…. ती हळहळ वाटत नाही का?
चित्रपट एन्जाॅय करण्यातील रसिकांच्या गर्दीला ओहोटी लागल्याने पीव्हीआर, आयनॉक्स मल्टीप्लेक्स (multiplex) समूहाचे देशभरातील सत्तर स्क्रीन बंद करण्यात येत आहेत अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध होताच आजच्या ऑनलाईन जगात सगळीकडे पसरले पण कुठे हळहळ व्यक्त झाली का? अनेक चित्रपट फ्लाॅप झाल्याने २०२३ आणि २०२४ चा पूर्वार्ध मिळून तब्बल १३० कोटींचे नुकसान झाल्याचे सदर वृत्तात म्हटलयं. याबाबतची आकडेवारी आणि व्यावसायिक गणिते यातील अर्थकारण हा एक स्वतंत्र विषय आहे.
एका मल्टीप्लेक्समध्ये (multiplex) सरासरी चार ते पाच (कुठे सात) स्क्रीन असतात, अशा अनेक मल्टीप्लेक्समधील एकूण स्क्रीनची संख्या अर्थातच प्रचंड मोठी आहे. त्यातील सत्तर स्क्रीन हे प्रमाण कमी आहे की जास्त हे याकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता यावर अवलंबून आहे. पण मोबाईल स्क्रीन आणि ओटीटी प्लॅटफॉर्म यामुळे आता चित्रपट आपल्या खूपच जवळ आला आहे, अगदी हातातही आला आहे तर मग मल्टीप्लेक्समध्ये का जायचं असा विचार वाढलाय यात आता काहीच आश्चर्य राहिलेले नाही.
आज घरात असो, प्रवासात असो, हाॅटेलमध्ये असो कुठेही जुना व नवा चित्रपट एन्जाॅय करता येतोय. तोही हवा तेवढा. या माध्यमातून चित्रपटसृष्टीच्या अर्थकारणात किती व कशी भर पडतेय हा ही एक मोठाच ‘आकड्यांचा खेळ’ आहे. नवीन चित्रपट प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी किती कमाई झाली याची बातमी होतेय तर त्याच चित्रपटाचा ओटीटीवर किती जणांनी आस्वाद घेतला याचीही आकडेवारी रंजक ठरेल.
मल्टीप्लेक्स युगाची सुरुवात साधारण सव्वीस सत्तावीस वर्षांपूर्वी झाली आणि हे कल्चर वेगाने फोफावले. त्यातील सकाळी लवकर ते रात्री उशीरा असे चित्रपट खेळाचे राऊंड शो कल्चर चित्रपट रसिकांना सवयीचे झाले. त्यात मराठी चित्रपटांना अनेकदा तरी प्राईम टाईम शो मिळत नाहीत, कधी जाहिरातीत असलेली शोची वेळ प्रत्यक्षात मल्टीप्लेक्सवर नसते, कधी पुरेशा प्रेक्षकांअभावी शो रद्द केले जातात अशी अनेकदा तक्रार असतेच.
मल्टीप्लेक्समुळे (multiplex) मराठी व हिंदीसह गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम अशा प्रादेशिक भाषेतील आणि जपानी वगैरे विदेशी भाषेतील चित्रपट प्रदर्शित होऊ लागले. ओटीटीवर जगभरातील अनेक भाषांतील अनेक प्रकारचे चित्रपट पाहता येताहेत. या स्थित्यंतरातून आता मल्टीप्लेक्स स्क्रीन बंद करण्याचे व्यावसायिक निर्णय घेण्याकडे प्रवास होत चाललाय असे म्हणायचे का?
काही म्हणा, मल्टीप्लेक्समधील (multiplex) काही स्क्रीन कमी होताहेत या ‘ब्रेकिंग न्यूज’ने कुठलाही कोणताही चित्रपट रसिक हळहळला नाही. तसं जुन्या काळातील एखादे सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडले रे पडले की चित्रपट रसिक भावूक होत, जुन्या आठवणीत जात (वा आजही जातात). मग ते मुंबईसारख्या मेट्रो शहरातील मॅजेस्टीक, नाझ, अप्सरा, मिनर्व्हापासून अनेक छोट्या शहरातील असोत वा अगदी खेड्यापाड्यातील असोत, कोणतेही जुने सिंगल स्क्रीन थिएटर बंद पडताच अनेक चित्रपट रसिक आपल्या फ्लॅशबॅकमध्ये जातात.
आपण तेथे पहिला चित्रपट कोणता पाहिला यापासून तेथील तिकीट दरापर्यंत प्रत्येकाची आपली एक हळवी आठवण असतेच असते. मिनर्व्हात आपण पाच वर्षांत पंचवीस वेळा रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले” अनुभवला हे आजसाठी पासष्टी ओलांडलेले अनेक चित्रपट रसिक सांगतील. मिनर्व्हात १५ ऑगस्ट १९७५ ते ३१ ऑगस्ट १९७८ असा दिवसा तीन खेळ याप्रमाणे हाऊसफुल्ल गर्दीतील ‘शोले’ त्यानंतर मॅटीनी शोला शिफ्ट करण्यात येवून आणखीन दोन वर्ष सुरु होता. त्या काळात आवडलेला चित्रपट पुन्हा पुन्हा पाहण्यात एक प्रकारचा मानसिक, भावनिक आनंद मिळत असे.
=========
हे देखील वाचा : फिल्मी अड्ड्यावरील चर्चेतील फिल्म
=========
चित्रपट मनात घर करे. त्याच्या आठवणी पुढील पिढीत जात आणि तेव्हाच्या चित्रपट रसिकाचे आपलं असे एकादे अतिशय आवडते चित्रपटगृह नक्कीच असे. आपण तेथे भली मोठी रांग लावून कसे तिकीट मिळवले याच्या आठवणी हव्याहव्याश्या वाटत. ती ओढ मल्टीप्लेक्स (multiplex) कल्चरमध्ये नाही. पटतयं ना?
रसिकांपर्यंत चित्रपट पोहचण्याच्या वाटचालीतील मल्टीप्लेक्स (multiplex) युग खूपच लवकर गर्दीला दुरावत चाललयं. चित्रपट चांगले बनत नाहीत याला दिग्दर्शक जबाबदार असतो असे सर्वसाधारणपणे मानले जाते. पण त्याचा एक फटका चित्रपटगृह चालकालाही (आजच्या युगात कार्पोरेट कंपनीलाही) बसतोय…..