दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
लावारीसमधील ‘मेरे अंगने में…’ गाण्यावरून झाला होता वाद – ही आहेत त्याची कारणे
अमिताभ बच्चन यांच्यासाठी १९८१ हे वर्ष खूप महत्त्वाचे होते. यावर्षी त्यांचे याराना, बरसात की एक रात, नसीब, लावारिस, सिलसिला आणि कालिया असे विभिन्न जॉनरचे सिनेमे प्रदर्शित झाले होते. प्रकाश मेहरा आणि अमिताभ बच्चन हे असोसिएशन खूप जुनं होतं. त्यांच्या ‘जंजीर’ (१९७३) या चित्रपटाचा पासूनच अमिताभची खऱ्या अर्थाने ‘अँग्री यंग मॅन’ अशी ओळख झाली होती. या चित्रपटानंतर त्यांनी खून पसीना, हेराफेरी, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटात भूमिका केल्या होत्या.
‘लावारीस’ चित्रपटानंतर ‘नमक हलाल’, शराबी, जादूगार हे त्या दोघांचे सिनेमे आले. १९८१ साली प्रदर्शित झालेल्या ‘लावारीस’ या चित्रपटात अमिताभची नायिका जीनत अमान होती, तर अमिताभच्या आईची भूमिका राखीने केली होती. अमजद खान यांनी रंगवलेला अमिताभच्या पित्याची भूमिका जबरदस्त होती.
या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक गीत गायले होते. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है…’ या चित्रपटाला आणि या गाण्याला त्याकाळी प्रचंड लोकप्रियता लाभली होती. इतकी की यावर्षीच्या ‘बिनाका गीतमाला’ या कार्यक्रमात या गाण्याला त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट गाण्याचा सन्मान प्राप्त झाला होता. चित्रपटात हे गाणे दोन वेळा येते. एकदा अलका याज्ञिकच्या स्वरात, तर एकदा अमिताभ बच्चन यांच्या स्वरात!
या गाण्याला आणि अमिताभ बच्चनच्या नृत्याला अभूतपूर्व अशी लोकप्रियता लाभली. हे गाणे चित्रपटात अगदी शेवटच्या रिळात येत असल्यामुळे लोक आवर्जून या गाण्याची वाट पहात आणि पडद्यावर गाणे सुरु झाले की, अक्षरशः थिएटरमध्ये नाचू लागत. या गाण्यामुळे या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले, असे म्हटले तर वावगे होणार नाही.
हे जरी सगळं खरं असलं तरी त्याच काळात या गाण्यावर प्रचंड टीका देखील झाली. विशेषत: अमिताभ बच्चनने स्त्री वेशात केलेले नृत्य काहीजणांना अजिबात आवडले नाही. या गाण्यातून अश्लीलतेचा आणि या नृत्यातून बिभत्सेचा कळस गाठला आहे; इथपर्यंत टीका या गाण्यावर होत गेली.
त्या काळात लोकप्रिय असलेल्या ‘माधुरी’ या चित्रपट विषयक मासिकात यावर उलटसुलट मते प्रकाशित होऊ लागली. ‘मेरे अंगने मे…जैसा नाच गाना क्यू’ या टायटल खाली (आजच्या भाषेत Hashtag) शेवटी ‘माधुरी’ या मासिकाने अमिताभ बच्चन आणि प्रकाश मेहरा यांच्या प्रदीर्घ मुलाखती छापून त्यांची या गाण्यामागची काय भूमिका होती, ती वाचकांसमोर मांडली.
प्रकाश मेहरा यांनी मुलाखतीमध्ये, “या गाण्यामुळे सवंग लोकप्रियता मध्ये वाढ होते’ हा वाचकांचा आक्षेप खोडून काढला. त्यांनी सांगितले की, अमिताभ बच्चन हे गाणे स्टेजवर अनेकवेळा म्हणत असे आणि प्रत्येक वेळी प्रेक्षकांची त्याला मोठी दाद मिळत असे.
‘मुकद्दर का सिकंदर’ या चित्रपटाच्या सुवर्ण महोत्सवी यशाचा मोठा कार्यक्रम मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर ठेवला होता. त्यावेळेला अमिताभ बच्चन यांनी हे गाणे स्टेजवर सादर केले होते. त्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिल्यामुळे त्यांनी त्यांच्या पुढच्या चित्रपटात हे गाणे घेतले असल्याचे सांगितले.
अमिताभ बच्चन यांनी या गाण्याबद्दल स्पष्टीकरण देताना, हे गाणे उत्तर प्रदेश मधील पारंपारिक लोकगीत असून होळीच्या प्रसंगी ते मोठ्या प्रमाणावर गायले जाते, असे सांगितले. चित्रपटात ज्या पद्धतीने हे गाणं चित्रित झालं आहे त्यावरील आक्षेपाला उत्तर देताना त्यांनी “चित्रपटाच्या धंद्याची काही गणितं सांगितली आणि बऱ्याचदा सामान्य प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवून आणि त्यांच्या आवडीला लक्षात घेऊन काही गोष्टी चित्रपटात दाखवाव्या लागतात “ असा खुलासा केला.
हे गाणे खरं तर सिनेमात आधी इमोशनल टूल म्हणून वापरले जाणार होते. कारण सिनेमात अमिताभ लहान असताना त्याच्या आईने (राखीने) हे गाणे त्याच्या साठी गायलेले असते. त्या मुळे हे गाणे म्हणजे त्याच्या जवळ असलेली आईची एकमेव आठवण असते. एक भावनिक आठवण असते. पण नंतर प्रकाश मेहरा आणि त्यांच्या मित्रांनी यातील भावनिक बाजू बाजूला ठेवून त्याची लोकप्रियता कॅच करायचे ठरवले.
या चित्रपटाच्या वेळी आणखी एक वाद निर्माण झाला होता कारण ‘लावारिस’ चित्रपटाच्या रेकॉर्डवर या गीताचे गीतकार म्हणून डॉ. हरिवंशराय बच्चन यांचे नाव टाकले होते. खरंतर हे उत्तर प्रदेशमधील पारंपारिक लोकगीत होतं. मूलतः आहे लोकगीत अवधी भाषेत होतं. डॉ. हरिवंशराय बच्चन यांनी त्या या गाण्याला सोप्या हिंदी भाषेत रूपांतरित केले होते. पण तरीही ते गाणं त्यांनी लिहिलेलं नव्हतंच!
या वादामुळे एचएमव्हीने (HMV) जेव्हा त्यांच्या एल पी रेकॉर्डचा पुढचा लॉट मार्केटमध्ये आणला; त्यावेळी या गाण्याच्या गीतकाराच्याच्या जागी डॉ हरिवंशराय बच्चन यांचे नाव काढून तिथे पारंपारिक असे लिहिले. काहीही असो, पण या गाण्याने आणि अमिताभ बच्चन यांच्या नृत्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती ही बाब सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ आहे. पण हे गाणे पहिल्यांदाच चित्रपटात आले होते का? तर नाही!
=====
हे नक्की वाचा: राम गोपाल वर्मा: आशिक-ऐ-फिल्ममेकिंग
=====
‘लावारिस’ प्रदर्शित होण्याच्या आधी १९७५ साठी आलेल्या ‘मजे लेलो’ या चित्रपटात देखील ‘मेरे अंगने मे किसी का क्या काम है….’ हे गाणे एका स्टेजवरील कार्यक्रमात दाखवले गेले होते. या चित्रपटात हे गाणे महेश कुमार यांनी गायले होते. या चित्रपटाला महेश- नरेश संगीत दिले होते. त्यापूर्वी आणि एका सिनेमात हे गाणे वापरले होते.
१९७१ साली ‘बॉम्बे टॉकीज’ नावाचा एक चित्रपट आला होता. हा चित्रपट तसा आंतरराष्ट्रीय म्हणावा लागेल. कारण या चित्रपटाची निर्मिती मर्चंटस आईवरी प्रॉडक्शन यांच्या वतीने झाली होती. या चित्रपटात शशी कपूरची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाचा प्लॉट हा पूर्णतः मुंबईचा होता. या चित्रपटात देखील जलाल आगा आणि अन्वर अली (मेहमूदचा भाऊ) यांनी ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है…’ हे गाणे गाताना दाखवले होते.
====
हे देखील वाचा: असं काय घडलं की, अमिताभ बच्चन यांच्या ‘शहेनशहा’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलावी लागली
====
याचाच अर्थ ‘लावारिस’ मध्ये हे गाणे येण्यापूर्वी १९७५ साली ‘मजे लेलो’ आणि १९७१ साली ‘बॉम्बे टॉकीज’ या चित्रपटात अल्प स्वरूपात हे गाणे रुपेरी पडद्यावर येऊन गेले होते.