बॉलिवूडलाही पडतेय प्रमोशनसाठी ‘मराठी’ इन्फ्लुएन्सरची गरज…
कोणत्याही मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातल्या आईच्या ओरड्यापासून टिपिकल संस्कारापर्यंत प्रत्येक गोष्टीकडे बारकाईनं पाहिलं, तर त्यावर सोशल मीडियासाठी भरपूर विनोदी कंटेट तयार होऊ शकतो, हे आज आपल्याला माहीत असलं, तरी त्यामागचं कारण आहेत, ती इन्स्टाग्रामवर सध्या धुमाकूळ घालत असलेली कंटेट क्रिएटर मराठी पोरंपोरी. (Marathi Instagram influencers)
मराठी माणसाच्या वागण्या-बोलण्यातला विनोद आपले रील्स- व्हॉल्ग्जमधून सातत्याने मांडत, जोडीला भन्नाट केमिस्ट्री आणि अभिनयाचा तडका देत हे इन्फ्लुएन्सरर्स भरपूर लोकप्रिय झाले आहेत. नीळ साळेकर जस्टनीलथिंग्जचा, सरफरे वहिनीचं अफलातून कॅरेक्टर साकारणारा सिद्धांत सरफरे आणि त्याला साथ देणारा करण सोनावणे उर्फ सोनावणे वहिनी, बाSSSSSवळट म्हणत लोकांच्या वागण्यावर ताशेरे ओढणारी मृणाल दिवेकर, पुणेरी कोट्यांनी हसवणारा अथर्व सुदामे, धमाल रील्स आणि बीई रोजगार या वेबसीरीजमुळे चर्चेत आलेला डॅनी पंडित, ‘नमस्कार मंडळी चला जेवायला’ म्हणत एक वेगळा ट्रेंड सुरू करणारं प्रसाद आणि दीपिका हे जोडपं, सौरभ घाडगे, वृषाली जवळे, सुशांत घाडगे अशी मराठी मंडळी इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर प्रचंड लोकप्रिय आहेत. विशेष म्हणजे, प्रामुख्याने मराठी कंटेट हिरीरीनं सादर करत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख तयार केली आहे.
बॉलिवूडचं पान हलेना
या सर्व युट्यूबर्सनी आपल्या धमाल, विनोदी रील्समधून लाखोंचा चाहतावर्ग तयार केला आहे. छोट्या- मोठ्या गोष्टीत विनोद शोधणं, इन्स्टावर लोकप्रिय झालेल्या एखाद्या गाण्याला विनोदाचा अतरंगी तडका देणं, मुळात म्हणजे, साध्या सोप्या गोष्टी किंवा सवयी- वागण्यातून एरवी लक्षात न येणाऱ्या विनोदावर बोट ठेवणं, ही या सर्वांची खासियत आहे. त्यांच्या या प्रयत्नांना मराठी तरुणाईनं दाद देणं स्वाभाविकच होतं. (Marathi Instagram influencers)
फक्त मराठीच नव्हे, तर देशभरातल्या आणि मूळचे भारतीय असणाऱ्या पण आता परदेशात वास्तव्यास असणाऱ्या कंटेंट क्रिएटर्सची असलेली दोस्ती त्यांच्या कोलॅब्जमध्येही दिसून येते. मराठी प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या या सगळ्यांना आज बॉलिवूड सिनेमांच्या प्रमोशनमध्ये मानाचं स्थान आहे. माधुरी दीक्षित, आयुषमान खुराना, आलिया भट्ट, अजय देवगण, विद्या बालन, आमीर खान, नवाझुद्दीन सिद्दीकी, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर, कार्तिक आर्यन असे बॉलिवूडचे मोठे सेलिब्रेटीज मराठी इन्स्टाग्रामर्सच्या रील्समध्ये आवर्जून हजेरी लावताना, त्यांच्यासोबत मराठीतून गप्पा मारताना दिसतात.
यातल्या बहुतेकांनी युट्युबवरून आपल्या कंटेट क्रिएशन करियरची सुरुवात केली. मात्र, इन्स्टाग्राम किंवा युट्यूब शॉर्ट्समुळे त्यांना खरी चालना मिळाली. तिथे कमीत कमी वेळात चांगला कंटेट मांडणं आव्हानात्मक होतं, पण विनोदी कंटेंट झटपट मांडण्यासाठी ते फायद्याचं ठरलं. (Marathi Instagram influencers)
गंमत किंवा हौस म्हणून सुरुवात करत आपल्याला हे आवडतंय, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय म्हणून अथर्व सुदामेनं याकडे गांभीर्यानं पाहायला सुरुवात केली, तर लॉकडाउनमध्ये इतरांच्या नोकऱ्या जात असल्याच्या पार्श्वभूमीवर स्वतःचं काहीतरी वेगळं- सर्जनशील करायचं म्हणून नील साळेकरनं ‘जस्टनीलथिंग्ज’ हे अकाउंट सुरू केलं आणि दोन वर्षात सातत्यानं कंटेट देत त्यानं मोठी झेप घेतली.
माझे व्हिडिओज हसवणारे असले, तरी ते तयार करण्याचं काम मी खूप गंभीरपणे करतो असंही नील सांगतो. बॉलिवूड सेलिब्रेटीजबरोबर स्थानिक ते आंतरराष्ट्रीय ब्रँड्स, ओटीटी प्लॅटफॉर्म, विविध प्रकारचे उत्पादक यांच्याकडूनही मराठी इन्स्टाग्रामर्सना खूप मागणी आहे. आजकाल मराठी डिजिटल विश्वात होत असलेल्या वेगवेगळ्या वेबसीरीजमध्येही त्यांना संधी मिळताना दिसत आहे. त्यामुळे हे सगळेच क्रिएटर्स आपल्या कामातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याबरोबरच तरुणाईला प्रेरणाही देत आहेत. (Marathi Instagram influencers)
नील साळेकर, सिद्धांत सरफरे, करण सोनावणे, मृणाल दिवेकर, अथर्व सुदामे, सौरभ घाडगे या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या तरुणांचा आज इन्स्टाग्रामवर बोलबाला आहे. या इन्फ्लुएन्सर- युट्युबर्सचं फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे, म्हणूनच बॉलिवूड कलाकारांचंही सिनेमा प्रमोशनसाठी त्यांच्याशिवाय पान हलत नाही. त्यामुळे या तरुणांनी मनोरंजन क्षेत्रात जाणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. (Marathi Instagram influencers)
– कीर्ती परचुरे