पडद्यावरील आणि पडद्याबाहेरील मौसमी चटर्जी
आपल्या हिंदी सिनेमा इंडस्ट्रीत अभिनेत्रींच्या करीयर मध्ये लग्न हा एक मोठा अडथळा असतो. कारण लग्नाच्यानंतर नायिका म्हणून तिला स्विकारलं जातं नाही. एक तर तिला चरीत्र भूमिकेकडे वळावे लागते किंवा चित्र संन्यास घ्यावा लागतो. खरं तर असं कां व्हावं असा प्रश्नच आहे कारण तिकडे हॉलीवूडमध्ये असे प्रश्न कधीच निर्माण होत नाहीत. आपल्या भारतीय प्रेक्षकांची मानसिकता मात्र विवाहित नायिकेला स्विकारण्याची नसते हे खरे आहे. असे असतानाही सत्तरच्या दशकात एका अभिनेत्रीने रूपेरी पडद्यावर पदार्पण केले तेच मुळी लग्न झाल्यावर! असे असतानाही पुढची दहा वर्षे ती आघाडीच्या सर्व अभिनेत्यांसोबत नायिकेच्या भूमिकेत चमकली. ही अभिनेत्री होती मौसमी चटर्जी (Moushumi Chatterjee). तिचा पहिला हिंदी सिनेमा शक्ती सामंतांचा ’अनुराग’ हा सिनेमा १९७४ साली पडद्यावर आला त्यावेळी ती २१ वर्षाची विवाहीत तरूणी होती. हिंदीत येण्यापूर्वी तिने बंगालीत दोन सिनेमे केले होते. तिचा सिनेमातील प्रवेश नाट्यमय झाला. ती दहा-अकरा वर्षांची शाळकरी मुलगी असताना एकदा बंगाली चित्रपट दिग्दर्शक तरूण मुझुमदार यांनी तिला आपल्या ’बालीका बधू’ या सिनेमात नायिका म्हणून घेतलं. सिनेमा म्हणजे काय हे कळायच्या अगोदरच तिला तिथे प्रवेश मिळाला. तिच्या चेहर्यावरची मुग्ध निरागसता, तिचं गोडं हसू आणि बोलके डोळे या भूमिकेकरीता योग्य होते. या चिमुरडीने सिनेमा हिट करून दाखवला. तिचं खरं नाव इंदीरा चटर्जी पण तिचं फिल्मी बारसं झालं मौसमी! या सिनेमाचे संगीत हेमंतकुमार यांनी दिले होते. त्यांनी त्याचवेळी आपल्या मुलाकरीता ही मुलगी मनात पक्की करून ठेवली. १९६९ साली तिचा ’परीणीता’ हा चित्रपट आला. (Moushumi Chatterjee)
तिच्या लग्नाची गोष्टही अशीच रंजक. तिची एक मावशी होती ती कॅन्सरने पीडीत होती. तिने एकदा लाडक्या भाचीला जवळ घेवून सांगितले ’मला जाण्यापूर्वी तुझं लग्न झालेलं पहायचं आहे’ घरच्यांनी लगेच स्थळं पाहायला सुरूवात केली. हेमंतदाच्या कानावर ही बातमी जेव्हा गेली की ते लगेच तिच्या पालकांना भेटले आणि आपल्या मुलाकरीता मागणी घातली अशा रीतीने वयाच्या सतराव्या वर्षी मौसमी (Moushumi Chatterjee) विवाहबध्द झाली! शक्ती सामंतांनी तिचे बंगाली सिनेमे बघितले होते त्यांनी तिला ’अनुरोध’ साठी विचारले. सासरच्यांनी तिला प्रोत्साहनच दिले. यात तिने एका अंध मुलीची अप्रतिम भूमिका केली होती. यात मा सत्यजितने कॅन्सरग्रस्त मुलाची अप्रतिम भूमिका केली होती. सुनरी पवन पवन पुरवैय्या, तेरे नैनो के मै दीप जलाऊंगा, नींद चुराये चैन चुराये डाका डाले तेरी बंसी या गीतांनी आणि राजेश खन्नाच्या गेस्ट अॅपियरन्सने सिनेमा सुपर हिट झाला. याच वर्षी तिचा राज खोसला दिग्दर्शित ’कच्चे धागे’ हा सिनेमा आला तो देखील हिट ठरला. (यात तिचा नायक तिचा पतीच होता)
१९७५ साली तिला मनोजकुमारने ’रोटी कपडा और मकान’ करीता साइन केले. यातील तिच्यावरचा रेप सीन खूप गाजला. अमिताभ सोबतच्या ’बेनाम’ मधील तिची अदाकारी चांगली होती. तिला आता मोठ्या बॅनरचे आघाडीच्या कलाकारांसोबतचे सिनेमे मिळत होते पण तिने करीयर फारसं कधी सिरीयसली घेतलचं नाही. बासुदांनी तिला अमिताभ सोबत ’मंझिल’ या सिनेमात घेतलं. तो अमिताभचा अॅंग्री यंग मॅनचा काळ असल्याने अशा भूमिकेत त्याला स्विकारलं नाही. रिमझिम गिरे सावन हे गाणं हिच या सिनेमाची एकमेव आठवण राहिली. विनोद मेहरा, जितेंद्र, ऋशी कपूर, धर्मेंद्र, शशी कपूर, संजीवकुमार, राजेश खन्ना या सर्वांसोबत तिचे सिनेमे आले व गेले. कोणत्याही भूमिकेवर ती आपली छाप सोडू शकली नाही हे सत्य आहे. आज मौसमी मात्र कित्येक गाण्यांसाठी आजही आठवली जाते. ओ हंसिनी मेरी हंसिनी (जहरीला इंसान), याद रहेगा प्यार का ये रंगीन (उमर कैद),नही नही कोई तुझसा हंसी (स्वर्ग नरक),संसार है इक नदीया(रफ्तार),हम दोनो मिल के, कागज पे दिल के चिठ्ठी लिखेंगे, जवाब आयेगा (तुम्हारी कसम) सिमटी हुयी ये घडीयां (चंबल की कसम) मेघा रे मेघा रे (प्यासा सावन), मुझे छू रही है (स्वयंवर), होठो पे बीती बात आयी है (अंगूर) सुषमा शिरोमणीच्या एका सिनेमात तिने भन्नाट लावणी सादर केली होती. (Moushumi Chatterjee)
=======
हे देखील वाचा : यांच्यासाठी किशोर कुमारने तीन गाण्यात प्ले बॅक दिला!
=======
१९८२ साली आलेल्या भन्नाट भानू या सुषमा शिरोमणी यांच्या चित्रपटात मौसमी चटर्जी यांनी नऊवारी साडी नाकात नथ घालून एक लावणी सादर केली होती. ‘तुम्ही अडकित्ता मी हो सुपारी…’ ही लावणी खूप गाजली. काही वर्षे सिनेमापासून दूर राहून ती परत सिनेमात परतली. अमिताभ सोबत २०१५ मध्ये आलेल्या ‘पिकू’ या चित्रपटात ती होती. २६ एप्रिल १९४८ रोजी जन्मलेल्या मौसमी ने मागच्या महिन्यात वयाची ७५ वर्षे पूर्ण केली! सर्व गुणसंपन्न असून देखील केवळ करिअर सिरियसली न घेतल्यामुळे ती मागे पडत गेली.