
Mukesh : निर्मळ मनाच्या मुकेशच्या प्रेमाचा भावस्पर्शी किस्सा!
हिंदी सिनेमाच्या गोल्डन इरामधील काही किस्से आज देखील काळजाला स्पर्श करून जातात. आज इतकी वर्ष झाली तरी त्या काळातील माणुसकी, त्या काळातील परस्परांसोबत असलेले संबंध प्रेम मनाला चटका लावून जाते. असाच एक किस्सा गायक मुकेश (Mukesh) यांच्याबाबतचा आहे. Mukesh जितके गुणी गायक होते तितकेच ते सच्च्या दिलाचे इन्सान होते. त्यांच्या अनेक कर्तृत्वातून या गोष्टीचा प्रत्यय येतो. हा किस्सा पार्श्वगायक Mahendra Kapoor यांनी विविध भारतीवरील एका कार्यक्रमात सांगितला होता. खूपच भावस्पर्शी असा किस्सा आहे. (Celebrity interview)

साधारणतः 1960 च्या दरम्यानचा किस्सा असावा. महेंद्र कपूर नुकतेच चित्रपट सृष्टीत आले होते. मुकेश (Mukesh) त्याकाळी प्रस्थापित गायक होते. महेंद्र कपूर यांच्या पुतण्याच्या शाळेमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम होता आणि त्यांना या कार्यक्रमासाठी मुकेश प्रमुख पाहुणे म्हणून हवे होते. म्हणून त्यांनी महेंद्र कपूर यांना विनंती केली की “आमच्या वतीने तुम्ही मुकेश यांना याबाबत विचारा” त्या पद्धतीने मुकेश यांच्याकडे महेंद्र कपूर गेले आणि म्हणाले, ”पापाजी माझ्या पुतण्याच्या शाळेमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तिथे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला बोलवले आहे. आपण जाऊ शकाल का?” तेव्हा मुकेश म्हणाले, ”का नाही? जाईल ना. मी नक्की जाईल.” तेव्हा महेंद्र कपूर यांनी विचारले, ”पापाजी आप गाने के कितने पैसे लेते हो?” तेव्हा मुकेश म्हणाले, ”तीन हजार रुपये.”
त्या संध्याकाळी महेंद्र कपूर यांनी आपल्या मोठ्या भावाला सांगितले की, ”उद्या शाळेतील कार्यक्रम झाल्यानंतर मुकेश यांना तीन हजार रुपयांचे पाकीट द्या. माझे रेकोर्डिंग असल्याने मी येवू शकत नाही.” दुसऱ्या दिवशी मुकेश शाळेतील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. कार्यक्रम छान झाला. मुकेश यांनी तिथे गाणे देखील गायले. सर्व जन खूश झाले. पण मुकेश यांनी पाकीट घेतले नाही. संध्याकाळी जेव्हा महेंद्र कपूर यांना ही बातमी कळाले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी भावाला विचारले तेव्हा भावाने सांगितले की पाकीट घ्यायला त्यांनी नकार दिला. महेंद्र कपूर यांना वाटले आपण चुकून ५००० च्या ऐवजी ३००० ऐकले की काय? आणि ३००० चे पाकीट दिल्यामुळे मुकेश यांनी नकार दिला की काय?

त्यांना रात्रभर झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मुकेश महेंद्र कपूर यांना भेटले आणि विचारले “कार्यक्रम कसा झाला?” तेव्हा मुकेश (Mukesh) म्हणाले, ”अरे कार्यक्रम एकदम परफेक्ट झाला. खूप मजा आली. लहान मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे.” त्यानंतर हळूच महेंद्र कपूर यांनी विचारले, ”पापाजी आपने पैसे क्यू नही लिये?” त्यावर मुकेश म्हणाले, ”पैसे कौनसे पैसे?” महेंद्र कपूर म्हणाले, ”वही जो आपने 3000 रुपये बोले थे.” त्यावर मुकेश म्हणाले, ”कौनसे तीन हजार रुपये भाई?” महेंद्र कपूर यांनी सांगितले, ”उस दिन आपने कहा ना एक गाने के ….”
=============
हे देखील वाचा : किशोर कुमारने हे गाणे चक्क झोपून रेकॉर्ड केले होते!
=============
त्यावर मुकेश यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. ते म्हणाले, ”मी म्हणालो होतो. पण मी असं थोडीच म्हणालो होतो की शाळेतील कार्यक्रमाला गेल्यानंतर तीन हजार रुपये घेइन. मी एका गाण्याची तीन हजार रुपये घेतो. नक्की घेतो. पण या कार्यक्रमांमध्ये मी कसे पैसे घेणार? अरे तू माझ्या धाकट्या भावासारखा आहेस आणि तुझा पुतण्या तो माझा पुतण्या. उद्या जर तुला कोणी सांगितलं की नितीन मुकेशच्या शाळेमध्ये जाऊन गाणे गा तर तिथे तू पैसे घेशील का? नितीन मुकेश तुला चाचा म्हणतो ना तसाच तुझा पुतण्या माझ्यासाठी पुतण्यासारखा आहे. त्यामुळे मी पैसे घेतले नाही.” महेंद्र कपूर मुकेश (Mukesh) यांचे ते बोल ऐकून भारावून गेले. त्यांनी मुकेश यांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांना मिठी मारली. दोघांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धरा वाहत होत्या.