अधुरी एक कहाणी: नात्यांची गुंतागुंत आणि थोडंसं रहस्य असणारी कौटुंबिक मालिका
ते वर्ष होतं २००४. एव्हाना झी मराठी वाहिनी सुरु होऊन तब्बल ५ वर्ष होऊन गेली होती. मराठीमध्ये अजूनही काही वाहिन्या दाखल होत होत्या. इ टीव्ही मराठी (आता कलर्स मराठी) मोठी स्पर्धक बनून समोर उभी ठाकली होती. त्याच वेळी हिंदी चॅनेल्सवरच्या मालिकांची लोकप्रियताही शिखरावर पोचली होती. या स्पर्धेत मराठी प्रेक्षकांमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी झी मराठीने हिंदी मालिकांच्या धर्तीवर तगडी स्टारकास्ट घेऊन एक नवी मालिका सुरु केली, ती म्हणजे ‘अधुरी एक कहाणी’ (Adhuri Ek Kahani).
‘अधुरी एक कहाणी’ या मालिकेला प्राईम टाइम देण्यात आला नव्हता. दररोज रात्री ९ वाजता प्रसारित होऊनही मालिका लोकप्रिय झाली होती. अमृता आणि अर्पिता या देवधर कुटुंबामधल्या कर्तबगार मुली. अमृता उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेलेली असते, तर अर्पिता रिपोर्टर असते. मालिकेची सुरुवात झाली तीच एका धक्क्याने. उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेलेली गुणी सुसंकृत अमृता भारतात परत येते तेव्हा ती गरोदर असते (ते ही लग्नाआधी). त्यामुळे ती घरी न जात तिच्या मावशीकडे जाते. अमृताचे आई वडील या गोष्टीपासून अनभिज्ञ असतात, पण अर्पिताला मात्र सारं काही समजतं. मग सुरु होते कसरत. ही कसरत अजून कठीण होते जेव्हा अमृतावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या करणला याबद्दल समजतं.
केदार पटवर्धन प्रसिद्ध गायक. त्यांची पत्नी अभिलाषा शहरातील नामांकित बिझनेसवूमन. त्यांचा मुलगा यश अर्पिताच्या प्रेमात पडतो. पण ती त्याला नकार देते. योगायोगाने यशच्या आईने त्याचं लग्न अमृताशी ठरवलेलं असतं. आणि यशच्या आईचा शब्द घरात अंतिम शब्द असतो.
अमृताची डिलिव्हरी झाल्यावर ती घरी परत येते. त्याच दिवशी यश व त्याचं कुटुंब अमृताला बघायला येतात. अर्पितावर प्रेम असूनही यश अमृताशी लग्न करायचा निर्णय घेतो कारण त्याला अर्पिताच्या आसपास राहायचं असतं. अमृता यशला आपला भूतकाळ सांगायचं खूप प्रयत्न करते. पण काही ना काही कारणांनी ती सांगू शकत नाही. अमृताच्या मुलाचा बाप कोण असतो, हे मालिकेत पुढे समजतंच. पण तोपर्यंत यश आणि अमृताचं लग्न झालेलं असतं. (Memories of Marathi serial Adhuri Ek Kahani)
यशने अर्पितावर प्रेम असताना अमृताशी लग्न केलेलं असतं आणि याचा सगळ्यात जास्त त्रास अर्पिताला होत असतो. अमृताची सासू पाताळयंत्री बाई असते. ‘लेडी व्हिलन’ हा हिंदी मालिकांमधील प्रकार या मालिकेमध्ये विशेष ‘हायलाईट’ झाला होता.
मालिकेमध्ये अनेक ‘ट्विस्ट अँड टर्न्स’ आले शिवाय काही उपकथानकंही होती. मालिकेचं कथानक कौटुंबिक स्वरूपाचं होतं पण त्याला छोटीशी रहस्याची झालरदेखील होती. नात्यांच्या गुंतागुंतीने कथानकामध्ये आवश्यक असणारा ‘फ्लो मेंटेन’ ठेवला आणि मालिका रंगतदार झाली.
मालिकेमध्ये किशोरी गोडबोले (अमृता) प्रिया बापट (अर्पिता), स्वप्नील जोशी (यश), नीना कुलकर्णी, संदीप मेहता, स्मिता जयकर, शुभांगी लाटकर, राहुल मेहंदळे, श्वेता मेहंदळे, पल्लवी सुभाष, राधिका हर्षे, शीतल क्षीरसागर, इ. मराठी व हिंदी मालिका विश्वातील नामांकित कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत होते. नीना कुलकर्णी यांनी यशच्या आईची साकारलेली भूमिका खलनायिका ढंगाची होती पण तिची व्यक्तिरेखा इतकी भयंकर स्वरूपाची होती की, मालिकेच्या लेखिका रोहिणी निनावे यांना लिहितानाही प्रचंड त्रास झाला. अखेर त्यांनी ही मालिका सोडली. (Memories of Marathi serial Adhuri Ek Kahani)
मालिकेमधील सर्वच कलाकारांच्या भूमिका सरस होत्या. अर्थात असणारच कारण मालिकाविश्वातील नामांकीत चेहरे यामध्ये होते. नीना कुलकर्णी यांनी तर खलनायिकेची भूमिका अप्रतिमरीत्या वठवली होती. मालिकेची मुख्य नायिका होती अमृता. पण प्रेक्षकांना विशेष भावली होती ती डॅशिंग अर्पिता.
===============
हे ही वाचा: तो चित्रपट स्वीकारला असता, तर अक्षयसमोर मोकळेपणाने वावरूच शकले नसते….
कल्पनेपलीकडल्या जगाचा आरसा दाखवणाऱ्या टॉप 5 Sci-Fi वेबसिरिज
==============
अर्पिताची भूमिका आधी प्रिया बापटने साकारली होती. परंतु नंतर मालिकेमध्ये अर्पिताचा अपघात होतो आणि तिची प्लास्टिक सर्जरी करावी लागते. या प्रसंगांनंतर अर्पिता म्हणून प्रिया बापटच्या जागी स्नेहा वाघ प्रेक्षकांसमोर आली. अचानक संदीप मेहतांच्या जागी गिरीश ओक आले. मालिकेमध्ये असे प्रकार होतच असतात. कधी कथानकाची गरज म्हणून, तर कधी काही अडचणींमुळे कलाकार बदलले जातात. खासकरून दीर्घकाळ चालणाऱ्या मालिका असतील, तर कलाकार बदलणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे.
मालिकेचं शीर्षक ‘अधुरी एक कहाणी’ म्हणजे एका सुप्रसिद्ध गाण्यामधली एक ओळ आहे. मालिकांना सुप्रसिद्ध गाण्याची ओळ शीर्षक म्हणून वापरण्याची पद्धत बहुदा याच मालिकेपासून सुरु झाली असावी. ही मालिका बघायची असल्यास झी 5 या ओटीटीवर किंवा युट्यूबवरही उपलब्ध आहे.