मर्लिन मेनरो… सौदर्यांची मुक्त उधळण हिला घडवतांना देवांनं केली!
युद्ध कोणाला आवडतं. कोणालाही नाही. पण युद्धाने एका युवतीचं नशिब उघडलं. तिला ओळख मिळाली. अख्ख जग तिच्या प्रेमात पडलं. ती आज या जगात नाही. तरीही तिच्या लोकप्रियेतेमध्ये कणभरही कमतरता आला नाही. लाखो लोक तिची नुसती छबी बघून हरखून जातात. हजारो तरुणी मला तिच्यासारखंच दिसायचंय म्हणून तिच्या सोनेरी केसांची स्टाईल मारतात. तिच्यासारखी लाल चुटूक लिपस्टीक पसंत करतात. फॅशन हाऊसमध्ये तिची छबी असलेल्या कपड्यांना तेवढीच मागणी आहे. ही सौदर्यतारका आहे मर्लिन मनरो. मर्लिन. म्हटलं की तिचा फोटो नसतानाही तिची छबी डोळ्यासमोर येते. ती ही तारका. सौदर्यांची मुक्त उधळण हिला घडवतांना देवांनं केली जणू. पण तिच्या वाट्याला सुख द्यायचं तो विसरला असणार. कारण इनमिन 36 वर्षाच्या आयुष्यात अगदी जन्मापासून ते मृत्युपर्यंत तिला दुःख, एकाकीपणाच अधिक भोगायला लागला. ती जाईल तिथं उत्साह संचारायचा. हॉलिवूडची ती राणी होती. पण जेव्हा ती एकटी असायची तेव्हा मात्र ती एकाकीपणाच्या दुःखात असायची. सौंदर्यवती मर्लिन मेनरोचा आज 1 जून ला वाढदिवस. आज मर्लिन असती तर तिने नव्वदी पार केलेली असती. अर्थात या वयातही ती तेवढीच सुंदर दिसली असती.
अमेरिकेची सौंदर्यदेवता म्हणून ओळख मिळालेल्या मर्लिनला मिळालेलं छोटं आयुष्यही मोठं रंजक होतं. तिचा जन्म 1 जून 1926 रोजी लॉस एंजेलिस मध्ये झाला. मुळ नाव नोर्मो मोर्टेंसन. वडील कोण हे माहीत नाही. तिची आई मानसिक आजरांनी त्रस्त. त्यामुळे या नोर्मोला जन्मापासून अनेक नातेवाईकांकडे रहावं लागलं. अगदी अनाथाश्रमातही रहावं लागलं. शिक्षणही एकाच शाळेत झालं नाही. अवघ्या नऊ वर्षाच्या नोर्मोला तिच्या काही नातेवाईंकडून शारीरिक त्रासालाही सामोरं जावं लागलं. वयाच्या सोळाव्या वर्षी या नोर्मोचं लग्न जिम डोहार्टी बरोबर झालं. जिम खलाशी होता. घरी साधारण परिस्थिती. लग्नानंतर वर्षभरातच दुसरं महायुद्ध सुरु झालं. त्यामुळे जिम बोटीवर गेला. नोर्मो आणि तिची सासू एका एअरक्राफ्ट कंपनीमध्ये नोकरीला होते. पॅकेंजींग किंवा अशाच स्वरुपाचं काम. या फॅक्टरीमध्ये एक फोटोग्राफर आला. युद्धकाळात सरकार कशाप्रकारे महिलांना रोजगार देत आहे, अशा स्वरुपाची त्याची स्टोरी होती.त्यात त्याला एक चेहरा सापडला. नार्मो मोर्टेसन अर्थात मर्लिनचा जन्म तिथेच झाला. हा फोटो बराच नावाजला झाला. तोपर्यंत मर्लिनचं नाम मर्लिन झालं नव्हतं. आपल्या सौंदर्याची तिला कल्पना होती. या सौंदर्यामुळे तिला अनेकांच्या वाईट नजराही झेलाव्या लागल्या होत्या. पण या सौंदर्याच्या जोरावर आपण एक न एक दिवस मॉडेलिंगमध्ये नाव कमावणार अशी ती स्वप्नं बघत होती. तिच्या फोटोनंतर मॉडेलिंगच्या ऑफर सुरु झाल्या. 1946 मध्ये तिने फॉक्सबरोबर मॉडेलिंगसाठी पहिला करार केला. इथेच तिचं लोकप्रिय असं नामकरणही झालं. मर्लिन मनरो. त्यातील मनरो हे तिच्या आजीचं नाव. इथून तिचा मॉडेल आणि अभिनेत्री होण्यासाठीचा प्रवास सुरु झाला. अर्थातच तिच्या नव-याचा या सर्वाला विरोध होता. मग मर्लिन आपल्या पहिल्या नव-याला घटस्फोट देऊन मार्गस्थ झाली.
नवख्या मर्लिनने हॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्यासाठी नेमलेला एजंट हा अगदीच साधारण चित्रपट मिळवून देत असे. यात मर्लिनच्या अभिनयापेक्षा तिच्या शरीराचेच जास्त प्रदर्शन होत असे. पण मर्लिन जिद्दीची होती. एक ना एक दिवस आपला असेल हे तिला माहित होते जणू. तिने काही सी ग्रेडच्या चित्रपटातही काम केले. नवख्या अभिनेत्रीला जे हवं असतं ते तिलाही हवं होतं. पैसा आणि प्रसिद्धी.
1953 मध्ये मर्लिनचा नियाग्रा नावाचा चित्रपट आला. त्यात मर्लिनच्या सौंदर्याबरोबर तिच्या अभिनयाचेही कौतुक झाले. सुरुवातीला अभिनयात अगदीच नवखी असलेली मर्लिन आता सरावू लागली होती. तिने 30 पेक्षा अधिक चित्रपटात भूमिका केली. जंटलमॅन प्रोफर ब्लार्डीज, द सेव्हन इयर इच, बस रटॉप, सम लाइक इज हॉट. हाऊ टू मॅरी ए मिलीयो नेअर, ए स्ट्रीट कार नेम डीझायनर, देअर इज नो बिझनेस लाईक शो बिझनेस, दि एम्फाल्ट जंगल निआग्रा, द प्रिंन्स, द शो गर्ल या प्रमुख चित्रपटांचा समावेश आहे. त्यातला त्यात दि सेव्हन इयर इच अजूनच खास. तो मर्लिनचा सर्वात लोकप्रिय फोटो आठवतो का. मर्लिन हवेनं उडणा-या आपल्या पांढ-या घोळदार ड्रेसला आवरतेय. हा फोटो याच चित्रपटातला. त्याला सब-बे ड्रेस असे नाव देण्यात आले. मर्लिन गेल्यावर या ड्रेसचा लिलाव करण्यात आला तेव्हा 5.6 मिलीयन डॉलरला या ड्रेसची विक्री झाली. या छायाचित्राच्या तेव्हा तब्बल 80 लाख प्रति विकल्या गेल्या. हा एक विक्रम होता. याच फोटोनंतर मर्लिनला सौंदर्याची देवता, स्वप्न सुंदरी असे किताब मिळाले. या छायाचित्रानं मर्लिन मेनरो हे नाव जगभरात प्रसिद्ध झालं. दरम्यान मर्लिननं प्रसिद्ध बेसबॉल खेळाडू जो डीमॅगो बरोबर लग्न केलं होतं. या फोटोचं वादळ, ग्लॅमर या लग्नावर बहुधा भारी पडलं. अवघ्या दहा महिन्यात मर्लिनच्या दुस-या लग्नाचा घटस्फोट झाला.
मर्लिनच्या आयुष्यावर मात्र याचा काहीही परिणाम झाला नाही. पूर्वीचं तिचं आयुष्य बदलून गेलं होतं. आता पैसा आणि प्रसिद्धी दोन्हीही तिच्याकडे होतं. तिची एक झलक पाहण्यासाठी लाखो लोक तासनतास उभे राहत. तिची अनेक प्रेमप्रकरणही होती. अनेक मान्यवरांबरोबर तिचं नाव जोडलं गेलं. या अफवा होत्या की वास्तव याचं मर्लिन कधी स्पष्टीकरण देत बसली नाही. गायक फ्रैंक सिनात्रा, आर्थर मिलर, मार्टिन ब्रांडो यांच्याबरोबर तिचं नाव जोडलं गेलं. त्यासोबत आणखी एक नाव होतं. या प्रेमप्रकरणाची अजूनही तेवढ्याच उत्सुकतेनं चर्चा होते ते नाव म्हणजे अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रपती जॉन एफ केनडी आणि त्यांचा भाऊ रॉबर्ट एफ केनडी.
मर्लिननं अभिनय, मॉडेलिंग सोबत गाण्यातही आपलं नशिब अजमावलं होतं. त्यातही तिच्या चाहत्यांनी तिला डोक्यावर घेतलं जणू. बाय बाय बेबी आणि लेटस् मेक लव यासारखी गाणी गाजली आणि अजूनही गायली जातात. त्यातच केनडी यांच्या वाढदिवसाला मर्लिननं आपल्या मधाळ आवाजात हॅपी बर्थ डे. हॅपी बर्थ डे मिस्टर प्रेसिडंट. हे गाणं गायलं. या गाण्यानं त्या वाढदिवसाच्या पार्टीचा अवघा माहौलच बदलून गेला. पार्टीत मर्लिन आपल्या खास गेटअपमध्ये आली होती. चमचमता असा पायघोळ गाऊन तिनं घातला होता. इथूनच केनडी आणि मर्लिन यांची प्रेमकहाणी सुरु झाली असं म्हणतात. कारण या वाढदिवसाच्या पार्टीनंतर मर्लिन-केनडी ही जोडी अनेकवेळा लोकांसमोर जाहीरपणे आली.
मर्लिननं नाटकार आर्थर मिलर यांच्याबरोबर तिसरं लग्नही केलं होतं. पण या आधीच्या लग्नांसारखंच हे लग्न ठरलं. काही वर्षातच इथेही घटस्फोट झाला. पुन्हा मर्लिन एकाकी झाली. तीन लग्न, तीन घटस्फोट आणि तीनवेळा झालेला गर्भपात. यामुळे मर्लिन अस्वस्थ होती. केनडी यांच्याबरोबर तिचं नाव जोडलं गेलं पण या नात्यात वादच अधिक झाले. मर्लिन त्यामुळेही अस्वस्थ होती. त्यामुळे तिला मानसिक आजाराला तोंड द्यावे लागले. तिच्या आई आणि आजीलाही अशाच प्रकारचा आजार होता. मर्लिनकडे हा नकोसा वारसा आला होता. तिला अनेकवेळा उपचारांसाठी हॉस्पिटलचा आधार घ्यावा लागला. रात्र-रात्र झोप येत नसे. उपाय म्हणून झोपेच्या गोळ्यांना तिनं जवळं केलं. ड्रींकचं प्रमाणही वाढलं. मर्लिनच्या आयुष्याचे दोन भाग झाले. एक कॅमे-यासमोरचा. सगळं कसं छान छान आहे हा. आणि दुसरा भाग काळोखाचा. यात ती नशेत असायची. झोपेच्या गोळ्या घ्यायची. मुख्य म्हणजे ती एकाकी असायची.
त्यात मर्लिनला अजून एक शंका त्रस्त करत होती. तिनं वयाची पस्तीशी पार केली होती. लवकरच वयाची चाळीशी येईल. हॉलिवूडमध्ये नवनवीन अभिनेत्री येत होत्या. त्यांना चांगल्या भूमिकाही मिळत होत्या. या तरुण अभिनेत्रींच्या पुढे आपला निभाव लागेल का, ही चिंता तिला लागली होती. तिला कायम तरुण रहायचं होतं. या चिंतेमध्ये की काय तिने मर्लिन नावाचं वादळ पुन्हा एकदा उडवून दिलं. तिनं वयाच्या 36 व्या वर्षी वोग या प्रसिद्ध मॅगझिनसाठी न्यूड फोटोसेशन केलं. या फोटोसेशननंतर मर्लिनची लोकप्रियता जणू आकाशाला लागली होती. ती जिथे जाईल तिथे तिला नुसतं बघण्यासाठी लाखो चाहते गर्दी करु लागले. मर्लिनला गर्दी नेहमी आवडायची. मर्लिन मानसिक ताणातून बाहेर पडली असेच कोणाला वाटेल इतकी ती खूष असायची. हे असतांना एका सकाळी बातमी आली मर्लिन गेली. मर्लिन मनरो वारली. झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस झाला आणि मर्लिन मनरोचे झोपेतच निधन झाले. या बातमीमुळे मोठा गहजब झाला. तिच्या मृत्यूमागे अमेरिकी गुप्तहेर संघटना सीआए, जॉन केनडी, स्मगलर अशी अनेकांची नावे घेण्यात आली. खूप तपास झाला. पण हे सर्व गुढ प्रकरण जिथून सुरु झाले तिथेच येऊन थांबले. मर्लिनला झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त झाला होता असाच निष्कर्ष पुढे आला. तिच्या मृत्यूनंतर अनेक दावे आले. तिच्याबरोबर त्या अखेरच्या रात्री कोण होते, याचे अनेक दावे झाले. पण त्यातून काहीही पुढे आलं नाही. आजही अमेरिकेमधील सर्वात मिस्ट्री केसमध्ये मर्लिन मनरोच्या मृत्यू प्रकरणाचा समावेश होतो.
मर्लिन होतीच तशी. तिच्यावर कितीतरी चित्रपट बनले. डॉक्युमेंटरही. तिने ज्या वोग मॅगझिनसाठी न्यूड फोटोसेशन केले होते. ते मॅगझिनही तिच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. कायम तरुण दिसण्यासाठी धडपडणारी मर्लिन आपले हे फोटो पाहू शकली नाही. पण ती चिरतरुण आहे. आजही हॉलिवूडमध्ये मर्लिन मनरो या नावावर दरवर्षी 100 करोडचा व्यवहार होतो. मर्लिन म्हणजे काय आहे हे माहित आहे. मर्लिन ही एक शोकांतिका आहे. सौंदर्यवान शोकांतिका.
-सई बने