Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला

Madhubala : दिलीप कुमार – मधुबालाची अधुरी प्रेमकहाणी!
मधुबाला! भारतीय सिनेमातील सर्वात देखणी अभिनेत्री. उणीपुरी दहा एक वर्षाची तिची चंदेरी सफर. पण आजही सौंदर्यातील शेवटचा शब्द म्हणजे ’मधुबाला’चं (Madhubala) समजला जातो! तिचं आरस्पानी सौंदर्य, तिचं लज्जतदार लाजणं, तिचं खळाळून हसणं, खोडकरपणे हसणारे तिचे जीवघेणे नेत्रकटाक्ष, प्रेमातील उत्कटता आणि विरहातील व्याकुळता टिपणारे तिचे डोळे, सारं कसं जिवंत, रसरशीत आणि मनाला सुखावणारे होते! एकूणच तिचा रूपेरी वावर आजही एक ’आयडॉल’ समजला जातो. आजच्या युवा पिढीला कदाचित हे वाचून आश्चर्य वाटेल मधुला पडद्यावर पहातानाच नव्हे तर तिच्या उल्लेखानेही रोमांचित होणारे हजारो रसिक होते. अभिनय सम्राट दिलिप कुमारपासून गानसम्राट किशोर कुमार पर्यंत सारेच तिच्यावर फ़िदा होते. सौंदर्याची अनभिषिक्त सम्राज्ञीचा जन्म देखील १४ फ़ेब्रुवारी, हा तमाम प्रेमिकांकरीता शुभ संकेत समजायला हवा.

त्यानिमित्ताने तिचा एक किस्सा आपण बघुयात. Tragedy King दिलीप कुमार आणि व्हिनस ऑफ द अर्थ मधुबाला (Madhubala) या दोघांनी केवळ चार चित्रपटात एकत्र काम केले. पण आजही रसिक या दोघांच्या जोडीला विसरू शकलेले नाहीत. या दोघांमध्ये जो गुलाबी स्नेहबंध निर्माण झाला होता या गोड नात्याचा शेवट मात्र कडवट झाला. या दोघांनी पहिल्यांदा राम दरयानी दिग्दर्शित ‘तराना’ या चित्रपटात एकत्र आले. अनिल विश्वास यांचे या चित्रपटाला संगीत होते. ‘सीने में सुलगते है अरमान’, ‘नैन मिले नैन हुए बावरे’, ‘एक मै हू एक मेरी बेकसी की शाम है’, ‘बेईमान तोरे नैनवा निंदिया न आये‘ ही अप्रतिम गाणी या चित्रपटात होती.
या सिनेमात मधुबालाचा (Madhubala) एका निरागस, अल्लड मुलीचा रोल होता. या सिनेमापासूनच दिलीप आणि मधू यांची मने जुळली ! ५ ऑक्टोबर १९५१ साली प्रदर्शित झालेल्या ‘तराना’ने (Tarana) चांगलेच व्यवसायिक यश मिळविले. प्रेक्षकांना ही नवी जोडी पसंत पडली. यानंतर या दोघांचा ‘संगदिल’ हा चित्रपट आला. हा चित्रपट १८४७ च्या Charlotte Brontë यांच्या अभिजात कादंबरी Jane Eyre वर आधारीत होता.

या चित्रपटाला सज्जाद हुसैन यांचे संगीत होते. ‘ये हवा ये रात ये चांदनी तेरी एक अदा पे निसार है’, ‘दिल मे समा गये सजन फुल खिले चमन चमन‘ ‘वो तो चले गये ऐ दिल ‘ हि मेलडीयस गाणी होती. ‘दिल में समा गये‘ च्या वेळचे मधुबालाच्या चेहऱ्यावरील आरक्त लज्जित भाव (सिनेमा कृष्ण धवल असला तरी!) रसिकांना आवडून गेले. २८ नोव्हेंबर १९५२ रोजी संगदिल झळकला. (Bollywood tadka)
या जोडीचा पुढचा सिनेमा होता मेहबूब खान यांचा ‘अमर’. या सिनेमाचे कथानक काहीसे वेगळे होते. यात मधुबालाने वकिलाचा रोल केला होता. नौशाद यांच्या संगीतातील ‘इंसाफ का मंदीर है ये भगवान का घर है’, ’न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहां जाते‘, ’तेरे सदके बलम न करे कोई गम’ ही गाणी सुंदर होती. १० सप्टेबर १९५४ रोजी ‘अमर’ रुपेरी पडद्यावर झळकला. या तीनही सिनेमात दिलीप-मधूची (Madhubala) जोडी असली तरी प्रेमाचा तिसरा कोन होताच. अनुक्रमे श्यामा, शम्मी आणि निम्मी या सिनेमातून चमकल्या. तरी मधुबालाची भूमिका रसिकांच्या कायम लक्षात राहिली.

यानंतर १९५७ साली बी आर चोप्रा यांनी त्यांच्या ‘नया दौर‘ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात सुरुवातीला दिलीप कुमार आणि मधुबाला (Madhubala) यांना कास्ट केले. परंतु ज्यावेळी या चित्रपटाचे बाह्य चित्रीकरण मध्य प्रदेशमधील इटारसी जवळ होणार आणि तिथे किमान महिनाभर जाऊन राहावे लागणार असे कळाल्यानंतर मधुबालाच्या वडिलांनी याला तीव्र विरोध केला.
कारण त्या काळात दिलीप कुमार आणि मधुबाला बऱ्यापैकी जवळ आले होते आणि ते दोघे तिकडे जाऊन गुपचूपपणे निकाह करतील याची भीती अब्बाजान यांना वाटत होती! ते या निकाहच्या सख्त विरोधात होते कारण मधुबाला त्यांच्यासाठी ‘पैशाची मशीन’ होती. तिच्याच पैशावर त्यांचे घर आणि व्यसनं चालत होती. त्यांना ही सोन्याचे अंडे देणारी कोंबडी हातातून सोडायची नव्हती. बऱ्याच वादावादीनंतर बी आर चोप्रा यांनी शेवटी मधुबालाला या सिनेमातून काढून टाकले आणि तिच्या जागी वैजंतीमालाची वर्णी लागली.
===========
हे देखील वाचा : Shamshad Begum : ऑडीशनला गेली आणि बारा गाण्यांचे कॉन्ट्रॅक्ट साइन करून आली!
===========
हा अपमान अब्बाजान यांना सहन झाला नाही आणि त्यांनी सरळ कोर्टामध्ये बी आर चोप्रा यांच्या विरुध्द केस टाकली. मग कोर्टात ट्रायल सुरू झाल्या. जस्टीस तुळजापूरकर त्यावेळी मुंबई हायकोर्टचे जज होते. त्यांच्या बेंचसमोर सुनावणी सुरू झाली. एकदा दिलीप कुमारला यावेळी कोर्टात साक्षीसाठी बोलावण्यात आले. त्यावेळी विटनेस बॉक्समध्ये दिलीप कुमारने “मधुबालावर माझे नितांत प्रेम आहे” याची जाहीर कबुली दिली! दिलीप कुमारची भर कोर्टात मधुबालावर (Madhubala) प्रेमाची कबुली हे त्या काळातली मोठी ब्रेकिंग न्यूज होती.

दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात हेडलाईनमध्ये ही बातमी छापून आली होती. इथुनच या दोघांच्या गुलाबी नात्यांमध्ये कटूता निर्माण झाली. दोघे एकमेकाला टाळू लागली. याच काळात ते दोघे के असिफ यांच्या ‘मुगल-ए-आझम’ या चित्रपटात काम करीत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या ‘मुगल-ए-आझम’ मधील सर्वात सुंदर रोमँटिक दृश्याच्या वेळी हे दोघे परस्परांशी अबोला ठेवून होते.
शाही महालाच्या बागेत दिलीप कुमारच्या मांडीवर मधुबाला डोके ठेवून पडली आहे आणि तो मधुबालाच्या चेहर्यावरून मोरपीस फिरवतो या हिंदी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात सुंदर प्रणय दृश्याच्या वेळ दिलीप कुमार आणि मधुबाला (Madhubala) परस्परांशी बोलत देखील नव्हते! एका सुंदर नात्याचा असा दुर्दैवी अंत झाला. आज मधुबाला नाही दिलीप ही नाही त्यांच्या आठवणी मात्र दिलात ताज्या आहेत.