दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मन ‘मोहिनी’ माधुरी
धक धक करने लगा म्हणत सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवणारी, अरे रे रे अरे ये क्या हुआ गाण गात प्रेम करायला शिकवणारी, आजा नचले नचले वर नृत्य करत सगळ्यांना ठेका धरायला लावणारी तर स्वतःच्या दिलखेचक अदांमधून काहे छेड छेड मोहे करत समोर बसलेल्या देवदासला भुरळ पाडणारी अशी आपल्या सगळ्यांचीच लाडकी माधुरी दीक्षित !
हिंदी चित्रपट सृष्टीत आजवर अनेक जणांनी काम केली. स्वतःच्या अभिनयाने संपूर्ण देशात स्थान निर्माण केले. पण माधुरी दीक्षित हे नाव घेतल की तिच आजवरच मराठी आणि हिंदी करियर आपल्या डोळ्यासमोर उभ रहातं. मराठमोळ्या आणि मध्यमवर्गीय घरातून आलेल्या माधुरीने खूप कमी वयातच चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली. साधारण तीन दशक माधुरीने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले आणि अजूनही तिचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान कायम आहे.
माधुरीचा पहिला चित्रपट हा आभोध असला तरी ती खरी लोकांसमोर आली ते तेजाब मधून. आणि मग त्यानंतर राम लखन, परींदा, त्रिदेव, किशन कन्हेय्या, राजा अनेक चित्रपट तिचे प्रसिद्ध झालेले. ९० चे दशक तर दिल तो पागल हैं, बेटा, हम आपके हैं कौन अशा आणि अजून बर्याच चित्रपटांनी तिने गाजवले. पुढे आलेल्या देवदास, आजा नचले यातून तिच्या नृत्याची जादू असेल किंवा गुलाब गॅंग, देढ ईश्किया ते नुकताच आलेला कलंक असेल या सगळ्यात तिच्या हटके भूमिका बघायला मिळाल्या.
तिने जवळपास ७० चित्रपटांमध्ये काम केले आहेत. स्वतःच्या मातृभाषेला ती अजिबात विसरली नाही. आणि त्यातही तिने ‘बकेट लिस्ट’ नावाचा चित्रपट केला. ज्याच्यामुळे तिचा मराठी फॅनबेस आणखीनच वाढला.
या भूमिकांचे वेगळेपण म्हणजे तिचा अभिनय क्षेत्रातील कॉन्फिडंस.! साधारण प्रत्येक भूमिकेत तिने स्वतःला वेगळ्या अंदाजाने मांडले. चेहर्यावर कायम तेच सुंदर हसू, एकीकडे अभिनयातली कुशलता आणि वरुन उत्तम आणि लयदार नृत्यांची पर्वणी हे सुख माधुरीच्या कामातून मिळतं. तेजाब मधली मोहिनी असुदे, हम आपके है कौन मधली अल्लड वयातली तरुणी निशा असुदे, देवदास मधली कोठयावरची नर्तकी चंद्रमुखी असुदे, किंवा कलंक मधली निस्सीम प्रेम करणारी बहार बेगम असुदे तिच्या अभिनयाची जादू सर्वांवर आजही कायम आहे.
साधा आणि भावपूर्ण अभिनय करणार्या माधुरीला आजवर अनेक फिल्मफेयर अवॉर्डस मिळाले. त्याचबरोबरीने तिच्या आजवरच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील कारकिर्दीला सलाम म्हणून भारत सरकारचा मानाचा पुरस्कार असलेल्या पद्मश्री याने २००८ मध्ये सन्मानित करण्यात आले.
नृत्य म्हंटलं की माधुरी हे नाव पहिले डोळ्यासमोर येतं. बॉलीवुड मध्ये हेमा मालिनी, वहिदा रेहमान, वैजयंतीमाला, मधुबाला यांच्या नृत्यानंतर जर कोणी आजही रसिकांना केवळ नयन कटाक्षाने वेड लावणारी नृत्यांगना असेल तर ती माधुरी आहे. वयाच्या नवव्या वर्षी तिने कत्थक हे भारतीय शास्त्रीय नृत्य शिकायला सुरुवात केली. तिची नृत्यातली वाढत गेलेली आवड, अजूनही तितक्याच तन्मयतेने करत असेलेला रियाज हेच तिच्या भावपूर्ण आणि तालामयी नृत्याचे गमक आहे. तेव्हापासून तिने अनेक छोटे छोटे कार्यक्रम केले. आणि पुढे याचा फायदा झाला ते चित्रपटांमध्ये काम करतांना.
एक दो तीन, दीदी तेरा देवर दिवाना, हमको आज कल हैं, हम पे ये किसने हरा रंग डाला, घागरा सॉग, घर मोहे परदेसीया याच्या व्यतिरिक्त सुद्धा जवळपास ५० च्या वर गाणी तिच्या नावावर आहेत. या सगळ्यात एक गोष्ट सारखी आहे आणि ते म्हणजे तिच्या ‘दीलखेचक अदा’, ‘बोलके डोळे’ आणि ‘लावण्य’ यांचा सुरेख संगम.
केवळ तिचे हे नृत्य चित्रपटांकरता मर्यादित राहिले नाही तर तिने तिच्या चाहत्यांसाठी आणि ज्यांना खरोखरीच नृत्य शिकायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ‘डांस विथ माधुरी’ नावाची कंपनी सुरू केली आहे. जिथे ती वेगवेगळ्या स्टाईल्सची नृत्य ऑनलाइन शिकवते. इतकेच नाही तर रोज अजूनही अर्धा ते एक तास नृत्याचा रियाज कायम करते.
माधुरीकडे पाहिलं की कळत मधल्या काळात ती अमेरिकेला जरी राहायला गेली असली तरी तिच्या देशाला, संस्कृतीला ती विसरली नाही. आजही देश विदेशातील भारतीयांची ती आवडती असली तिचा अनेकविध प्रकारे सन्मान होत असला तरी मराठी मातीत रुजलेली तिची पाळमूळ कायम तिला मुंबईत बांधून ठेवतात.
कलेवर प्रेम करणार्या, कलेची साधना करणार्या आणि रसिकांना कायम स्वतःच्या अभिनयाने, नृत्याने आपलेसे करणार्या माधुरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
विपाली पदे