लठ्ठपणाची लाज नको गं बाई!
नायिका म्हटलं की झिरो फिगर, तरतरीत नाक, परफेक्ट जॉ लाईन असे साधारण आज पर्यंतचे निकष होते. नायक अगदी रांगडा, वजनदार असला तरी चालेल पण नायिका मात्र कमनीय बांधा असलेलीच हवी कारण सौंदर्याच्या परिभाषेत तिची सुंदर देहयष्टी हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला. परंतु आता मात्र या सगळ्या संकल्पना मालिका विश्वात बदलतांना दिसत आहेत… अलिकडच्या काळात प्लस साईज नायिकेला केंद्रस्थानी ठेवून मालिका, सिनेमाचे विषय प्रेक्षकांपुढे येत आहेत…
उदाहरणं घ्यायची झाली तर ‘वजनदार’सारख्या सिनेमातून हा विषय हाताळला गेला. त्यातील
मऊ स्वप्नांची, मुडी रंगाची, चबी चबी परी तू… हॉ
लाडू दिसणारी, गोडु हसणारी, इवलीशी गोलू पोलु
हे गाणं तर इतक लोकप्रिय झालं की ते आजही इन्स्टाग्राम रीलसाठी ट्रेंडिंग आहे… ‘झी युवा’वरील डान्सिंग क्वीनच्या ताज्या सिझनमध्ये वजनदार नृत्यांगनांची स्पर्धा आयोजित केली गेली. डेली सोप च म्हणायला गेल तर सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील लतिका, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील स्वीटू यांनी घराघरात आणि प्रेक्षकांच्या मनामनातं अढळ स्थान मिळवलं… आणि प्रेक्षकांनी देखील या गुबगुबीत दमदार नायिकांना पसंती दिली.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ (Sundara Manamadhe Bharli) मालिकेचं कथानक बघायचं झालं तर फिटनेससाठी वेडा असणारा अभिमन्यू आणि वजनदार लतिका यांच्याभोवती फिरतं. फक्त शरीरच नाही, तर मेंदूही फिट असावा लागतो, असं लतिका म्हणताना दिसते… सुरूवातीला अभिमन्यू लतिकाची तिच्या शरीरयष्टीवरून हेटाळणी करतो तिला चिडवतो पण ती तितक्याच परखडपणे त्याला सडेतोड प्रत्युत्तर देते असं प्रोमो मध्ये दिसतं. तिला तिच्या शरीरयष्टीमुळे पस्तीस वेळा लग्नाला नकार येतो पण कालांतराने लतिकाशी अभिमन्यूचं एका अपरिहार्य कारणाने मनाविरूद्ध लग्न होतं पण आता हळूहळू दोघांत प्रेम फुलतांना मालिकेत दिसतयं.
संसारासाठी फक्त फोटोत जोडा सुंदर दिसून चालत नाही तर खऱ्या आयुष्यात दोन सुंदर मनांची गुंफण झाल्याने, एकमेकांना भक्कम साथ देण्याने तो टिकतो आणि फुलतो असाच काहीचा संदेश या मालिकेतून अधोरेखीत होतोय. नुकत्याच झालेल्या कलर्स मराठी अवॉर्ड्समध्ये लतिकाच्या व्यक्तिरेखेसाठी सर्वोत्कृष्ट नायिकेचा सन्मान देखील मिळालाय. यावरून असंच लक्षात येतं कि अशा वजनदार नायिकाही प्रेक्षकांना तितक्याच भावतांना दिसत आहेत.
त्याचप्रमाणे झी मराठी वाहिनीवरील मालिका ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ (Yeu Kashi Tashi Me Nandayla) सध्या चाहत्यांच्या भलतीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेतील ओम आणि स्वीटूमधील केमिस्ट्री त्यांचे रोमँटीक क्षण स्क्रीनवर प्रेक्षकांना आता खिळवून ठेवत आहे. हिरो आणि हिरोईनमध्ये दिसण्याच्या बाबतीत विभिन्नता आहे. हिरो फीट, तर हिरॉईन फॅट आहे. तिला तिच्या ओवरवेट मुळे मालिकेतील कथानकानुसार अपमान सहन करावा लागतोय. पण त्यामुळे ती खचत नाहीये तर धीराने सगळयाला सामोरी जात असतांनाच अचानक ओमच्या प्रेमाची झुळूक तिच्या आयुष्यात येतेय. या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेल्या वजनदार स्वीटूने आपल्या निरागस आणि सोज्वळतेने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं आहे. यापुढे ओम आणि स्वीटूच्या प्रेमाचा प्रवास पाहणं एक सुखद अनुभव असेल यात शंका नाही. स्वीटूची भूमिका अभिनेत्री अन्विता फलटणकर अतिशय उत्तम प्रकारे साकारत आहे.
अशाप्रकारे आठ वाजता येऊ कशी तशी मी नांदायला मधील स्वीटू, नऊ वाजता सुंदरा मनामध्ये भरली मधील लतिका पाहण्याला प्रेक्षक पसंती देत आहेत. प्राईम टाईमच्या मराठी मालिकांमध्ये सध्या प्लस साईजच्या नायिकांच वर्चस्व प्रस्थापित होतांना दिसतं. आता बारीक, सडपातळ या सौंदर्याच्या तथाकथित व्याख्यांची चिरफाड करणाऱ्या नायिका सध्या छोटा पडदा गाजवत आहेत अस म्हणायला हरकत नाही.
– सिध्दी सुभाष कदम