Dhanush दुसऱ्या लग्नाच्या तयारीत? घटस्फोटानंतर दोनचं वर्षांनी नऊ वर्षांनी लहान

Bharat Jadhav-Mahesh Manjrekar पहिल्यांदाच रंगभूमीवर येणार एकत्र
मराठी चित्रपट आणि नाट्यसुष्टीतील दोन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र येणार आहेत… भरत जाधव आणि महेश मांजरेकर एका नाटकानिमित्त पहिल्यांदाच स्टेज शेअर करणार आहेत… विनोदी, हृदयस्पर्शी आणि नातेसंबंधांचा वेध घेणारं नाटक ‘शंकर-जयकिशन’ लवकरच नाट्यरसिकांच्या भेटीला येणार असून यात वडिल- मुलीचे गुंतागुंतीचे नाते, वर्षानुवर्षे दडलेली कटुता आणि अचानक जीवनात घडलेल्या अनपेक्षित व्यक्तीच्या आगमनाने बदलणारे समीकरण प्रेक्षकांना यात पाहायला मिळणार आहे…
पहिल्यांदाच भरत जाधव आणि महेश मांजरेकर हे दोन प्रभावी कलाकार रंगभूमीवर एकत्र दिसणार आहेत. त्यातही महेश मांजरेकर तब्बल २९ वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे महेश मांजरेकर यांच्यासाठीही आणि प्रेक्षकांसाठीही हा एक खास क्षण असणार आहे…

या नाटकाबद्दल भरत जाधव म्हणाले, ‘’महेशजी आणि मी अनेक वर्षे एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करत आहोत, त्यामुळे आमची चांगली मैत्री आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक चित्रपटांमध्येही मी भूमिका केल्या आहेत. एकमेकांना कामामध्ये काय अपेक्षित असतं, हे आम्ही उत्तम जाणतो. त्यामुळेच त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा नेहमीच अनोखा असतो आणि आता तर आम्ही एकत्र रंगमंचावर झळकणार आहोत. त्यामुळे आम्हाला एकत्र पाहाण्यासाठी प्रेक्षक जितके आतुर आहेत. तितकीच उत्सुकता आम्हालाही लागून राहिली आहे. मला खात्री आहे, आमची केमिस्ट्री रंगभूमीवर वेगळी जादू निर्माण करेल.”
तर महेश मांजरेकर आपल्या या प्रवासाबद्दल म्हणाले, ‘’ २९ वर्षांनंतर रंगभूमीवर परत येणं ही माझ्यासाठी भावनिक गोष्ट आहे. नाटक हे माझ्यासाठी नेहमीच अग्रस्थानी आहे. मात्र चित्रपटांमुळे मला नाटकाला वेळ देता आला नाही. परंतु आता जितका जमेल तेवढा वेळ मी रंगभूमीसाठी देणार आहे. ‘शंकर जयकिशन’चं कथानक वाचताना मला जाणवलं, हे नाटक रंगभूमीवर आलंच पाहिजे. भरतसोबत मी अनेकदा काम केलं आहे, मी त्यांच्या अभिनयाचा आदर करतो. तो प्रामाणिक, संवेदनशील आणि ऊर्जा असलेला कलाकार आहे. आता रंगभूमीवर आम्ही एकत्र येतोय. एकमेकांच्या अनुभवांची देवाणघेवाण रंगमंचावर एक वेगळाच रंग उमटवेल, याची मला खात्री आहे.”

भरत जाधव एण्टरटेन्मेंट निर्मित सुरज पारसनीस दिग्दर्शित या नाटकाचे लेखन विराजस कुलकर्णी याने केले आहे. क्षितिज पटवर्धन यांचे गीत लाभलेल्या या नाटकात शिवानी रांगोळे, भरत जाधव आणि महेश मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विनोद, भावना आणि नात्यांचे सुंदर मिश्रण असलेल्या ‘शंकर-जयकिशन’ या नाटकाचा शुभारंभ १९ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi