Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’; २० वर्षांनंतर मुकेश खन्ना करणार दमदार पुनरागमन !
Shaktimaan Returns: भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासातील एक अविस्मरणीय पात्र म्हणजे ‘शक्तिमान’, आणि आता या सुपरहिरोची पुन्हा एकदा रंगतदार पुनरागमनाची तयारी सुरू आहे. पण यावेळी शक्तिमान छोट्या पडद्यावर नाही, तर प्रेक्षकांच्या मनात थेट आवाजाच्या माध्यमातून पोहोचणार आहे. अभिनेता मुकेश खन्ना, ज्यांनी 1990 च्या दशकात शक्तिमान या लोकप्रिय पात्राला जिवंत केलं, ते आता या भूमिकेत ‘पॉकेट एफएम’ या ऑडिओ प्लॅटफॉर्मवरून परत येणार आहेत. त्यांनी स्वतः या बातमीची पुष्टी करत सांगितलं की, ते शक्तिमानच्या आवाजात नव्या ऑडिओ सिरीजमध्ये झळकणार आहेत. (Shaktimaan Returns)

1997 ते 2005 दरम्यान दूरदर्शनवर प्रसारित झालेली शक्तिमान ही सिरीज केवळ एक करमणूक नव्हती, तर ती एका संपूर्ण पिढीच्या आठवणी आणि प्रेरणांचा भाग बनली. ती सिरीज बघत मोठं झालेली पिढी आजही शक्तिमानला त्याच आदराने आणि प्रेमाने आठवते. मुकेश खन्ना म्हणतात, “शक्तिमान हे फक्त पात्र नव्हतं, ते एक भावनिक नातं होतं जे लाखो प्रेक्षकांच्या हृदयाशी जोडलेलं होतं. आता त्याच पात्राला ऑडिओ फॉर्ममध्ये सादर करणं ही माझ्यासाठी खूप रोमांचक गोष्ट आहे.” खन्ना पुढे सांगतात, “पॉकेट एफएमसारखं व्यासपीठ ही पात्रं नव्या रूपात मांडण्यासाठी खूपच उपयुक्त आहे. शक्तिमानची ताकद, त्याचे मूल्य आणि त्याची प्रेरणा याला नव्या कथांच्या माध्यमातून मांडता येणार आहे, तेही आजच्या युथला भावेल अशा पद्धतीने.”

ही ऑडिओ सिरीज शक्तिमानची पारंपरिक ओळख राखून त्याला नव्या कथांसह नव्या पिढीसमोर आणणार आहे. आजच्या तरुण पिढीला आपल्या मोबाईलवर ऐकायला मिळेल एक सुपरहिरो, जो केवळ लढत नाही तर शिकवतही राहतो. पॉकेट एंटरटेनमेंटचे सीईओ आणि सह-संस्थापक रोहन नायक यांनी सांगितलं की, “शक्तिमानसारख्या प्रतिष्ठित पात्राच्या ऑडिओ सिरीजसाठी आम्हाला मुकेश खन्ना यांच्याशी भागीदारी करायला मिळणं, ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे. त्यांच्या आवाजातून शक्तिमान पुन्हा जिवंत होईल, आणि नव्या पिढीला तो वेगळ्या पद्धतीने भिडेल.” (Shaktimaan Returns)
==================================
==================================
पॉकेट एफएमने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक टीझर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली. त्यात लिहिलं होतं,“शक्तिमान ऑडिओ सिरीज लवकरच येत आहे. २० वर्षांपासून भारताने आपल्या सुपरहिरोची वाट पाहिली. आता २० वर्षांनंतर तो पुन्हा जागा झाला आहे.” शक्तिमान परत येतोय, नव्या रूपात, नव्या जोमाने – आणि त्याच्या आवाजातून पुन्हा एकदा तो शौर्य, नीती आणि सत्याचं प्रतीक होऊन उभा राहणार आहे. ही बातमी ऐकून जुन्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.