दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
मनमोहन देसाई यांनी बदलला कुली सिनेमाचा क्लायमॅक्स
दिग्दर्शक आणि नायक(अथवा नायिका) यांच्यात जर जबरदस्त ट्युनिंग असेल तर कलाकृती नक्कीच अप्रतिम बनते. आपल्या हिंदी सिनेमाच्या इतिहासात दिग्दर्शक आणि कलाकार यांच्या अनेक जोड्या आहेत ज्या हिंदी सिनेमाला अधिकाधिक समृद्ध करून गेल्या. दिग्दर्शकाला काय हवं असतं हे कलाकाराला माहीत असतं आणि कलाकाराच्या काय क्षमता आहेत हे दिग्दर्शकाला ठाऊक असतं. त्यामुळेच गुलजार आणि संजीव कुमार, शक्ती सामंत आणि राजेश खन्ना, मनमोहन देसाई (Manmohan Desai) आणि अमिताभ बच्चन, बिमल रॉय आणि नूतन अशा अनेक जोड्या आपल्याला चटकन आठवतात. बरीच वर्ष एकत्र काम केल्यानंतर त्यांच्यातील व्यावसायिक संबंधा सोबतच एक भावनिक नाते देखील तयार झालेले असते. अमिताभ बच्चन आणि मनमोहन देसाई यांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले. अमर अकबर अँथनी, देश प्रेमी, मर्द, नसीब, गंगा जमुना सरस्वती, सुहाग आणि कुली! ‘कुली’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान तो ‘ऐतिहासिक’ अपघात घडला. ज्यात अमिताभ बच्चन अतिशय वाईट पद्धतीने जखमी झाला आणि हा अपघात त्याला मरणाच्या दारात घेवून जाणारा होता.
त्यानंतर देशभर त्याच्या प्रकृतीसाठी प्रार्थना सुरू झाल्या. सारा देश जणू एक कुटुंब झाला होता आणि या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती अमिताभ बच्चन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता. त्या काळात मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा सगळीकडे अमिताभच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी प्रार्थना होत होत्या. शाळा महाविद्यालयात सकाळी प्रार्थना झाली की, अमिताभ साठी वेगळी प्रार्थना होत होती. आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी दिल्लीहून खास अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी मुंबईला आल्या होत्या. हा सारा इतिहास आजच्या काळातल्या तरुण पिढीला कदाचित खोटा वाटू शकतो पण त्या काळात हे सर्व घडलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या लोकप्रिय मध्ये प्रचंड मोठी अशी वाढ झाली होती. या अपघातातून वाचल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जेव्हा पुन्हा ‘कुली’ या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले त्यावेळी या सिनेमाचा असलेला क्लायमॅक्स मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी बदलला! मूळ क्लायमॅक्स मध्ये चित्रपटाचा नायक अमिताभ बच्चन याचा मृत्यू दाखवला जाणार होता. परंतु ज्यावेळी त्यांनी पाहिलं की, सारा देश अमिताभ साठी प्रार्थना करत होता, या सदिच्छा मधूनच तो मृत्यूचा पराभव करून परत आला होता अशा वेळी त्याचे सर्व चाहते अमिताभ बच्चन यांचा चित्रपटातील मृत्यू देखील कबूल करणार नाहीत आणि सहन तर अजिबात करणार नाहीत! त्याच्या चाहत्यांना हा शेवट अजिबात आवडणार नाही.
त्यामुळे मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी या चित्रपटाचा शेवट बदलला. ज्यामध्ये अमिताभ बच्चन गोळ्या लागून देखील वाचलेला दाखवला आहे आणि या सिनेमाचा हॅप्पी एंड करण्यात आला. मनमोहन देसाई यांच्या या क्लुप्तीमुळे चित्रपटाला प्रचंड असे यश मिळाले. अमिताभ बच्चन यांच्या सिनेकारकिर्दीतील हा एक माइल स्टोन सिनेमा बनला. हा चित्रपट पूर्ण झाल्यानंतर मनमोहन देसाई यांनी त्यात एक गाणे नंतर ॲड केले. गाण्याचे बोल होते ‘ दोनो जवानी की मस्ती मे चूर तेरा कसूर ना मेरा कसूर ना तुने सिग्नल देखा ना मैने सिग्नल देखा एक्सीडेंट हो गया रब्बा रब्बा….’ या चित्रपटातील एक्सीडेंट ला आणि त्याच्या लोकप्रिय त्याला कॅश करण्यासाठी मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी हे गाणं या चित्रपटात घेतलं होतं जे सिनेमा पूर्ण झाल्यानंतर त्यात ॲड करण्यात आले. तसेच ज्या शॉट च्या वेळी अमिताभ बच्चन यांना दुखापत झाली तो शॉट देखील फ्रीज करून सिनेमात दाखवण्यात आला आणि तिथे टायटल टाकण्यात आले ‘याच शॉर्टच्या वेळी अमिताभ बच्चन यांचा अपघात झाला होता!’ ‘कुली’ या चित्रपटाबद्दल खूप काही सांगण्यासाठी आहे. दुर्दैवाने आपल्याकडे लोकप्रिय चित्रपटाच्या इतिहासाकडे फारसं कोणी लक्ष देत नाही किंवा गांभीर्याने घेत नाही. खरंतर सिनेमा हे जनरंजनाचे सर्वात मोठे साधन आहे आणि जी कला समाजाचे मनोरंजन करते ती कलाकृती वाईट कशी असू शकते? त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचे ॲनॅलिसीस करताना त्याच्या चित्रपटातील लोकप्रियतेच्या निकषाला दूर ठेवून चालणार नाही.
======
हे देखील वाचा : नालासोपारा रेल्वे स्टेशनवर सुचलेल्या ट्यूनवर बनले हिट गाणे!
======
या चित्रपटातील ज्या गाण्याचा वर मी उल्लेख केला आहे त्यातील ‘अल्लारखा’ हा शब्द चित्रपटाचे सह दिग्दर्शक प्रयागराज यांनी गायला (उच्चारला) आहे. रसिकांना ठाऊक असेल तर १९६१ साली प्रदर्शित झालेल्या ‘जंगली’ या चित्रपटातील ‘चाहे कोई मुझे जंगली कहे…’ या गाण्यातील ‘याहू ss’ हा शब्द देखील प्रयागराज यांनीच गायला उच्चारला होता. खरंतर मनमोहन देसाई (Manmohan Desai) यांनी हा सिनेमा ‘देशप्रेमी’ नंतरच लगेच सुरू केला होता. पण हा सिनेमा अर्धवट असताना त्यानी ‘नसीब’ वर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच नसीब हा चित्रपट आधी बनला आणि प्रदर्शित झाला. त्यामुळेच नसीब या चित्रपटातील ‘चल मेरे भाई तेरे हात जोडता हू’ या गाण्यात आपल्याला कुली या सिनेमाचे पोस्टर दिसते! २ डिसेंबर १९८३ रोजी कुली प्रदर्शित झाला आणि बम्पर हिट झाला.