
R.D.Burman : ‘मेरी भीगी भीगी सी पलको पे रह गई…’ गाण्याच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा
सिनेमातील गाणं कुणी गावं याचा निर्णय हा सामूहिक असतो. चित्रपटाचा नायक, दिग्दर्शक, संगीतकार, गीतकार सर्वजण मिळून हा निर्णय घेत असतात. पण अंतिम निर्णय हा संगीतकाराचा असतो. कारण त्याची रचना तो गायक गाणार असतो. संगीतकार राहुल देव बर्मन यांनी एका चित्रपटाचे गाणे ध्वनिमुद्रित करताना हे गाणे स्वतःच गाण्याचा निर्णय घेतला. पण इतर सर्वांना ते गाणे किशोर कुमार यांच्या स्वरात हवे होते. नायक संजीव कुमार याने तर हात जोडून पंचमला विनंती केली की,” हे गाणे किशोर कुमारच्या स्वरात रेकॉर्ड करा.” सर्वांच्या विनंतीला मान देऊन हे गाणं किशोर कुमारच्या स्वरात रेकॉर्ड झालं आणि किशोर कुमारच्या सर्वोत्कृष्ट टॉप टेन सॅड रोमँटिक सॉंग मध्ये या गाण्याला स्थान मिळालं. कोणतं होतं ते गाणं? आणि किशोर कुमारला पंचम ते गाणे का गाऊ देत नव्हते? मोठा इंटरेस्टिंग किस्सा आहे.

निर्माता ताहीर हुसेन (आजचा सुपरस्टार आमिर खान चे वडील) यांनी १९७१ साली एक चित्रपट बनवला होता ‘कांरवा’. या सिनेमाचे दिग्दर्शन नासिर हुसेन यांनी केले होते. या सुपरहिट चित्रपटानंतर त्यांनी आपला दुसऱ्या चित्रपटाची निर्मिती सुरू केली हा चित्रपट होता ‘अनामिका’. कांरवा हा चित्रपट एक क्राईम थ्रीलर म्युझिकल होता तर ‘अनामिका’ हा चित्रपट रोमांटिक थ्रीलर होता. ‘अनामिका’ या चित्रपटाची कथा त्या काळातील लोकप्रिय पॉकेट बुक ऑथर सुरेंद्र प्रकाश यांनी लिहिली होती. चित्रपट हीरोइन ओरिएंटेड होता. जया भादुरी आणि संजीव कुमार यांना लीड पेअर म्हणून साइन केले गेले. चित्रपटातील गाणी मजरूह सुलतानपुरी आणि संगीत आर डी बर्मन यांच्याकडे सोपवले.
चित्रपट नायिका प्रदान असल्यामुळे यातील पाच गाण्यांपैकी चार गाणी ही स्त्री स्वरातील होती तर एकच गाणं हे पुरुष स्वरातील होतं. हे गाणं होतं ‘मेरी भीगी भीगी सी पलको पे रहे गये जैसे मेरे सपने बिखर के…’ आर डी बर्मन यांनी पाचही गाण्याच्या सुंदर ट्युन्स मजरूह यांच्याकडे दिल्या. नायकावर चित्रित असलेले गाणं मजरूह सुलतानपुरी यांनी जबरदस्त लिहिलं होतं. या गाण्याच्या ओळी वाचून आर डी बर्मन खूपच प्रभावीत झाले. १९६९ साली त्यांनी एका नॉन फिल्मी बंगाली गाण्याला संगीत दिला होतं. हे गाणं लिहिलं होतं सचिन भौमिक यांनी. गाण्याचे बोल होते याच गाण्याची चाल त्यांनी अनामिकाच्या गाण्यासाठी वापरायचे ठरवणे मूळ बंगाली गाणं आर डी बर्मन यांनी स्वतः गायलं होतं. बंगालीमध्ये गायलेलं त्यांचं हे पहिलं गाणं होतं. गाण्याचे बोल होते ‘मोने पोरे रुबी रॉय ‘ या गाण्याला आर डी बर्मन यांच्या जीवनाशी एक इमोशनल कनेक्ट देखील होता.

पंचम जेव्हा कॉलेजला जात होते तेव्हा एक मुलगी त्यांना आवडली होती. ही मुलगी रोज एका बस स्टॉप वरून ठराविक वेळेला जायची. पंचम रोज तिला पाहत असायचे मनोमन ते तिच्यावर प्रेम करत होते. पण तिला विचारण्याचे धैर्य होत नव्हतं. ही अधुरी एक प्रेम कहानी इथेच संपली. त्या मुलीचे नाव छबी रॉय असे होते. पुढे बर्याच वर्षानी पंचमने आपली ही एकतर्फी प्रेम कहानी सचिन भौमिक ऐकवली. सचिन भौमिक यांनी ताबडतोब त्यावर एक गाणं लिहिलं. यात फक्त छबी रॉय च्या ऐवजी रुबी रॉय असा शब्द घेतला. पंचम ने ने बंगाली गाणे गायले. हे गाणं बंगाली मध्ये १९६९ साली रिलीज झाले. आणि त्या काळात प्रचंड गाजले.
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
हीच ट्यून ‘अनामिका‘ च्या गाण्यासाठी वापरायचे पंचमने ठरवले. बंगाली प्रमाणे हिंदीत देखील हे गाणे स्वतः गायचे असा त्याचा विचार होता. परंतु त्याचा हा निर्णय कुणालाच फारसा आवडला नाही. कारण या गाण्यांमध्ये प्रेमभंगाचा जो दर्द होता तो किशोर कुमारच्या स्वरात जास्त प्रभावीपणे रसिकांपर्यंत पोहोचू शकेल असं सगळ्यांचं मत होतं. सगळ्यांच्या मताचा आदर करत पंचमने हे गाणं किशोर कुमार यांच्याकडून गाऊन घेतलं. आणि हे गाणं किशोर कुमारच्या ऑल टाइम फेवरेट गाण्यापैकी एक झालं. आज हे गाणं येऊन पन्नास वर्षाचा कालावधी उलटला असला तरी किशोरच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमध्ये याचा समावेश होतो. किशोर कुमारच्या बंगाली व्हर्जन ची लिंक मी खाली देत आहे ती देखील ऐकायला खूप सुंदर आहे.
https://www.youtube.com/watch?si=xrWxNEbr7uvOov4G&v=KNVCJt4FkhU&feature=youtu.be – बंगाली व्हर्जन