मैत्री: अभिनय सम्राट दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांची!
अभिनय सम्राट दिलीप कुमार(dilip kumar) आणि शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी स्वातंत्र्यानंतरचा हिंदी सिनेमा खऱ्या अर्थाने व्यापून टाकला. खरंतर अमिताभ बच्चन यांच्या आगमनानंतर दिलीप कुमार यांची नायक पदाची कारकीर्द तशी संपुष्टात आली होती पण त्यांचा फिल्म इंडस्ट्रीमध्ये दबदबा एवढा प्रचंड होता की त्यांची प्रत्येक कृती ही भारतीय सिनेमांमध्ये नोंद घेण्यासारखीच होती. इथे आलेल्या प्रत्येक कलाकाराला दिलीप कुमारसोबत काम करण्याची आतून आस होती.
या दोन महान कलाकारांना रमेश सिप्पी यांनी १९८२ साली ‘शक्ती’ या चित्रपटातून एकत्र आणले होते. या सिनेमातील दोघांचा अभिनय हा अगदी तोडीस तोड होता.(तरी त्या वर्षीचे फिल्मफेअर दिलीप कुमार(dilip kumar) नेच पटकावले!) अभिनयासोबतच या दोघांमधील मैत्री देखील खूप चांगली होती. सायरा बानो यांनी एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत या दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से मध्यंतरी शेअर केले होते.
अमिताभ बच्चन १९६९ साली ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून हिंदी सिनेमात आले. दिलीप कुमार(dilip kumar) यांना अमिताभ बच्चन यांच्याबाबत अभिनेता ओम प्रकाश यांनी माहिती दिली होती. त्यावेळी ओम प्रकाश म्हणाले होते, ”हिंदी सिनेमांमध्ये एक नवीन तरुण कलाकार आला आहे; त्याच्या डोळ्यांमध्ये तुझ्यासारखीच चमक आहे!” नंतर दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांची एका कार्यक्रमात भेट झाली आणि त्या दोघांमध्ये गुरु शिष्याचे नातं निर्माण झालं. या मुलाखतीत सायरा बानू यांनी एक किस्सा सांगितला होता.
एकदा सलीम-जावेद हि जोडी अमिताभ बच्चन यांना घेऊन दिलीप कुमार यांना कोणतीही आगाऊ सूचना न देता रात्री त्यांच्या घरी गेले होते. अमिताभ बच्चन यांना असे अगंतुकपणे कुणाच्या घरी जाणे आवडत नव्हते. परंतु सलीम जावेद त्यांच्या आग्रहाने ते दिलीप कुमार(dilip kumar) यांच्या घरी गेले. तिथे वॉचमनने दिलीप कुमार आत्ताच एका शूटिंग होऊन परत आले असून ते आता झोपायला गेले आहेत असे सांगितले. अमिताभ बच्चन यांनी डोळ्यानेच सलीम जावेद यांना सांगितले “आपण इथून आता निघालेले बरे!” तरी जावेद अख्तर यांनी वॉचमनला सांगितले, ”तुम्ही दिलीप कुमार साहेबांपर्यंत हा निरोप पोहोचवा की त्यांचे काही मित्र त्यांना भेटायला आले आहेत!” अमिताभ बच्चन नाराजीनेच तिथे वाट पाहत थांबले.
पण तितक्यात आश्चर्य घडले. ज्या क्षणी आत निरोप पोहोचला त्या क्षणी बंगल्यामधील लाइट्स लागले गेले. त्या तिघांना आत बोलावले गेले. दिलीप कुमार(dilip kumar) हसत हसत आपल्या बेडरूमच्या बाहेर आले आणि त्यांच्या गप्पांची मैफल जी रंगली ती पहाटे चार वाजेपर्यंत ते जुने अनेक किस्से आठवणी एकमेकांसोबत शेअर करत बसले. अमिताभ बच्चन यांनी या मीटिंग बाबत सांगतांना सांगितले की,” दिलीप कुमार यांच्यासोबत मारलेल्या गप्पा मला अतिशय समृद्ध करून जात होत्या”. दिलीपकुमार एक अतिशय अभ्यासू, चिंतनशील आणि प्रगल्भ अभिनयाचा साक्षात्कार घडवणारे अभिनेते होते.
अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा ‘ब्लॅक’ हा चित्रपट २००५ साली प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रीमियरसाठी दिलीप कुमार(dilip kumar) यांना निमंत्रित केले होते. हा सिनेमा पाहून दिलीप कुमार प्रचंड प्रभावित झाले आणि चित्रपट संपल्यानंतर अमिताभ बच्चन यांची वाट पाहत थांबले. अमिताभ बच्चन यांना जेव्हा कळाले की दिलीप कुमार त्यांची वाट पाहत आहे त्यावेळेला ते चाहत्यांच्या घोळक्यातून बाहेर पडून दिलीप कुमार यांच्याकडे आले. दिलीपकुमार यांनी अमिताभ बच्चन यांना प्रेमाने मिठी मारली. ते काहीच बोलले नाही. पण या अनुभवाबद्दल बोलताना दिलीप कुमार अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉग मध्ये लिहिले की, ”त्या दिवशी इतर कोणत्याही व्यक्तीने व्यक्त केलेल्या भावनांपेक्षा दिलीप कुमार(dilip kumar) यांच्या डोळ्यातून दिसलेल्या भावना मला अधिक प्रभावित करून गेल्या!”
========
हे देखील वाचा : देव आनंदच्या सिनेमाला सेंसर बोर्डाने सुचवले ७२ कट्स…
========
२०१२ पासून दिलीप कुमार(dilip kumar) यांचे वारंवार हॉस्पिटलाइजेशन सुरू झाले. लीलावती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना अमिताभ बच्चन किती जरी उशीर झाला तरी त्यांना भेटायला रात्री हॉस्पिटलमध्ये येत असे दिलीप कुमार निशब्दपणे आपल्या तरुण मित्राला पाहत असे. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत असायचे. सायरा बानू यांनी या मुलाखतीत असे सांगितले की, ”दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन या दोन महान कलाकारांच्या एकमेकांच्या प्रति असलेल्या आदराबाबत, एकमेकांच्या कामाबद्दल असलेल्या आस्थेबाबत खूप काही सांगता येईल. दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन या दोघांमधील गुरु शिष्याचे नाते अखेर पर्यंत अबाधित राहिले!
धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी