थिएटरमध्ये चित्रपट चालू असताना जेव्हा अचानक फिल्म तुटते तेव्हा …
सिनेमा अतिशय रंगात आला आहे. “जाओ पहले उस आदमी का साईन ले के आओ जिसने मेरे बाप को चोर कहा था… पहले उस आदमी का साईन ले के आओ जिसने मेरी माँ को गाली दे के नौकरी से निकाल दिया था… “ आणि तेवढ्यात फिल्म तुटते. पब्लिक बैचेन होतं. (Memories of Single Screen Theatres)
असा लाईव्ह अनुभव माझ्यासारख्या मागच्या पिढीतील चित्रपट रसिकांनी नक्कीच कधी ना कधी घेतला असेल. येथे गुलशन राॅय निर्मित आणि यश चोप्रा दिग्दर्शित ‘दीवार’ (१९७५) चित्रपटाचे केवळ एक उदाहरण दिले आहे. असे अनेक चित्रपटांबाबत घडे. पण का?
चित्रपटाच्या पडद्यावर पोहचण्याच्या प्रवासात डिजिटल युग येण्यापूर्वी अगदी दीर्घकाळ प्रिन्टचे युग होते. पब्लिकच्या भाषेत त्याला रिळे म्हणत. त्यात एक दोन प्रकार असत. एखाद्या थिएटरबाहेर एखाद्या चित्रपटाची अशी रिळे दिसली तरी अनेक चित्रपट शौकिनाना आनंद होई; असे आणि इतके आपल्या पब्लिकने चित्रपटावर भरभरुन प्रेम केले. (Memories of Single Screen Theatres)
एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सबाहेर शुक्रवारी सकाळच्या वेळेत तेथून उतरलेल्या अथवा प्रदर्शित होत असलेल्या चित्रपटाची रिळे नजरेत पडली तरी अनेकांना भारी वाटे. इतके कसले चित्रपटांवर प्रेम, असे कोणी म्हणू शकते. फिल्म दीवाने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. अनेकदा एकूण चार डबे असत.
पूर्वी शहरात आणि ग्रामीण भागात ‘गल्ली’ चित्रपटात अशी रिळे हमखास दिसत आणि तेथे एकच प्रोजेक्शन असल्याने एका अधिकृत मध्यंतरसह आणखीन दोन मध्यंतर असत. एक वेगळीच मजा. ग्रामीण भागातील अनेक ओपन एअर थिएटर (फार पूर्वी अलिबाग तालुक्यातील चौल येथील मामाच्या गावाला जाताना पोयनाड गावात दिसले की, केवढा आनंद होई. चारही बाजूने झावळ्या अथवा झाप लावलेल्या असत.) टूरिंग टाॅकीज, तंबू थिएटर्समध्येही हीच तीन मध्यंतरानंची भन्नाट संस्कृती होती आणि तरी पब्लिक पिक्चरमध्ये गुंतलेला असे. ते दिवसच वेगळे होते.
आजची डिजिटल पिढी विचारेल की, फिल्म कधी आणि कशी तुटायची? म्हणजे नेमके काय घडायचे? अगदी कोणताही चित्रपट जस जसा जुना होत जाई, तस तशी त्याची प्रिन्ट खराब होत जाई, त्याला चरे पडत. इतके चरे पडत की, जणू काही पडद्यावरील दृश्यात सारखा पाऊस पडतोय असे वाटे. आणि अखेर ती प्रिन्ट जीर्ण झाल्यावर अचानक तुटायची. आजच्या डिजिटल पिढीला कदाचित आश्चर्य वाटेल पण अचानक फिल्म तुटणार या गोष्टीची जणू सवय झाली होती आणि आता पाच दहा मिनिटात पिक्चर पुन्हा सुरु होईल असा विश्वासही असे. असा ‘व्यत्यय’ पब्लिकची पडद्याशी असलेली कनेक्टीव्हीटी तोडत नसे. कारण त्याला फिल्म जोडली जाऊन पुन्हा पिक्चर सुरु होणार हे माहित असे आणि तेवढी माहिती पुरेशी वाटे. (Memories of Single Screen Theatres)
पूर्वी मराठी असो अथवा हिंदी चित्रपट असो. ते टप्प्याटप्प्याने प्रदर्शित होत जाताना त्यासह या प्रिन्टचाही प्रवास कुठून कुठेही होत असे. उदा. त्या काळात अनेक हिंदी चित्रपटांच्या जाहिरातीत वर म्हटले जाई, उत्तर भारतातील यशानंतर आता मुंबईत प्रदर्शित होत आहे. ताहीर हुसैन निर्मित आणि राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जखमी'( १९७५) चित्रपटाच्या जाहिरातीत असे म्हटल्याचे आठवतेय. तात्पर्य, आता तिकडच्याच अनेक प्रिन्ट इकडे येणार, दाखवणार आणि मग इकडून आणखीन कुठे कुठे जात राहणार. अर्थात, चित्रपट सुपरहिट असेल, तर त्याची मेन थिएटरवरील प्रिन्ट पंचवीस अथवा पन्नास आठवडे सहज मुक्काम करे.
‘जख्मी’ चित्रपटाने मुंबईत सुपर थिएटरमध्ये ज्युबिली हिट यश संपादले. दादा कोंडके, सुषमा शिरोमणी, किरण शांताराम, महेश कोठारे, सतीश कुलकर्णी असे काही बडे निर्माते वगळता अन्य निर्माते मराठी चित्रपटाच्या अगदीच मोजक्याच प्रिन्ट काढत. एकेका प्रिन्टसह खर्च वाढत जाई. (Memories of Single Screen Theatres)
‘सुशिला’ सारखा एखादा मराठी चित्रपट अगोदर पुणे शहरात प्रदर्शित होई आणि मग मुंबईत रिलीज केला जात असे. अर्थात तसे चित्रपटाच्या जाहिरातीत म्हटले जाई. आणि मग असे चित्रपट खेड्यापाड्यातील प्रेक्षकांपर्यंत पोहचत. या एकूणच प्रवासाला सहजपणे दीड दोन वर्षे जात असत. तो तेव्हाच्या एकूणच प्रक्रियेचा एक भाग होता. हे सगळे होत असतानाच प्रिन्ट अधिकाधिक जुनी व्हायची आणि त्याचे परिणाम पडद्यावर दिसत. तीच प्रिन्ट मग ‘रिपिट रन’ आणि ‘मॅटीनी शोला’ प्रदर्शित होत राही.
दरम्यान, काही चित्रपटांच्या काही प्रमाणात नवीन प्रिन्ट काढल्या जात आणि ‘नवीन प्रिन्टमध्ये’ असे म्हणत रिपिट रनला चित्रपट प्रदर्शित होत. मी त्या काळात रिपिट रनला जुने चित्रपट पाहताना कायमच ‘नवीन प्रिन्टसह’ असे म्हटले असेल, तर पटकन तिकीट काढायचो. पिक्चर जुना पण प्रिन्ट नवीन हे अधूनमधून घडणारे. (Memories of Single Screen Theatres)
‘गल्ली’ चित्रपटात सोळा एमएमची प्रिन्ट असे आणि ती अनेक वर्ष वापरात असे. मग ती एखाद्या गल्लीत मध्येच तुटे. काही ठिकाणी प्रोजेक्शनच्या समस्येमुळे प्रिन्ट तुटे. अशाही परिस्थितीत आपल्या देशात खोलवर चित्रपट रुजलाय याचे कौतुक करताना प्रेक्षकांनाही दाद द्यायलाच हवी. त्यानी असे अनेक अडथळ्यांवर स्वीकारत चित्रपटावर बेहद्द प्रेम केले.
याच संस्कृतीत आणखीन एक विशेष गोष्ट आहे. पूर्वी काही चित्रपट प्रदर्शित करताना एकाच प्रिन्टवर दोन थिएटरमध्ये रिलीज केला जाई. अर्थात त्या दोन थिएटरमधील अंतर कमी असे. उदाहरणार्थ, दादरमधील पूर्व भागात ब्राॅडवे, शारदा, चित्रा यातील एखाद्या (तीनही थिएटर्स बंद झालीत.) आणि पश्चिमच बाजूला असलेल्या कोहिनूर (आताचे नक्षत्र) अथवा प्लाझा थिएटरमध्ये अशा पध्दतीने एखादा चित्रपट प्रदर्शित होताना दोन्हीकडच्या शोच्या वेळात अर्ध्या तासाचे अंतर ठेवले जाई आणि एकाकडची एकेक प्रिन्ट इकडून तिकडे नेली आणि आणली जाई. (याला शटलिंग म्हटले जाई. सिनेमाच्या जगातील अशा अनेक गोष्टी आणि त्याचे शब्दप्रयोग हा रंजक विषय आहे.) पण यात समजा थोडा उशीर झालाच तर…. तर पडद्यावरचा चित्रपट थांबे आणि अचानक असे घडल्याने प्रेक्षक अचंबित होत. आणि आता काही काही काळ पडद्यावर काहीच नसे. त्याला चित्रपटसृष्टीच्या भाषेत ‘लाईट पडणे’ म्हणत. मग थोड्याच वेळात चित्रपट पुन्हा सुरु होताच टाळ्या आणि शिट्ट्या हमखास.
कधी फिल्म अचानक तुटल्याने ब्रेक तर कधी मधले रिळ उशीरा पोहोचल्याने ब्रेक. असे काहीही घडले तरी पब्लिकची पडद्यावरची नजर कायम असे, हे महत्त्वाचे. पब्लिक संस्कृतीतील हाही एक फंडा. एकूणच ‘शो’मधील एक रंग. जो खरे तर बेरंग करतो तरी तो सहज स्वीकारला जाई. ‘चित्रपट असे बघावेत, तसे बघावेत’ असे लेक्चर देणे अगदीच सोपे आहे. त्यावेळच्या पब्लिकने असे ‘पिक्चरचे मध्येच तुटणे ‘ स्वीकारत आपल्या देशात चित्रपट रुजवला, वाढवला, सांभाळला.
======
हे देखील वाचा – गंगा जमुना टॉकीज: इथे मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मोठी बातमी झाली होती कारण …
======
डिजिटल युगात ‘सिनेमाचे रिळ’ इतिहासजमा होत चाललंय. जेथे अजूनही ‘रिळात चित्रपट’ असेल तेथे या अनोख्या संस्कृतीचा रंग थोडासा का होईना कायम असेल. (Memories of Single Screen Theatres)
चित्रपट आणि चित्रपटसृष्टी हा अशा अनेक ज्ञात अज्ञात गोष्टीने भरलेला ‘इस्टमनकलर’ विषय आहे, त्याचा एक रंग असाही, जो मीही कधी काळी अनुभवलाय. ‘टाॅकीजची गोष्ट ‘ अशाच अनेक गोष्टींनी झक्कास भरलेली…..