महेश लिमये घेऊन आले आहेत ह्यावर्षी आशेची रोषणाई.
“मला आठवते ती लहानपणची दिवाळी. दिवाळीच्या आधी शाळेची सहामाही परीक्षा
असायची. ती संपून शाळेला सुट्टी कधी लागत आहे,याचा आम्ही मित्र विचार
करायचो. कारण आम्हा मित्रांचे दिवाळीचे खूप मोठे प्लॅनिंग असायचे.
मुख्य म्हणजे किल्ले तयार करणे, हा आमचा आवडता उपक्रम असायचा. त्यासाठी
आम्ही माती कुठून आणायची,ते ठरवायचो. त्यात धान्य पेरणे,छोटे झाड लावणे हे सगळे खूप आनंदाने आम्ही करत होतो. दिवाळीच्या आधी आठ दिवस हे किल्ले तयार करण्याची खूप धमाल असायची. आम्ही कंदील देखील घरी करत होतो. त्या काळात केपांचे आणि टिकल्यांचे रोल असायचे आणि ते बंदुकीने फोडायचे, असा आम्हा मुलांचा उद्योग असायचा. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहिला फटाका कोण लावणार, याची जणू स्पर्धाच असायची. मग सगळ्यांच्या आधी उठून पटकन तो पहिला फटाका आपल्या हातून लावला गेला पाहिजे, असे नियोजन असायचे.
हे हि वाचा : अभिजित-सुखदाचा विशेष दिवाळी पाडवा
अभ्यंगस्नान झाले की सर्व मित्रांकडे फराळासाठी जाणे व्हायचे आणि असे अगदी तिसरी चौथीपासून ते अगदी दहावीच्या दिवाळीपर्यंत चालू होते. फटाके आम्ही मित्र मंडळी पुरवून
पुरवून लावायचो. भाऊबीजेच्या दिवशी उरलेले सर्व फटाके एकत्र लावले जायचे आणि मग माळांचा कोट लावला जायचा. दिवाळीच्या दिवसात रांगोळी काढण्यात बहिणीला मी मदत करायचो, मग आमच्या घरातील रांगोळी काढून झाली की मग मित्रांकडे पण रांगोळी काढायला मदत करायला जायचो. हे सगळे आठवले की नॉस्टॅल्जीक व्हायला होते. यावर्षीची दिवाळी ही खूप वेगळी असणार आहे. दिवाळीच्या निमित्ताने मी ‘आशेची रोषणाई’ ही शॉर्ट फिल्म दिग्दर्शित आणि चित्रित केली आहे.
क्षितिज पटवर्धन याने ती लिहिली असून पुनीत बालन स्टुडिओज यांची ती निर्मिती आहे. “दुसऱ्यासाठी उजळणे म्हणजे दिवाळी” हा संदेश देणारी ही शॉर्ट फिल्म आहे. तुम्हाला देखील ती फिल्म नक्की आवडेल. आज खरोखरच आपल्या भोवताली अशी अनेक माणसे आहेत की या काळात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. त्यांच्या जीवनात आपण ‘आशेची रोषणाई’ निर्माण करण्याचा संकल्प करूया.”