागे.
काही असो, अनिल धवन (Anil Dhawan) नशीबवान नायक. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला सांगायचे तर, वरुण धवनचा हा सख्खा काका. अर्थात संकलक व दिग्दर्शक डेव्हिड धवनचा भाऊ. आणखीन एक संदर्भ द्यायचा तर, श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन’ तुम्ही नक्कीच पाह्यलाय. त्यातील सिमी सिन्हाचा (तब्बू) चा पती प्रमोद सिन्हा म्हणजेच अनिल धवन. खूपच वर्षांनी त्याला खरोखरच लक्षवेधक भूमिका मिळाली.
अनिल धवन मूळचा मध्य प्रदेशातील कानपूरचा. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी पुणे येथील दूरदर्शन व चित्रपट अभिनय प्रशिक्षण संस्थेतून चित्रपट माध्यमाचे खास करुन अभिनयाचे प्रशिक्षण घेऊन चित्रपटसृष्टीत येण्याची पध्दत होती. जया भादुरी, डॅनी डेन्झोपा, शत्रुघ्न सिन्हा, विजय अरोरा, नवीन निश्चल, राधा सलुजा, असरानी, सुभाष घई हे सगळे तेथूनच आले. अनिल धवनला पहिलाच चित्रपट मिळाला दिग्दर्शक बी. आर. इशारा यांचा ‘चेतना’ (१९७०). त्या काळातील प्रचंड वादग्रस्त चित्रपट. शत्रुघ्न सिन्हा, रेहाना सुल्तान आणि अनिल धवन यांच्या प्रमुख भूमिका आणि थीम एकदम स्फोटक. जुहूच्या एका बंगल्यात बरेचसे शूटिंग झालेला हा चित्रपट सत्तावीस दिवसांच्या चित्रीकरण दिवसात पूर्ण झाला. थोडे आऊटडोअर्स शूटिंग, तांत्रिक गोष्टी झाल्यावर पोस्टर्सपासूनच हा चित्रपट चर्चेत. अनिल धवनने पडद्यावर मुकेशच्या आवाजातील मै तो हर मोड पर तुझको ढूंढता रहा हे साकारले.
पहिलाच चित्रपट सुपरहिट म्हटल्यावर आणखीन चित्रपट मिळणारच. चित्रपटसृष्टीत ‘यश हेच चलनी नाणे ‘ या अलिखित नियमानुसार अनिल धवनला (Anil Dhawan) चित्रपट मिळू लागले. त्यातील काही नावे सांगायलाच हवी, राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित बासू चटर्जी दिग्दर्शित ‘पिया का घर ‘. यात पत्नीच्या भूमिकेत जया भादुरी. यह जीवन है इस जीवन का हे गाणे यातलेच. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई ‘ या चित्रपटाची ही रिमेक. असित सेन दिग्दर्शित ‘अन्नदाता ‘. पुन्हा जया भादुरी नायिका. विश्राम बेडेकर दिग्दर्शित ‘जय जवान जय मकान ‘मध्ये पुन्हा जया भादुरीच नायिका. अगदी सुरुवातीस अमिताभपेक्षा जया भादुरीला अनिल धवन नायक म्हणून दिग्दर्शक पसंती देत होते हो. कम्माल ना? हीच तर या मनोरंजन क्षेत्राची गंमत आहे.
रविकांत नगाईच दिग्दर्शित ‘प्यार की कहानी ‘मध्ये अनिल धवन (Anil Dhawan) नायक व अमिताभ बच्चन सहनायक. कारण त्याचा सुरुवातीचा ‘पडता काळ’ सुरु होता. तनुजा नायिका होती. गंमत म्हणजे, अमिताभ स्टार झाल्यावर रिपीट रन अथवा मॅटीनी शोला ‘प्यार की कहानी ‘ प्रदर्शित होत असताना चक्क नवीन पोस्टर छापली जाताना त्यावर अमिताभ मोठा तर अनिल धवन कोपर्यात असं काहीसं झाले होते. अनिल धवनला ‘चेतना ‘ पठडीतील दो राहा ( या चित्रपटात तो लेखकाच्या भूमिकेत आहे. नायिका राधा सलुजा), यौवन, हवस वगैरे चित्रपट मिळाले. ‘हवस ‘चे दिग्दर्शन सावनकुमार यांचे. नायिका नीतू सिंग आणि विशेष भूमिकेत रेखा. अनिल धवनने मोहम्मद रफीसाहेबांच्या पार्श्वगायनातील तेरी गली ओ मे ना रखेंगे कदम साकारले. विविध भारतावरील हिंदी चित्रपट गीतांपासून इराणी हाॅटेलमधील ज्यूक बाॅक्सपर्यंत हे गाणे लोकप्रिय. पण जास्त पसंती हे गाणे ऐकायला. ‘हवस ‘ फ्लाॅप झालाच पण नंतर मॅटीनी शोलाही फार काही करु शकला नाही.
अनिल धवन (Anil Dhawan) एकाच वेळेस ‘ए’ प्रमाणपत्रवाले बोल्ड थीमवरचे चित्रपट आणि दुसरीकडे सामाजिक चित्रपट अशी वाटचाल करत होता. एक अजबच समीकरण होते हे. मात्र नायिकांच्या बाबतीत नशीबवान ठरत होता. असाच एक चित्रपट राजश्री प्राॅडक्सन्स निर्मित व हीरेन नाग दिग्दर्शित ‘हनिमून ‘ ( रिलीज ९ मार्च १९७३). नायिका लीना चंदावरकर. आणि जोडीला नाझिमा, सुरेश चटवाल, उत्पल दत्त, श्यामा, मुकरी, सुंदर वगैरे. या चित्रपटातील गाणी सुरेल. किशोरकुमार व आशा भोसले यांच्या आवाजातील मेरे प्यासे मन की बहार, जीवन है एक सपना ही गाणी लोकप्रिय होती. योगेश यांच्या गीतांना उषा खन्नाचे संगीत. दोन मैत्रीणींची पतीबद्दलची कल्पना आणि वस्तुस्थिती यावर गोष्ट होती.
=========
हे देखील वाचा : ‘दो कलिया’ आणि दक्षिणेचा हिंदीवरच्या प्रभावाचा फ्लॅशबॅक…
=========
चित्रपट मात्र रसिकांनी नाकारला. अनिल धवनची (Anil Dhawan) भूमिका असलेले ‘गुलाम बेगम बादशाह ‘ यशस्वी ठरला तरी श्रेय शत्रुघ्न सिन्हा व मौशमी चटर्जी यांना मिळाले. एव्हाना शत्रुघ्न सिन्हा खलनायकाच्या भूमिकांकडून नायक म्हणून भूमिका करु लागला. म्हणजेच अनिल धवनलाच स्पर्धा निर्माण झाली. तर त्याची भूमिका असलेले काही चित्रपट फ्लाॅप ठरले. मल्टी स्टार कास्ट चित्रपटांच्या युगात त्याला राजकुमार कोहली निर्मित व दिग्दर्शित ‘नागिन ‘ ( १९७६) मधील सहापैकी एक नायक साकारायला मिळाला. चित्रपट सुपरहिटही झाला. पण अनिल धवनला फार फायदा झाला नाही. त्याने चेतन आनंद दिग्दर्शित ‘साहिब बहादूर ‘पासून छोट्या छोट्या भूमिकेत वाटचाल सुरु केली. त्यात तो आजही दिसतोय. मालिकांच्या युगात तो छोट्या पडद्यावर आला. आशा पारेख दिग्दर्शित ‘कोरा कागज ‘ या मालिकेतही त्याला भूमिका मिळाली. भाग्यलक्ष्मी, मै लक्ष्मी तेरे आंगन की, कुसुम, तुफान, सोने का पिंजरा अशा अनेक मालिकेतून भूमिका साकारताना पुढील पिढीतील कलाकार व कामाची पद्धत यांच्याशी त्याने छानच जुळवून घेतले. त्याची भूमिका असलेल्या ‘हनिमून ‘ या चित्रपटाला एकावन्न वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त हा सगळा फोकस.