‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
फिरसे…मिर्झापूर
वेब सिरीज माध्यमात असलेल्या अमर्याद स्वातंत्र्याचा बेछूट वापर या सिरीजमध्ये करण्यात आला होता. यातील वैशिष्ठ्यपूर्ण बिनधास्त पात्रं आणि भन्नाट संवादांमुळे ही सिरीज कमालीची लोकप्रिय झाली.दुसऱ्या सिझनला सुडकथेची पार्श्वभूमी असली तरी मुख्य कथानक मात्र मिर्झापूर या सत्ताकेंद्राच्याच अवतीभवती फिरते.
आपला भाऊ आणि बायको गमावलेल्या गुड्डूच्या आयुष्याचा आता एकच उद्देश आहे तो म्हणजे कालीन भैय्या व मुन्नाचा सूड घेणे आणि मिर्झापूरची सत्ता हस्तगत करणे. या कामात गोलू देखील त्याची मदत करते. केवळ एक सूडकथा असूनही या सिझनला विस्तारित आणि व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न निर्मात्यांनी केला आहे आणि म्हणून या सिझनमध्ये राजकारण या विषयाचा समावेश आवर्जून होतो व तो केंद्रस्थानी राहतो.खूप जास्त लांबीचे दहा एपिसोड असूनही ही सिरीज चांगली गुंतवून ठेवते शिवाय अनेक प्रसंग उत्तमरितीने खुलवल्यामुळे अपेक्षित मनोरंजनही होते.
पहिला सिझन संपल्यावर दुसरा सिझन हा प्रामुख्याने गुड्डू आणि गोलू यांच्यावरच अधिक अवलंबून असेल असं वाटलं होतं पण याही सिझनमध्ये भाव खाऊन जातात ते कालीन भैय्या आणि मुन्ना.या वडील-मुलगा नात्याचे अनेक पैलू मनोरंजक रितीने यात सादर झालेत. पंकज त्रिपाठी आणि देवेंदु शर्मा यांनी आपापल्या भूमिका सफाईदारपणे निभावल्यात, तर अली फजल आणि श्वेता त्रिपाठी देखील आपली छाप सोडतात.नव्याने भर पडलेल्या पात्रांमध्ये विजय वर्मा, प्रियांशु, ईशा तलवार आणि लिलिपुट आवर्जून लक्षात राहतात तर रसिका दुग्गल, कुलभूषण खरबंदा, राजेश तेलंग आणि अमित सीयाल पहिल्या सिझनप्रमाणेच आपल्या भूमिका उत्तमरित्या वठवतात.
मुख्य कथानकाला जोडून असलेली अनेक उपकथानकं, त्यातली अनेक पात्र, त्यांच्या प्रेमकथा हा प्रकार याही सिरीजमध्ये आढळतो आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी एकत्र पचवणं जड जातं. गोंधळात टाकणारा पहिला प्रसंग आणि बराच लांबलेला शेवट यामुळे कंटाळा येतो खरा पण कथेत वेळोवेळी येणारी वेगवेगळी वळणं उत्सुकता मात्र टिकवून ठेवतात. रक्तपात, प्रचंड शिवीगाळ, अमर्याद हिंसा आणि प्रणयदृष्य या गोष्टींची पहिल्या सिझनमध्ये ज्या पध्दतीने मुक्त उधळण होती तितकी या सिझनमध्ये नसली तरी ती टाळलेली देखील नाहीत. एका ठराविक उद्देशाने त्याचा वापर याही सिझनमध्ये होतो.अशा सिरीजचा तो पँटर्नच असतो या भूमिकेतून त्याकडे बघावं लागतं.
पहिल्या सिझनमधल्या पात्रांच्या प्रेमात पडला असाल आणि गुन्हेगारीपटातला उग्रपणा पचवायची ताकद असेल तर (तिसऱ्या सिझनची शक्यता निर्माण करणारा) हा सिझन अपेक्षित मनोरंजन करतो.