ऋतुजा बागवेला मिळाला मानाचा उस्ताद बिस्मिल्लाह खाँ युवा पुरस्कार
मिथुनमुळे संगीतकार अनु मलिक पार्श्वगायक बनले?
ऐंशी आणि नव्वदच्या दशकात गरिबांचा अमिताभ म्हणून मिथुन चक्रवर्तीचा मोठा बोलबाला होता. ऐंशीच्या दशकाच्या आरंभी ‘डिस्को डान्सर’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याची लोकप्रियता आणि मागणी प्रचंड वाढली. त्याचा काम करण्याचा आवाका प्रचंड मोठा होता. साधारणपणे महिन्याला त्याचा एक चित्रपट प्रदर्शित व्हायचा. त्यामुळे तो सतत घाईत असे. या सर्व घाई गर्दीमुळे त्याच्या सहकलाकारांना आणि इतर क्रू मेम्बर्सलादेखील कायम रेडी राहावे लागत असे. पण या गडबडीत कधीकधी मनोरंजक गोष्टी घडून जायच्या. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) याच्या या झपाटलेल्या काळामध्ये संगीतकार अनु मलिक हे गायक बनले होते. आणि ते गायक बनण्यासाठी मिथुन चक्रवर्ती कारणीभूत ठरला होते ! कसे? सांगतो.
नव्वदच्या दशकात आणि त्यानंतर अनु मलिक यांनी भरपूर गाणी गायली पण त्यांनी गायलेलं पहिलं गाणं मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यासाठी होतं आणि त्याचा किस्सा देखील तितकाच मनोरंजक आहे. १९८८ साली एक चित्रपट आला होता ‘जीते हे शान से’ यात मिथुन चक्रवर्ती, संजय दत्त, विजेता पंडीत, मंदाकिनी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात मिथुनची नायिका मंदाकिनी होती. चित्रपटाची गाणी इंदीवर आणि शैली शैलेंद्र यांनी लिहिली होती तर चित्रपटाला संगीत अनु मलिक यांचे होते. सिनेमाचे दिग्दर्शन कवल शर्मा यांनी केले होते.
१९८८ साली मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचे तब्बल तेरा चित्रपट प्रदर्शित झाले होते. वक्त कि आवाज, अग्नी, बीस साल बाद, चरणो कि सौगंध, कमांडो, गंगा जमुना सरस्वती, जीते है शान से, मर मिटेगे, प्यार का मंदीर, रुखसत, साजिश, सागर संगम, वक्त कि आवाज इ. त्यामुळे ते कायम या सेट वरून त्या सेटवर आणि या ठिकाणाहून त्या ठिकाणी पळत असायचे! त्यात ‘जीते हे शान से’ या चित्रपटातील एक गाणं दिग्दर्शकाला लवकर चित्रित करायचं होतं. ते गाणं गाणार होते किशोर कुमार. परंतु नेमकं त्यावेळी ते उपलब्ध नव्हते. मग ते गाणं गेलं अमित कुमार यांच्याकडे. अमित कुमार देखील कलकत्त्याला अडकल्यामुळे रेकॉर्डिंगच्या दिवशी तो उपस्थित राहू शकले नाही. (Mithun Chakraborty)
आता काय करायचे? बाका प्रसंग होता. अशावेळी कुठल्यातरी दुसऱ्या गायकाकडून हे गाणे गाऊन घ्यायचे ठरले आणि नंतर ओरिजनल गायक म्हणजे अमित कुमार आला की त्याच्या आवाजात डब करायचे असा पायंडा त्या काळी पडला होता. कारण शूटिंगची घाई असल्यामुळे तिकडे सेट लागलेला असायचा. असला गाण्याच्या डबिंगचा प्रकार पूर्वीपासून होत होता. (वाचकांना आठवत असेल १९६४ साली राज खोसला यांच्या ‘वो कौन थी?’ या चित्रपटात लता मंगेशकर ऐनवेळी गायला उपलब्ध न झाल्यामुळे ते गाणं चक्क मदन मोहन यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं गेलं आणि तसच ते चित्रितसुद्धा केलं गेलं ! नंतर लता मंगेशकर यांनी येऊन ते गाणं स्वतःच्या आवाजात डब केलं. ते गाणं होतं नैना बरसे रिमझिम रिमझिम)
आता येऊ मूळ किस्स्याकडे.‘जीते हे शान से’ या चित्रपटातील या गाण्याच्या वेळी नेमका हाच प्रकार झाला. पण ऐनवेळी आता कुठला गायक आणायचा? शेवटी संगीतकार अनु मलिक यांनी निर्णय घेतला स्वत:च्या आवाजात गायचा. त्यांनी मिथुनला (Mithun Chakraborty) तशी कल्पना दिली. “नाही तरी हे गाणं उद्या अमित कुमारच्या आवाजात डब करायचे आहेत तर दुसऱ्या कोणाला बोलवण्याच्या ऐवजी मी माझ्या आवाजात हे गाणे रेकॉर्ड करतो” अशा पद्धतीने अनु मलिकने त्या दिवशी ते गाणे रेकॉर्ड केले. गाण्याची सहगायिका होती कविता कृष्णमूर्ती. गाण्याचे बोल होते ‘ज्युली ज्युली जॉनी का दिल तुम पे आया ज्युली…’
===============
हे देखील वाचा : एका कुलीने मारलेल्या हाकेमुळे मिथुनचा आत्मविश्वास वाढला
===============
हे गाणं कंवल शर्मा यांच्याकडे पाठवण्यात आलं. त्यांनी ते गाणं चित्रित देखील करून टाकलं. मिथुन चक्रवर्तीला (Mithun Chakraborty) त्यांनी विचारलं, “हे गाणं कोणी गायलं आहे?” तेव्हा त्याने सांगितलं,”संगीतकार अनु मलिकने. पण लवकरच आता आपण अमित कुमारच्या स्वरात डब करणार आहोत. सध्या डमी साँग म्हणून गायले आहे.” त्यावर दिग्दर्शक कंवल शर्मा म्हणाले, “नको नको आता दुसरा गायक नको. अन्नू मलिकच्या आवाजात हे गाणं परफेक्ट बनलं आहे! हे गाणं यांच्याच आवाजात असेल” अशा पद्धतीने अनु मलिक अपघाताने सिंगर्स कॅटेगिरीमध्ये आला. मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांच्यामुळे त्याने हे धाडस केलं आणि गायक बनला. पुढे नव्वदच्या दशकामध्ये यांनी अनेक गाणी स्वतःच्या आवाजात गायली परंतु पहिलं गाणं मिथुन चक्रवर्तीसाठी होतं. ‘ज्युली ज्युली जॉनी का दिल तुम पे आया ज्युली…’