‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मसाबा मसाबा
पर्व : पहिले
ऑनलाईन ॲप : नेटफ्लिक्स
कलाकार : नसिरुद्दीन शहा, मसाबा गुप्ता, नीना गुप्ता, नील भूमपालम, रीतषा राठोड आणि इतर
सारांश : मसाबा गुप्ताचं नावं माहिती नाही, अशी व्यक्ती हिंदी चित्रपटसृष्टी आणि ‘पेज ३’ वलयामध्ये सापडणे अगदीच दुर्लभ. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ताची मुलगी या तिच्या मूळ ओळखीपलीकडे भारतातील अग्रगण्य फॅशन डिझायनर ही ओळख तिने स्वतःच्या मेहनतीने बनवली आहे. तिचं करियर, खाजगी आयुष्य, प्रेमप्रकरणे, लग्न अशी प्रत्येक गोष्ट माध्यमांनी चवीने चघळली. पण तरीही लोकांचे टोमणे, गॉसिप या पलीकडे स्वतंत्र स्त्री म्हणून आपली ओळख तिने हट्टाने जपली. नेटफ्लिक्सची नवी सिरीज ‘मसाबा मसाबा’मध्ये या आरशापलीकडील मसाबा आणि नीना गुप्ताच्या आयुष्यात डोकावण्याची संधी प्रेक्षकांना देते. या दोघींच्या आयुष्यातील काही घटनांचा संदर्भ सिरीजच्या कथानकामध्ये पहायला मिळतो. या घटनांना काल्पनिक पात्रे आणि प्रसंगांची फोडणी दिल्यामुळे सिरीजच्या कथानकामुळे वाढीवच्या गॉसिपना आळा घातला गेला आहे. पण सत्य आणि काल्पनिक घटनांचा हा मेळ घालत असताना कथानकाची सुसूत्रता काही ठिकाणी डळमळीत होते आणि सिरीज पाहताना हे प्रकर्षाने जाणवतं.
सिरीजची सुरवात होते ती मसाबाच्या घटस्फोटाच्या चर्चेने. एका नामांकित वृत्तपत्राच्या गॉसिप रकान्यामध्ये मसाबा आणि तिचा नवरा विनय यांचा घटस्फोटाबद्दल बातमी छापली जाते. एकीकडे या बातमीचा अपेक्षित परिणाम म्हणून सगळीकडे याच्या चर्चा सुरु व्हायला लागतात, तर दुसरीकडे मसाबा आणि विनय मात्र एका नेमक्या निर्णयापर्यंत आलेले नसतात. त्यामुळे मिडियापासून ते सोशल मिडियापर्यंत प्रत्येकाने विचारलेल्या असंख्य प्रश्नांची नक्की काय उत्तर द्यायचं याची त्यांच्याकडे काहीही निश्चितता नसते. अशात मसाबा आर्थिक गर्तेत सापडलेली असते. एकीकडे गुंतवणूकदार नव्या कलेक्शनसाठी तिच्या मागे लागलेले असतात तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांचे पगार ते फॅक्टरीचा खर्च कशाचाच ताळमेळ जुळत नसतो. हे सगळे प्रश्न सोडवताना आपलं आयुष्य हे केवळ आपलं नसून त्यातला बरासचा भाग हा इच्छा असो किंवा नसो मिडीयामध्ये चर्चेचा विषय आहे, याची जाणीवही तिला असते. त्यामुळे तिला प्रत्येक पाऊल जपून आणि विचारपूर्वक टाकाव लागत असतं.
बरं, प्रश्न फक्त मसाबाच्या आयुष्यात नसतात. साठीच्या उंबरठ्यावर पोहचलेल्या नीनाने उमेदीच्या काळात उत्तमोत्तम भूमिका साकारल्यानंतरही नवीन कामासाठी वणवण फिरणं तिला चुकलेलं नसतं. त्यात मसाबाच्या घटस्फोटाच्या अफवांचं वादळ तिच्यापर्यंत येऊन पोहचलेलं असतं. एकीकडे स्वतःचं आयुष्य सांभाळत असताना मुलीचं आयुष्य विस्कटू नये म्हणून नीनाची धडपड सुरु असते. या दोघींच्या आयुष्यातील या टप्प्यातील काही घटनांचा कोलाज म्हणजे ‘मसाबा मसाबा’ सिरीज.
ही सिरीज प्रेक्षकांना मसाबाच्या आयुष्यात पूर्णपणे डोकावण्याची संधी देत नाही. तिलाही स्वतःच्या दरवाजे प्रेक्षकांसमोर खुले करायचे नाहीत. तो या सिरीजचा उद्देश नाही. एखाद्या नामवंत व्यक्तीने स्वतःला एखाद्या व्यक्तीरेखेच्या जागी ठेवून ते पात्र साकारण हा प्रयोग इंग्रजी सिनेमा, मालिकांमध्ये बऱ्याचदा केला जातो. एखाद्या सिनेमा किंवा मालिकेमध्ये पाहुणे कलाकार म्हणून स्वतःचं पात्र साकारणं याची उदाहरणे आपल्याकडेही पहायला मिळतात. ‘फ्रेंड्स’ मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या मॅट लिब्लांक या अभिनेत्याने स्वतःची छबी नायक म्हणून साकारत ‘एपिसोड्स’ नामक केलेली मालिका बरीच गाजली होती. ती या प्रकारच्या कथानकाचे उत्तम उदाहरण आहे. नटाने आपल्याच आयुष्यातील घटना, आपली वागण्याची पध्दत याकडे तिऱ्हाईकाच्या नजरेने पाहत त्यावर मार्मिक टिपणी करणं असं साधारणपणे या मालिकांचं स्वरूप असलं तरी मालिकांचा उद्देश निव्वळ करमणूक हाच असतो. ‘मसाबा मसाबा’ हा उद्देश उत्तमरित्या बजावते. सोबत दोन सशक्त स्त्री व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आजच्या स्त्रीचं एक सुंदर आणि तितकच जिवंत चित्रण रेखाटते.
नीना गुप्ता आणि क्रिकेटपटू विव्ह रिचर्ड यांचे प्रेमसंबंध, त्यांची मुलगी मसाबा हा नात्यातील गुंता त्यांनी खुलेपणाने स्वीकारला असला तरी, नव्वदीच्या दशकातील भारतीय अभिनेत्रीच्या छबीच्या दृष्टीने हे धाडसाचं पाऊल होतं. नीनाने ते धाडस स्वीकारलं. आपल्याला वडील नाहीत याबद्दलच सततचं हिणवण आणि आफ्रो-भारतीय चेहरापट्टी लाभल्याने शाळेपासून समाजाने वंशभेदाच पाठीवर लादलेलं ओझं तोलत, आपली ओळख बनवत असताना मसाबाने कुठेही नीना किंवा रिचर्डबद्दल मनात कटुता आणू दिली नाही. उलट समाजाचा विरोध पत्करूनसुद्धा आपल्या निर्णयांवर ठाम राहणारी आपली आई तिच्यासाठी नेहमीच प्रेरणास्थान राहिली. हे आई-मुलगी आणि त्यापलीकडे मैत्रिणीचं नातं या सिरीजमध्ये स्वच्छपणे उभं राहतं.
पण हे सगळं उभारताना सिर्रीज जरी मसाबाच्या नावाने असली, तरी कॅमेरासमोर नीनाचा वावर हेवा वाटावा इतका सहजतेने होत असतो. मुलीच्या आयुष्यातील उतारचढाव बघताना अस्वस्थ होणारी आई, मसाबाने घटस्फोटाचा निर्णय घेतल्यावर आपल्या भूतकाळाचा परिणाम मुलीवर होत नाही ना या विचाराने गोंधळलेली आई, आपल्याच वयाच्या इतर अभिनेत्र्यांना कामं मिळत असताना आपण अधिक सशक्त अभिनेत्री असूनही हातात काम नसताना खचलेली अभिनेत्री, कितीही श्रीमंत असली तरी भाजीवाल्याकडे दोन रुपयासाठीसुद्धा भांडणारी संसारी बाई आणि आपल्याला काम हवं आहे हे थेट सोशल मिडियावर टाकायलासुद्धा मागेपुढे न पाहणारी स्त्री अशा नाना छटा त्यांनी सुंदरपणे रेखाटल्या आहेत.
वृत्तपत्र आणि मासिकाच्या चकचकीत कागदावरील देखण्या फोटोंच्या पलीकडे हाडामासाची माणसंचं असतात, याची जाणीव प्रेक्षकांनाचं काय कित्येकदा सेलेब्रिटीजनासुद्धा होत नाही. जगाला आपल्या आयुष्यात सगळं आलबेल आहे, हे दाखवताना ताटातील वादळ शांत करण्याची धडपड त्यांनाही करावी लागते. मसाबा आणि नीनाच्या माध्यमातून ही सिरीज या मुखवट्यापलीकडील चेहऱ्यांची झलक प्रेक्षकांना करून देते.
ट्रेलर :