Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर

Maya Marathi Movie: नात्यांची निःशब्द कहाणी सांगणाऱ्या सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !
कधी कधी एखाद्या चित्रात हजार शब्दांची गाणी लपलेली असतात. ‘माया’ (Maya) या आगामी मराठी चित्रपटाचा मोशन पोस्टर पाहताच असंच काहीसं जाणवतं. या पोस्टरने नात्यांच्या गुंत्यातील सूक्ष्म भावना, अंतर, तणाव आणि स्वीकार यांची एक शांत पण प्रभावी कहाणी शब्दांशिवाय सांगितली आहे. (Maya Marathi Movie)

मोशन पोस्टरमध्ये वेगवेगळ्या वयोगटातील कुटुंब सदस्य एकत्र दिसतात. त्यांच्या चेहऱ्यांवरची हलकी शांतता, हातात हात घालून बसलेलेपण, आणि तरीही त्यांच्या मध्ये असलेलं अंतर हे सर्व काही चित्रमय पद्धतीने मांडले गेले आहे. या पोस्टरमध्ये खास लक्ष वेधून घेतलं आहे तो मुक्ताच्या हातातील तुटलेला कप. हा कप केवळ फक्त एक तुटलेली वस्तू नसून, नात्यांतील तुटलेपणा, न सांगता जाणारे दुःख आणि आयुष्यातील रिकामेपणाचे प्रतीक आहे. पण कप तुटलेला असूनही मुक्ताच्या चेहऱ्यावर असलेलं हलकं हास्य हे ताण, दुःख किंवा तुटलेपण नाकारत नाही; उलट त्याचा स्वीकार करतं, असं जाणवतं.

या पोस्टरमधून एक विचार मनात येतो: एखादं नातंही असंच काही काळानंतर तुटतं का? जिथे कडे हातात असल्या तरी ते पूर्ण होत नाही? आणि तरीही त्या तुटलेल्या नात्याच्या कडांमधूनही माया टिकून राहते का? या प्रश्नांची धुंद गुंफण या पोस्टरमध्ये अतिशय सूक्ष्म पद्धतीने मांडली आहे. दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी सांगितलं की, “‘माया’ म्हणजे फक्त प्रेम नाही, तर समजूतदारपणा, स्वीकार आणि वेळोवेळी नातं जपण्याची ताकद. आयुष्यात सगळं नेहमीच परफेक्ट नसतं. काही गोष्टी तुटतात, काही नाती बदलतात. मुक्ताच्या हातातील कप हे त्या बदलांचा प्रतीक आहे, आणि तिचं हास्य म्हणजे स्वीकार. या मोशन पोस्टरमधून आम्हाला चित्रपटाची भावना शब्दांशिवाय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती.” आदित्य इंगळे दिग्दर्शित या चित्रपटात मुक्ता बर्वे (Mukta Barve) , गिरीश ओक(Girish Oak) , सिद्धार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) , विजय केंकरे (VIjay Kenkare) आणि रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattngadi ) यांसारख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. (Maya Marathi Movie)
================================
================================
२७ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या ‘माया’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरनेच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. नात्यांच्या गुंत्यातून उमटणारी ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भिडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.