‘मेहमान’ पन्नास वर्षांचा झाला…
विश्वजीत म्हटल्यावर चित्रपट रसिकांच्या एका पिढीला पटकन ‘बेकरार करके हमे यू न जाईये’ ,जरा नजरों से कहदो तो (बीस साल बाद), ‘पुकारता चला हू मै’, मेरे हमदम मान भी जाओ, भला मानो बुरा मानो (मेरे सनम), मेरी मोहब्बत पाक मोहब्बत, आ गले लग जा (एप्रिल फूल), नजर ना लग जाऐ, अकेला हू मै (जाल), तुम्हारी नजर क्यू खफा हो गई (दो कलिया), लाखों है यहा दिलवाले, ऑखो मे कयामत के काजल (किस्मत), मुझको ठंग लग रही है मुझसे दूर तू न जा (मै सुंदर हू) अशी साठच्या दशकातील सहज गुणगुणावी अशी गाणी ओठांवर आली असतील. (Mehmaan)
विश्वजीत म्हटल्यावर काहींना वहिदा रेहमान (बीस साल बाद हा त्याचा पहिला चित्रपट), कोहरा), आशा पारेख ( मेरे सनम), सायरा बानू ( एप्रिल फूल), शर्मिला टागोर (यह रात फिर न आयेगी), माला सिन्हा (नाईट इन लंडन, जाल, दो कलिया), साधना (इश्क पर जोर नहीं), मुमताज (शरारत), बबिता (किस्मत), लीना चंदावरकर (मै सुंदर हू), रेखा (दो ऑखे, दो शिकारी, अंजाना सफर, कहते है मुझको राजा, मेहमान) अशा आघाडीचा अभिनेत्रींचा तो नायक झाला असा इतका तो भाग्यवान होता हे आठवले असेल. काय भारी प्रगती पुस्तक आहे ना? तर चवीचवीने गाॅसिप्समध्ये विशेष रस घेणाऱ्यांना ‘अंजाना सफर’च्या सेटवर कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक त्याने रेखाचे चुंबन घेऊन एकच खळबळ उडवून दिली हे आठवले असेल. पन्नास वर्षांपूर्वी भरल्या सेटवर असं काही करणे म्हणजे भारीच डेअरिंगचे काम होते. (Mehmaan)
तर या अशाच विश्वजीतच्या के. प्रत्यागात्मा दिग्दर्शित ‘मेहमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनास पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत. या चित्रपटात रेखा नायिका. गंमत म्हणजे, रेखा चित्रपटसृष्टीत आली तेव्हा विश्वजीतचा भर ओसरत होता (तो फार होता असाही नाही. पण अशा अनेक हिरोंच्या नशिबी टाॅपच्या नायिका व लोकप्रिय गाणी नेहमीच येतात आणि पिक्चर हिट ठरुनही ते तसेच कोरडे राहतात. चित्रपटाचे जग अशाच अनेक विसंगत गोष्टींनी भरलयं.) तरी रेखाने त्याच्यासोबत अनेक चित्रपट स्वीकारले.
हा ‘मेहमान’ मुंबईत मेन स्ट्रीममधील थिएटरमध्ये न झळकता पिला हाऊसमधील न्यू गुलशन थिएटरचा पहिला चित्रपट होता.
पिला हाऊस अर्थात रेड लाईट एरियातील थिएटरमध्ये दारासिंग, शेख मुख्तार, मा. भगवानदादा यांचे स्टंटपट प्रदर्शित होत आणि ते मसालेदार मनोरंजक चित्रपट म्हणून ओळखले जात. गंमत म्हणजे, रेखाने सुरुवातीला जे भरभर भरपूर चित्रपट साईन केले ते मग ती बिझी झालीच पण त्यात तिला मनमोहन देसाई दिग्दर्शित ‘रामपूर का लक्ष्मण’, कुंदनकुमार दिग्दर्शित ‘दुनिया का मेला’, ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘नमक हराम’ सारखे मोठ्या दिग्दर्शकांचेही चित्रपट मिळाले. त्यात ‘मेहमान’ रखडत रखडत राहिला. स्टार मोठा होत जाताना अशा ‘मागे पडलेल्या चित्रपटांकडे फार लक्षही देत नाहीत. द्यायचे तरी का? म्हणून तर ‘मेहमान’ कधी पडद्यावर येऊन त्याची रिळे गोडाऊनमध्ये जाऊन निपचित पडतात हेही समजत नाही. (Mehmaan)
याच गडबडीत विश्वजीतने ‘कहते है मुझको राजा’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनही केले. नायकही तोच हे वेगळे सांगायलाच नको आणि नायिका चक्क रेखा. पण पिक्चर फ्लाॅप. कारण विश्वजीत आता चलनी नाणे नव्हता. मग त्याने ‘राॅकी’ नावाच्या चित्रपटाची घोषणा केली. ट्रेड पेपर्समध्ये जाहिरात दिली. प्रमुख भूमिकेत अमिताभ बच्चन व रेखा. एका गोष्टीचे उत्तर कधीच मिळाले नाही, रेखाच्या गुड बाॅक्समध्ये विश्वजीत कसा आणि का? हा चित्रपट घोषणे पलिकडे गेलाच नाही. पण सुनील दत्तने काही वर्षांनी संजय दत्तसाठी ‘राॅकी’ हे नाव विश्वजीतकडून घेतले. (Mehmaan)
=====
हे देखील वाचा : हिटच्या ट्राॅफिज राहिल्या फक्त आठवणीत…
=====
नायक म्हणून सद्दी संपल्यावर विश्वजीतने आनंद और आनंद, जिगरवाला, साहेब, अल्लारखा वगैरे चित्रपटात चरित्र भूमिका साकारल्या आणि मग त्याने विश्वजीत नाईट या नावाचा वाद्यवृंद काढून देशभरात स्टेज शोज सुरु केली. तो त्याच्यावरच शूटिंग झालेली गाणी आपल्या आवाजात गायचा. काही वर्षांपूर्वीच एका फिल्मी पार्टीत विश्वजीतशी भेट झाली असता वयाच्या ऐंशीनंतरही तो एकदम फिट असल्याचे दिसले. बरं वाटलं, आपण कधी काळी टाॅपच्या अभिनेत्रींचा नायक होतो हे त्याला आजही सुखावत असेल तर त्यात आश्चर्य नाहीच. तो स्वतःच आपला ‘मेहमान’ नावाचा चित्रपट विसरलाही असेल, काही हरकत नाही.