मेकअप डिझायनरकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांनी बदलायला हवा – सानिका गाडगीळ
चित्रपट म्हटलं की तो बनविण्यासाठी अनेकजणांनी मेहनत घेतलेली असते. आपल्यासमोर येतात ते पडद्यावरचे कलाकार. पण हे कलाकार पडद्यावर ज्या व्यक्तिरेखा साकारतात त्या व्यक्तिरेखांमध्ये त्यांना ‘फिट’ बसविण्यासाठी ज्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली असते, ते असतात ‘मेकअप डिझायनर’.
सध्या सगळीकडे चर्चा आहे ती ‘शेर शिवराज’ या चित्रपटाची आणि त्यामधील अफझलखानच्या ‘लुक्स’ची. हा लूक ‘परफेक्ट’ जमून येण्यासाठी ज्या मेकअप डिझायनरने मेहनत घेतली तिचं नाव आहे सानिका गाडगीळ. मेकअप डिझायनर म्हणून काम करताना येणारी आव्हाने, त्यातले बारकावे, त्यासाठी करावा लागणारा अभ्यास याबद्दल सानिकाने खूप महत्त्वाची माहिती दिली.
सानिकाला सुरुवातीपासूनच पेंटिंगची खूप आवड होती. पण कमर्शिअल आर्टिस्ट व्हायचं नाही, हे तिने मनाशी पक्कं ठरवलं होतं. ती दहावीमध्ये असताना सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचा वर्तमानपत्रातील एक लेख तिच्या वाचनात आला. तो वाचून तिला प्रेरणा मिळाली. त्यानंतर ती विक्रम सरांना भेटली आणि त्यांच्याकडे शिक्षण घेण्यास करायला सुरुवात केली. यानंतर तिने ब्युटी थेरपीचे बेसिक आणि ॲडव्हान्स कोर्सेसही केले.
ब्युटी थेरपीचे कोर्स झाल्यावर सर्वांनीच तिला ‘सलोन अँड स्पा’ सुरू करण्याचा सल्ला दिला. परंतु सानिका आपल्या निर्णयावर ठाम होती. तिला या क्षेत्रात काहीतरी वेगळं शिकायचं होतं. त्यामुळे ‘प्रोस्थेटिक मेकअपचं (Prosthetic Makeup) शास्त्रशुद्ध आणि तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी ती फ्रान्सला गेली.
सानिका गाडगीळ ही मराठी इंडस्ट्रीमधील पहिली मेकअप डिझायनर आहे. तिच्या करिअरची सुरुवात झाली ती फॅशन इंडस्ट्रीपासून. या इंडस्ट्रीमधील अनुभवांबद्दल विचारल्यावर सानिकाने सांगितलं –
“तसं बघायला गेलं तर कुठलंच क्षेत्र किंवा त्या क्षेत्रातील माणसं वाईट नसतात. प्रत्येक माणसाला जसे अनुभव येतात तसं तो वागत असतो. त्याचवेळी आपण कसं वागायचं हे देखील आपल्या हातात असतं. माझ्या घरून मला सक्त ताकीद देण्यात आली होती की, काम झाल्यावर लगेच घरी यायचं आणि मलाही ते पटलेलं होतं. त्यामुळे मी माझं काम झाल्यावर लगेच घरी येत असे. शिवाय मॉडेल्सशी वागता – बोलतानाही आपलं वागणं व्यवस्थित असेल, याचीही मी काळजी घेतली.”
सानिकाने आजवर ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’ आणि ‘शेर शिवराज’ या चित्रपटांसह एकूण १४ मराठी चित्रपट, काही वेबसिरीज व मालिकांसाठीही ‘मेकअप डिझायनर’ म्हणून काम केलं आहे. या क्षेत्रात आता ती नवीन नाही.
मेकअप डिझायनर म्हणून आपलं करिअर समर्थपणे घडवणाऱ्या सानिकाने फ्रेंच भाषेमध्ये आपलं मास्टर्स पूर्ण केलं आहे. या क्षेत्राबद्दल करिअर करणाऱ्यांना काय सल्ला देशील, हा प्रश्न विचारल्यावर सानिका म्हणाली –
“या क्षेत्राकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन खूपच टोकाचा आहे. काही लोकांना वाटतं ज्यांना काहीच येत नाही ते या फिल्डमध्ये येतात. परंतु, तसं नाही. इथे खूप काळजी घेऊन, अभ्यास करून काम करावं लागतं. मी प्रोस्थेटिक मेकअप करत असल्यामुळे मला तर खूपच काळजी घ्यावी लागते.
प्रोस्थेटिक मेकअप म्हणजे शरीराचे अवयव तयार करणे, जखमांचा मेकअप, इ. ‘भो भो – अ डॉग लाईफ’ या चित्रपटासाठी मेकअप डिझायनर म्हणून मी काम पाहिलं होतं. या चित्रपटामध्ये नायिकेवर कुत्रा हल्ला करतो व तिचे पोट फाडतो असं दाखविण्यात आलं होतं. तसंच आत्ता ‘शेर शिवराज’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज अफझलखानाचा कोथळा बाहेर काढताना दाखविण्यात आलं आहे. परंतु, या दोन्ही दृश्यांसाठी वेगवेगळा विचार करावा लागला कारण ‘भो भो – अ डॉग लाईफ’ चित्रपटातल्या दृश्यामध्ये पोटातील अवयव बाहेर येताना दाखवायचे नव्हते. शिवाय कुत्रा कशाप्रकारे हल्ला करेल हा विचारही करावा लागला.
प्रोस्थेटिक मेकअप ही तशी अवघड संकल्पना आहे. अवयव बनवताना केवळ कलाकाराचा नाही तर, संबंधित दृष्याचाही संपूर्ण अभ्यास करावा लागतो. जेणेकरून शरीराचा तो भाग खोटा वाटणार नाही. याचबरोबर तो अवयव सांभाळणं कलाकाराला अडचणीचं किंवा त्रासाचं होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते.
हे झालं प्रोस्थेटिक मेकअपबद्दल पण अगदी साधा मेकअप असेल तरीही तेवढीच काळजी घ्यावी लागते. अगदी दोन्ही डोळ्यांना सारखाच मेकअप झाला आहे ना, हे सुद्धा बघावं लागतं. त्यामुळे हे क्षेत्र जेवढं वाटतं तेवढं सोपं नाही.
काहीजणांना वाटतं या फिल्डमध्ये खूप पैसा आहे. म्हणून ते या फिल्डमध्ये येतात. परंतु तसं नाहीये. मी स्वतः काही वर्ष मोफत काम केलं आहे. कारण तुम्हाला तेवढा अनुभव येणं आवश्यक असतो. मला माझ्या आई वडिलांचा आणि मोठ्या भावाचाही खूप सपोर्ट मिळाला म्हणून मी इथवर येऊ शकले.”
====
हे देखील वाचा – दामिनी: मनोरंजनाचं ‘एक्सक्ल्यूसिव्ह पॅकेज’ असणारी मालिका
====
या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करणाऱ्या मुलींना सानिका आवर्जून सांगते, “या क्षेत्रात यायचं असेल, तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपली सुरक्षा. आपण आपल्या सुरक्षेची काळजी घ्यायला हवी. निव्वळ या क्षेत्रात भरपूर पैसा आहे असा विचार करून तुम्ही या क्षेत्रात येणार असाल, तर तुमचा विचार अत्यंत चुकीचा आहे. कोणतीही गोष्ट सहजी मिळत नाही त्यामुळे मेहनत करायची तयारी आणि पेशन्स ठेवायला हवेत.”
सर्वसामान्य माणसांसाठी मेकअप ही संकल्पना खूपच मर्यादित आहे. पण सानिकाने ही संकल्पना किती विस्तारित आहे हे अगदी थोडक्यात सांगितलं. सानिका मराठी चित्रपटसृष्टीमधली एक नामांकित मेकअप डिझायनर आहेच, पण आता तिला बॉलिवुडचेही वेध लागले आहेत. या क्षेत्रातला तिचा अभ्यास, अनुभव आणि कामाची पद्धत बघता तो सुदिन लवकरच येईल आणि सानिका गाडगीळ हे नाव बॉलिवूडमध्ये लोकप्रिय होईल, ही सदिच्छा!
3 Comments
वाह ! अगदी पहिल्या पासूनच आपल्या करियर बाबत अतिशय विचारपूर्वक ठाम असलेली सानिका आणि तिच्या पालकांचे मला फार कौतुक वाटते. नेहमीच्या चाकोरी पेक्षा अतिशय वेगळ्या आणि अस्थिर वातावरणात , कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या हिमतीवर पाऊल टाकणं आणि पालकांनी केलेले संस्कार आणि तिच्यावर विश्वास ठेवून तिला प्रेत्साहन देणं नक्कीच सोपं नाही. चित्रपट, मालिका च्या मोहमाया जालात , निसरड्या वाटेवरची मराठी मुलगी सानिकाची वाटचाल उत्तम चालू आहे याचा खूप अभिमान वाटतो. यासाठी लागणारा मनाचा संयम आणि समतोल दोन्ही तिच्याकडे असल्यानेच ती सासर / माहेर कुणालाच आक्षेप घ्यायची संधीच देत नाही. सानिकाच्या कामाची मिडियाने घेतलेली दखल फार मोलाची आहे.
तिच्या क्षेत्रातील तिच्या पुढील भरारीसाठी मनापासून शुभेच्छा !👌👌👍👏😊🌷
वाह ! अगदी पहिल्या पासूनच आपल्या करियर बाबत अतिशय विचारपूर्वक ठाम असलेली सानिका आणि तिच्या पालकांचे फार कौतुक वाटते. नेहमीच्या चाकोरी पेक्षा अतिशय वेगळ्या आणि अस्थिर वातावरणात , कुठलीही पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या हिमतीवर पाऊल टाकणं आणि पालकांनी देखील , आपण केलेले संस्कार आणि तिच्यावर विश्वास ठेवून तिला प्रेत्साहन देणं नक्कीच सोपं नाही. चित्रपट, मालिका च्या मोहमाया जालात , निसरड्या वाटेवरची एका मराठी मुलीची , सानिकाची वाटचाल उत्तम चालू आहे याचा खूप अभिमान वाटतो. यासाठी लागणारा मनाचा संयम आणि समतोल दोन्ही तिच्याकडे असल्यानेच ती सासर / माहेर कुणालाच आक्षेप घ्यायची संधीच देत नाही. सानिकाच्या कामाची मिडियाने घेतलेली दखल फार मोलाची आहे.
तिच्या क्षेत्रातील तिच्या पुढील भरारीसाठी मनापासून शुभेच्छा !👌👌👍👏😊🌷
Nice interview