
Sundar Mi Honar Natak: पु.ल.देशपांडे यांचं नाटक ३० वर्षांनी रंगभूमीवर येणार!
मराठी साहित्यात पु.ल.देशपांडे यांचं अमुल्य योगदान आहे. त्यांच्या लिखाणातून अनेक अजरामर कलाकृती घडल्या. लवकरच त्यांनी लिहिलेलं नाटक तब्बल ३० वर्षांनी पुन्हा एकदा रंगभूमी गाजवणार आहे. सुंदर मी होणार हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून यात अभिजीत चव्हाण आता प्रथमच वेगळ्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘सुंदर मी होणार’ या नाटकातल्या महाराज (संस्थानिक) या महत्त्वपूर्ण भूमिकेतून अभिजीत चव्हाण अनेक वर्षानंतर मराठी रंगभूमीवर काम करणार आहेत. स्वतःची विनोदी इमेज ब्रेक करत एक अत्यंत गंभीर आणि भावनिक पात्र साकारण्याचे शिवधनुष्य पेलणाऱ्या अभिजीत यांना साथ करत अभिनेते अमोल बावडेकर यांचा ही अनोखा अंदाज या नाटकात पाहायला मिळणार आहे. महाराजांचा जावई म्हणजेच सुरेश या गायकाच्या भूमिकेत हरहुन्नरी अभिनेते अमोल बावडेकर दिसणार आहेत. (Sundar Mi Honar Marathi Natak)

पुलंचे ‘सुंदर मी होणार’ हे नाटक तब्बल ३० वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘अभिजात’ प्रकाशित या नाटकाची दिग्दर्शकीय धुरा राजेश देशपांडे सांभाळणार आहेत. करण देसाई आणि आकाश भडसावळे निर्मित हे नाटक ‘पुलं’च्या स्मृतिदिनी आणि ज्येष्ठ साहित्यिका सुनीताबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त १२ जूनला देखण्या नट संचात रंगमंचावर दाखल होणार आहेत.

‘सुंदर मी होणार’ या नाटकाचा विषय हा भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा आहे. भारतातील राजघराणी, संस्थाने पूर्णपणे खालसा झाल्यानंतरच्या बदलाचा सर्वांना जबरदस्त फटका बसला होता. काहींनी काळाप्रमाणे स्वतःला बदलून घेतले, तर काहींनी सत्ता नसताना सुद्धा त्याच तोऱ्यात, अवेशात राहणे कवटाळले होते. पु.ल. देशपांडे यांनी ‘सुंदर मी होणार’ या नाटकातून आपल्या लेखन समर्थ्याने अधोरेखित केलं आहे.
===================================
===================================
नाटकात आस्ताद काळे, स्वानंदी टिकेकर, श्रुजा प्रभुदेसाई, सृजन देशपांडे, श्रुती पाटील, विराजस ओढेकर यांच्या भूमिका आहेत. नाटकाचे संगीत मिलिंद जोशी यांचे आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. नाटकाचा पुण्यातील शुभारंभ १२ जून या दिवशी होणार असून मुंबईत १३ जून आणि नाशिक येथे २२ जून असे शुभारंभाचे प्रयोग होणार आहेत.