मनवा नाईकची साजेशी दिवाळी
“दिवाळी हा माझा अतिशय आवडता सण आहे. आजच्या आधुनिकीकरणाच्या युगात देखील आपली मराठमोळी परंपरा टिकते ती अशा सणांमुळे! दरवर्षी मी स्वतः कंदील तयार करते. कंदील तयार करणे हे माझे आवडते काम आहे. यंदाच्या वर्षी सुद्धा मी कंदील केले आहेत. माझा भाचा आठ वर्षांचा आहे. त्याला सुद्धा मी या कंदील बनवण्याच्या उपक्रमात सहभागी करून घेते. दरवर्षी दिवाळीचा माझा एक संकल्प असतो की फराळातील एक तरी पदार्थ नव्याने शिकायचा. आतापर्यंत मी चिवडा, बेसनलाडू आणि शंकरपाळे करायला शिकले आहे. रांगोळी काढायला सुद्धा मला आवडते.
आमच्या घरी दिवाळीला पार्टी आयोजित केली जाते. पण यंदाच्या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे ते शक्य नाही. दिवाळीच्या सुट्टीचे मी नियोजन केले आहे. त्यानुसार एक दिवस नवऱ्याबरोबर, एक दिवस सासरी, एकदिवस माहेरी आणि एक दिवस मित्र मैत्रिणींबरोबर दिवाळी साजरी करण्याचा माझा विचार आहे. दरवर्षी माझा नवरा मला दिवाळीला एक तरी सरप्राईज गिफ्ट देतोच.
फटाके मी वाजवत नाही. त्याच्या मागचे एक कारण सांगते. आमच्या घरी एक कुत्रा पाळला होता. बाहेर फटाक्यांचे आवाज झाले की तो कुत्रा प्रचंड घाबरायचा. माझ्या लक्षात आलं की लोक मजा म्हणून फटाके लावतात, पण या प्राण्यांना त्याचा किती त्रास होतो, याचा कोणी विचार करत नाही. त्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने आपण फटाके वाजवू नयेत, असे मी ठामपणे सांगेन.
हे वाचलंत का: सारेगमप आणि मुग्धा वैशंपायन
मालिकांच्या सेटवर देखील दिवाळी साजरी होतच असते. सेटवर सुद्धा फराळ आवर्जून आणला जातो. आजच्या युगात हे सण आपल्याला नात्यांचे महत्व शिकवणारे ठरत आहेत.”